‘मेकअप किट’ हा प्रकार आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण ‘मेकअप पेन’बद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? हो, मेकअप पेन! जरा तुमचे शाळेतले दिवस आठवा… लहान असताना शाळेत कुणी ना कुणी तरी ४ रंगांच्या रिफिल्स एकाच पेनात असलेलं बॉलपेन घेऊन येत असे… आणि निळा, काळा, लाल आणि हिरवा रंग असलेल्या शाईच्या रिफिल्स खटाखट बदलून वेगवेगळ्या रंगात लिहीत असे. वर्गातल्या सर्व मुलामुलींना ते पेन हवंहवंसं वाटायचं! आता कल्पना करा, की त्या पेनात वेगवेगळ्या रिफिलींच्या ऐवजी विविध मेकअप उत्पादनं बसवली तर?…
मजेदार वाटणारी ही कल्पना आता प्रत्यक्षात आली आहे आणि ‘मेकअप पेन’नामक उत्पादन आता भारतातही मिळू लागलं आहे.
विविध सौंदर्यवर्धक उत्पादनं मिळणाऱ्या ॲप्सवर ही मेकअप पेन मिळू लागली आहेत. या पेनमध्ये चार रिफिल्ससारखेच चार खण आहेत. त्यात आयब्रो पेन्सिल, आयलायनर, लिपस्टिकची टच-अप स्टिक आणि हायलायटर स्टिक आहे. पेनचा खटका दाबून ती-ती मेकअप स्टिक वर आणता येते. प्रथम हे पेन केवळ आंतरराष्ट्रीय मेकअप उत्पादन वेबसाईटस् वर मिळत होतं, पण ते भारतात मिळू लागल्यानंतर अनेक मेकअप ‘इन्फ्लूएन्सर्स’नी ते वापरून त्याचे व्हिडिओ यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर टाकायला सुरूवात केली. त्यानंतर ते चर्चेत आलं.
हेही वाचा… नोबेल पुरस्काराच्या दोन वेळा मानकरी ठरलेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ मेरी क्युरी
अनेक मेकअप इन्फ्लूएन्सर्सच्या मते या मेकअप पेनमधली आयब्रो पेन्सिल आणि आयलायनर पेन्सिल चांगली ‘पिगमेंटेड’ आहे. लिप टच-अप स्टिकचा उपयोग लिप लायनरसारखा आणि लिपस्टिकला टच-अप करण्यासाठी असा दुहेरी करता येतो. तसंच हीच स्टिक गालांवर लावून ब्लशसारखी हातानं परसवून पीच-गुलाबी रंगाचा ब्लश इफेक्ट आणता येतो. यातील लिपस्टिकचा रंग प्रामुख्याने पीची पिंक- म्हणजे आपण ज्याला थोडा पिंकिश न्यूड रंग म्हणतो तसा आहे. पेनमधील हायलायटर स्टिक ही ‘स्किन कलर’ची आणि थोडी चमक असलेल्या रंगाची आहे. डोळ्यांच्या कोपऱ्यांच्या बाजूला, नाकाच्या शेंड्यावर, गालांच्या हाडांवर हायलायटर लावून, हातानं पसरवून थोडा ग्लो आणण्याचा प्रयत्न केला जातो. विविध मेकअप उत्पादनं एकत्र लहानशा पेनमध्ये मिळत असल्यानं बाहेर जाताना किंवा प्रवासाला जाताना हे पेन उत्तम ठरेल असं बऱ्याच इन्फ्लूएन्सर्सचं म्हणणं आहे.
हेही वाचा… चतुरा : बदलते वातावरण, प्रदूषण देतेय नपुंसकतेला आमंत्रण!
आता महत्त्वाचा मुद्दा राहतो, तो या मेकअप पेनच्या किमतीचा! त्याची मूळची किंमत अंदाजे १२०० ते १३०० रुपये आहे. या पेनमध्ये विविध ब्रँडस् आहेत. विविध शॉपिंग ॲप्सवर सातत्यानं सेल सुरू असतात, त्यात तुम्हाला सध्या साधारण ८०० ते ९०० रुपयांपर्यंत हे उत्पादन मिळू शकेल. ही किंमत लक्षात घेतल्यानंतर मात्र हे पेन वापरणं किफायतशीर आहे की नाही यावर विचार करावा लागतो. कारण महागडे नसलेले, पण कधीतरी वापरायला चांगले, असे अनेक मेकअप ब्रँडस् बाजारात उपलब्ध आहेत. त्यात अंदाजे १०० ते १५० रुपयांपासून लिपस्टिक, २५० रुपयांपासून आयलायनर, अंदाजे २५० किंवा ३५० रुपयांपासून पावडर वा स्टिक स्वरूपातलं हायलायटर, असे पर्याय उपलब्ध आहेत. ही वेगवेगळी उत्पादनं खरेदी करताना तुम्ही तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणे आवडीचे रंग घेऊ शकता आणि तरीही त्याची एकत्रित किंमत मेकअप पेनच्या किमतीएवढीच होईल! मात्र एकाहून अधिक मेकअप उत्पादनं तुमच्या पर्समधील अधिक जागा व्यापतील इतकंच!
हेही वाचा… स्त्रियांचे हक्क आणि मानवाधिकारांसाठी लढणारी लढवय्यी!
तुम्ही मेकअपप्रेमी असाल, तर मात्र तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रँडचं मेकअप पेन निवडून ‘ट्राय’ करून पाहू शकता. बाकी काही नाही, तरी शाळेतल्या ‘त्या’ विविधरंगी रिफिल्सच्या पेनची आठवण नक्कीच ताजी होईल!
lokwomen.online@gmail.com