नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच तुम्ही नवीन संकल्पही (resolutions) ठरवले असतीलच. काही जुन्या, त्रासदायक आठवणी मागे सोडून नवीन सकारात्मक आठवणी तयार करण्यासाठी आता सज्ज व्हा. गेल्यावर्षी राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी आता यावर्षी तुम्हाला करता येऊ शकतात. फक्त त्यासाठी मनापासून निश्चय करण्याची आणि त्यावर ठाम राहण्याची गरज आहे. घर, मुलंबाळं, नातेसंबंधांबरोबरच ऑफिस, करियर तर तुम्ही सांभाळतच असाल, पण आता यावर्षी या सगळ्याबरोबरच स्वत:साठी वेळ देणं, स्वत:च्या प्रगतीसाठी प्रयत्न करणं, आवडणाऱ्या गोष्टी करणं, छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद मिळवणं हेही करायचं आहे हे लक्षात ठेवा. स्वत:साठी थोड्याशा वेगळ्या गोष्टींचे संकल्प यावर्षी नक्की करून बघा
१. डिजिटल डिटॉक्स- तुमच्यापैकी बहुतेकजणी डाएटचा भाग म्हणून डिटॉक्स करत असतील. पण डिजिटल डिटॉक्स ही आपल्या प्रत्येकासाठी काळाची गरज बनली आहे. मोबाइल, सोशल मीडिया आता आयुष्याचा अत्यावश्यक भाग आहे. पण त्याचा अतिरेकी वापर फक्त आपल्या शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम करतोय. त्यामुळेच यावर्षी जमेल तितके डिजिटल डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे कामासाठी सोशल मीडिया, मोबाइलचा वापर करावाच लागणार आहे. पण काम संपल्यानंतर रात्री झोपताना पुन्हा मोबाइल/टॅबवर काही पाहण्यापेक्षा एखाद्या पुस्तकाची काही पानं वाचा. किंवा तुमच्या आवडीच्या छंदासाठी वेळ द्या. छान गाणी ऐका. जेवणानंतर थोडावेळ मोकळ्या हवेत फिरायला जाऊ शकता. सुट्टीच्या दिवशी गरज नसल्यास महत्त्वाचे फोन सोडून अजिबात फोनचा वापर करू नका. आठवड्यातून/ पंधरा दिवसातून किंवा किमान महिन्यातून एक दिवस तरी सोशल मीडियापासून पूर्ण लांब राहा. यामुळे मानसिक शांतता तर मिळेलच, पण कदाचित तुमची स्वत:शी नव्यान ओळख होऊ शकेल.
आणखी वाचा-समुपदेशन… स्लिप डिव्होर्स ?
२. बचत करा- नोकरी/ व्यवसाय करणारी महिला असो किंवा गृहिणी- घरखर्चाचा मेळ बसवण्यासाठी प्रत्येकजणच प्रयत्न करत असते. त्यामुळेच आहे त्या उत्पन्नातून शक्य तितकी बचत करतच असाल, पण नीवन वर्षी त्यातूनही थोडीशी बचत तुम्ही स्वत:साठी करा. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवत असताना अनावश्यक खर्च कसे कमी करता येतील याकडे लक्ष द्या. त्यासाठी दररोज होणारा खर्च एका डायरीत नोंदवण्याची सवय लावून घ्या. आता यासाठी Apps ही उपलब्ध आहेत. त्याची मदत घ्या. तुम्ही कमावत्या असाल तर तुमच्या पगारातील काही हिस्सा तरी तुम्ही बचतीसाठी राखून ठेवा. गृहिणी असाल तरीही स्वत:साठी बचत करायला यावर्षी विसरू नका.
३.प्रवास- रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढा आणि प्रवासाला जा. त्यासाठी अगदी लांबच्या सहलीच केल्या पाहिजेत असं काही नाही. तुमच्या आसपास अशी कितीतरी ठिकाणं असतील तिथे तुम्ही अजून गेला नसाल, तिथपासून सुरुवात करा. नेहमीच्या फॅमिली ट्रिपपेक्षा मैत्रीणी, बहिणींच्या ग्रुपबरोबर किमान एक दिवस तरी असा प्रवास करा. यामुळे तुम्ही रिफ्रेश तर व्हालच, पण ताणतणावाला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला ताकदही मिळेल.
४. स्वत:साठी वेळ काढा- दरवर्षीच्या संकल्पात ही गोष्ट असतेच, पण तरीही आतापर्यंत तुम्हाला हे शक्य नसेल झालं तर यावेळेस मात्र खूणगाठ बांधा. अगदी लवकर उठून किंवा रात्री सगळे झोपल्यावर किंवा दिवसभरात कधीही फक्त तुमच्या स्वत:साठी वेळ काढा. पूर्वीचा एखादा छंद पुन्हा सुरू करा. पेंटिग, शिवणकाम किंवा अगदी काही न करता नुसतं शांतपणे बसून राहणं असं स्वत:साठी करा. अगदी एक तास जमत नसेल तरी किमान दहा ते पंधरा मिनिटे वेळ काढाच. या वेळेत मोबाईल दूर ठेवा. हा वेळ फक्त तुमच्यासाठी असला पाहिजे.
आणखी वाचा-घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
५. टाईम मॅनेजमेंट- तारेवरची कसरत करता करता नक्कीच धावपळ होत असणार. जीव अगदी दमून जातो ना? मग आता यावेळेस काहीही झालं तरी टाईम मॅनेज करायला म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करायला शिकणार असं ठरवा. बऱ्याचणींनी सुरूही केलं असेल. दिवसभरातल्या महत्त्वाच्या कामांची यादी करा. त्यांना प्राधान्य द्या. घराची साफसफाई, सामान आणणे, अन्य गोष्टींसाठी वेळापत्रक ठरवू शकता. महत्त्वाचं म्हणजे कामं वाटून घ्या. ‘मीच एकटी सगळं करणार’ हा अट्टहास सोडून द्या. वेळेचं व्यवस्थापन जमलं की आपल्यासाठीही वेळ शिल्लक राहतो हे तुमच्या लक्षात येईल.
६. पुरेशी झोप आणि चौरस आहार- कित्येकदा घरातलं, ऑफिसचं काम करता करता खूप उशीर होतो. रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी पुन्हा चक्र सुरू अशा परिस्थितीत पुरेशी झोप होत नाही आणि त्याचा परिणाम तब्येतीवर होतो. त्यामुळे यावर्षीपासून वेळेवर खाणं, चौरस आहार घेणं आणि पुरेशी झोप घेणं ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. यासाठीच टाईम मॅनेजमेंटचा उपयोग होऊ शकतो.
७. कमीत कमी सामान- अनेकदा आपण घरात उगाचच कितीतरी वस्तू साठवून ठेवतो. नंतर लागेल, कुणालातरी लागेल म्हणून या वस्तू वर्षानुवर्षे पडून राहतात. कपडे, घरातली भांडी, फर्निचर, बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा कितीतरी गोष्टी तुमच्याही घरात असतील. तर मग नको असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याचा यावर्षी संकल्प करा. दर आठवड्यातून किमान एकदा तरी नको असलेल्या गोष्टींचा आढावा घ्या. खरोखरंच वापरात नसलेल्या वस्तू वेळेवर कुणा गरजूला देऊन टाका. म्हणजे घरातली जागाही मोकळी होईल आणि गरजूला मदत केल्याचं समाधानही मिळेल.
तेव्हा यंदा नवीन वर्षाचं स्वागत करताना येणारं वर्ष आणखी चांगलं जाईल यासाठी या गोष्टी ठरवायला विसरू नका.