“लग्न होईपर्यंत मुलगा मुलासारखा वागतो, परंतु, मुलगी आयुष्यभर मुलगीच राहते”, असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी.व्ही.नागारत्ना यांनी शुक्रवारी (५ जानेवारी) केलं. त्यांचं हे वक्तव्य देशभर चर्चेत होतं. २८ व्या सुनंदा भंडारे स्मारक व्याख्यान सोहळ्यात त्या बोलत होत्या. लैंगिक भेदाभेद टाळून देशभरातील न्यायालयाकडून निकाल दिला जातो. यामुळे समाजात स्त्री-पुरुष समानता राखण्यास न्यायव्यवस्थेचा हातभार लागला आहे असंही त्या म्हणाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर महिलांच्या सद्यस्थितीवर नागारत्ना यांनी भाष्य केलंय. त्यांच्या भाषणातील महिलांशी संंबंधित असलेले मुद्दे काय आहेत जाणून घेऊ.
बी.व्ही. नागरात्ना या सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बी.व्ही. नागारत्ना सरन्यायाधीशपदी विराजमान होणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने त्यांनी दिलेले निकाल आणि त्यांची विधाने सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
विवाहसंस्थेचे आधारस्तंभ कोण?
स्त्री आणि पुरुष हे दोघेही विवाह संस्थेची चाकं आहेत, असं आपल्याकडे सर्रास बोललं जातं. परंतु, विवाह टिकवणं, फुलवणं हे सर्वस्वी स्त्रीच्याच हातात असल्याचं म्हटलं जातं. यावर नागारत्ना म्हणाल्या, “स्त्री आणि पुरुष हे विवाह संस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. कुटुंबात नवरा-बायकोने एकमेकांना समान वागणूक दिली पाहिजे. महिलांच्या आनंदाकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे.”
हेही वाचा >> कर्करोगामुळे गर्भाशय काढून टाकल्यास ती पतीप्रती क्रुरता नाही… मद्रास उच्च न्यायालयाचे निरीक्षण
परंपरेला छेद द्या
पुरुषांनी बाहेरची जबाबदारी सांभाळावी आणि स्त्रियांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात अशी आपल्याकडे रीत आहे. परंतु, ही परंपरा मोडीत काढली पाहिजे, असं नागारत्ना म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, “सुशिक्षित आणि प्रशिक्षित पुरूष आणि घरगुती काम येत असलेली स्त्री यांचा विवाह आदर्श मानला जातो. समाजाच्या तशा धारणा आहेत. परंतु, या विचारसरणीत आता बदल झाला पाहिजे. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे महिलांना सशक्त बनण्यास मदत होते. तसंच, दैनंदिन जीवनात त्यांचं योगदानही राहतं.”
स्त्रियांची अस्मिता जपा
अनेक कुटुंबात महिलांना कमी लेखलं जातं. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जात नाही. परिणामी महिलेचा स्वाभिमान दुखावला जातो. त्यामुळे अनेक कुटुंबात वाद सुरू होतात. हे टाळण्यासाठी स्त्रियांच्या अस्मितेचा आदर करा असं नागारत्ना सुचवतात. “स्त्रियांच्या अस्मितेला तडा गेल्यास कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. तसंच, नाती तुटू शकतात”, अशी भीती नागारत्ना यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षणामुळे अहंकार येऊ नये
शिक्षणामुळे कुटुंबात सहिष्णुता आणि लवचिकता विकसित झाली पाहिजे. शिक्षणामुळे अहंकार आणि मत्सर येऊन एखाद्याला तुच्छ लेखू नये. याच गोष्टी कुटुंब आणि लग्नसंस्था टिकवण्यासाठी आवश्यक असल्याचं नागरात्ना म्हणाल्या.
हेही वाचा >> बलात्काराचा गुन्हा रद्द, फसवणुकीचा गुन्हा कायम…
महिलेच्या प्रगतीवर आनंद व्यक्त करा
नोबेल पारितोषिक विजेत्या प्रा.क्लॉडिया गोल्डिन यांनी भारतातील महिलांच्या श्रम बाजारातील भीषण परिणामांवर मार्मिकपणे संशोधन केलंय. महिलेने प्रगती साधल्यानंतर गृहकलह टाळण्यासाठी जोडीदाराने समजुतीने वागलं पाहिजे, असाही सल्ला नागारत्ना यांनी दिला.
पत्नीचा त्याग ओळखा
मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी आणि उंची जीवनमानासाठी पती नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. परंतु, अशा काळात महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानात परस्पर समजून घेण्याचंही आवाहन नागारत्ना यांनी केलं आहे.
न्यायालयाची भूमिका महत्त्वाची
भारतीय न्यायव्यवस्था अधिक सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण बनवण्यासाठी राज्यातील सर्व भागांची नितांत गरज आहे. न्यायालयांनी कायमच लैंगिक समानतेच्या दृष्टीने आणि भेदाभेद संपवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलली आहेत, असं नागारत्ना म्हणाल्या.
मुलगा लग्न होईपर्यंत मुलासारखा वागतो…
तसंच, “भारतातल्या न्यायालयांनी, न्याय व्यवस्थेने कायमच स्त्री आणि तिच्या सबलीकरणावर भर दिला आहे. मात्र एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलगा हा त्याचं लग्न होईपर्यंत आईचा मुलगा असतो. त्याचं लग्न झालं की त्याच्या प्राथमिकता बदलतात. मात्र एक मुलगी ही आयुष्यभर मुलगीच असते”, असंही नागारत्ना म्हणाल्या.
गरोदरपणा, मातृत्व रजेमुळे महिलांच्या कामावर परिणाम
महिलांना हे विचारलं जातं की त्यांना मासिक पाळी कधी आली होती? हा प्रश्न त्या गरोदर आहेत का? हे जाणून घेण्यासाठी विचारला जातो. खासगी क्षेत्रात महिला जेव्हा काम करत असतात तेव्हा मातृत्वाच्या रजेनंतर जेव्हा त्यांना कामावर रुजू व्हायचं असतं तेव्हा त्या जागी दुसऱ्या कुणाची तरी निवड झाल्याचं त्यांना समजतं. अनेक स्त्रियांची नोकरी त्यांना मूल झालं म्हणून जाते हे नाकारता येणार नाही, हेही त्यांनी अधोरेखित केलं.
सामाजिक रितींचं दडपण
महिला कमावत असल्या तरीही त्यांच्याकडून घरकामाची साहजिक अपेक्षा ठेवली जाते. तसंच, अनेक भूमिकांमध्ये समतोल राखण्याबाबतही महिलांकडूनच अपेक्षा केली जाते, याकडेही नागारत्ना लक्ष वेधलं.