कोमल खूप चिडली होती. मागचे आठ दिवस तिचं वाॅशिंग मशिन बंद पडलं होतं. तिला एकच प्रश्न पडला होता. सहा महिन्यात मशिन कसं काय बंद पडू शकतं? ज्या दुकानातून तिने मशिन घेतलं होतं त्या दुकानदाराला तिने दोन वेळा फोनही केला होता. त्यांनी मेकॅनिक पाठवतो, असा निरोप दोन्हीवेळा दिला होता, परंतु आठ दिवस झाले मेकॅनिक आलाच नाही. तिने परत फोन केला तर तो दुकानदाराने उचलला नाही. तिच्या रोजच्या कामात कपडे धुण्याची भर पडलीच होतीच, परंतु त्याहीपेक्षा इतकं महागडं मशिन घेऊनही ते जर बंद पडत असेल तर काय उपयोग? याचं तिला खूप वाईट वाटत होतं. त्याच विचारात तिने दुकान गाठलं. समोरच उभ्या असणाऱ्या सेल्समनकडे दुर्लक्ष करत तिने थेट मालकाला प्रश्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सर..मी तुम्हाला दोनदा काॅल केला होता. तुम्ही मला मेकॅनिक पाठवतो म्हणाला होतात. त्याचं काय झालं?”

“अजून एखादा फोन करायचा होता. तुम्ही कशाला दगदग केलीत. उद्या येणारच होता आमचा माणूस.”

“पण सहाच महिन्यात मशिन बंद कसं काय पडू शकतं?”

“तुम्ही ती कशी वापरली हे बघावं लागेल?”

“अहो काहीही काय बोलताय? ही माझी पहिली मशिन नाहीए. याआधी तेरा वर्षं मी मशिन वापरली आहे.”

“उद्या मेकॅनिक पाठवतो. तो बघेल आणि सांगेल काय झालंय ते.”

“उद्या मेकॅनिक नाही आला तर मला वेगळी ॲक्शन घ्यावी लागेल. कस्टमरला ‘आफ्टर सेल सर्व्हीस’ देणं तुमची जबाबदारी नाही का?” असं जवळजवळ धमकावून ती दुकानातून बाहेर पडली.

दुसऱ्या दिवशी मेकॅनिक तिच्याकडे पोहोचला. त्याने मशिन बघितली. त्यातील पीसीबी पॅनल खराब झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. ते बदलण्यासाठी दोन तीन दिवस लागणार असल्याचं सांगून तो निघून गेला. कोमलची पुन्हा पंचाईत झाली, पण तिच्याकडे पर्यायच नव्हता. तीन दिवसानंतर तिने पुन्हा दुकानदाराला ‘रिमायंडर’ काॅल सुरू केले. पहिले पाढे पंचावन्न…

आठ दिवस मेकॅनिक फिरकलाच नाही. तिने पुन्हा दुकान गाठलं. ती दुकानदाराला म्हणाली, “मला मशिनचा कुठलाही पार्ट बदलून नकोय. मला मशिनच बदलून द्या.”

“मॅडम, आम्ही फक्त पार्ट बदलून देऊ शकतो. तेही तुमचं मशिन वाॅरंटी पीरियडमधे आहे म्हणून.”

“अहो पण नवीन वस्तू खराब होतेच कशी?”

“हे बघा… इलेक्ट्राॅनिक्स वस्तू कधी कशी खराब होईल सांगता येत नाही.”

“तुम्ही तर ग्राहकांकडे लक्षच देत नाही. तुमच्याकडून आम्ही पुन्हा वस्तू कशा खरेदी करायच्या?”

“मॅडम, मी माझ्यापरीने प्रयत्न करतो आहे. पॅनल कंपनीकडून येतं. ही बघा माझी कंपनीकडे तक्रारही नोंद आहे. कंपनीकडून पॅनल आलं की मी लगेच बदलून देतो.”

“कंपनी पाठवत का नाही मग?”

“ते मला माहीत नाही. तुम्ही ‘कस्टमर केअर’ला एक कंप्लेंट नोंद करता का? म्हणजे तुमची तक्रार डायरेक्ट कंपनीकडे जाईल.”

“त्यानंतर तरी तो पार्ट लगेच मिळणार ना?”

“कंप्लेंट नोंद केल्यावर तीन दिवसात कंपनीकडूनच सेवा मिळते.”

“चला हे एक बरं झालं, पण हे तुम्ही आधी का नाही सांगितलं.”

“कस्टमरसाठी आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न करून बघतो.”

दुकानातूनच तिने कंपनीच्या ‘कस्टमर केअर’ला तक्रार पाठवली. पण, पाच सहा दिवसांनी परत तेच. ना मेकॅनिक आला ना पॅनल. आता मात्र कोमल जास्तच वैतागली. तिने कंपनीच्या वेबसाईटवरून पुन्हा एकदा तक्रार नोंदवली. त्याबरोबर कंपनीला मेल केला. त्यात तिच्या वाॅशिग मशिन खरेदीचं बिल, वाॅरंटी कार्ड असे डिटेल्स पाठवले. ज्या दुकानातून मशिन घेतलं त्या दुकान मालकाचं, दुकानाचं नाव, नंबर याचा उल्लेख केला. तिथून मिळालेल्या ‘आफ्टर सेल सर्व्हीस’बद्दलही लिहिलं. त्याचबरोबर तिने कंपनीबद्दलचा राग आणि कंपनीला धोक्याचा इशाराही दिला. तिने लिहिलं, जर मला पुढच्या तीन दिवसात माझ्या वाॅशिंग मशिनचा पार्ट बदलून मिळाला नाही. तर मात्र मी ग्राहक पंचायतीकडे जाईन. आता माझी सहनशक्ती संपली आहे. कृपया कंपनीने या मेलचा विचार करावा.

दुसऱ्या दिवशीच कोमलला दुकान मालकाचा फोन आला,“ मॅडम, तुमचं काम झालंय. कंपनीने पीसीबी पॅनल पाठवलंय. मी दुपारी पॅनल घेऊन मेकॅनिक पाठवतो.”

“पण मी तर रात्री मेल केला होता. पंधरा दिवस जे काम झालं नव्हतं ते एका रात्रीत कसं झालं?”

अखेर, कोमलचं वाॅशिंग मशिन सुरु झालं. आणि कोमलच्या जीवात जीव आला. मागच्या महिनाभरात तिची प्रचंड शारीरिक, मानसिक दगदग झाली होती. मशिन सुरू झाल्याबरोबर आधी तिने कपडे मशिनला लावले. रोज कपडे धुण्याचा जो अतिरिक्त ताण येत होता तो स्वच्छ झाला होता.

(लेखिका सांगली येथे समुपदेशक आहेत.)

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For products when after sale service is not available then how to tackle the situation asj