पूनम कुडले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरोघरच्या ‘चतुरां’साठी अतिशय धामधुमीचे असे हे दिवस आहेत. गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर काय करू आणि काय नको असं होऊन गेलं असेल नाही?

त्यातही घरगुती गणपतीची आरास करण्यात ‘चतुरां’सह घरातली इतर मंडळीही रंगली असतील. आज आम्ही तुम्हाला गणपतीची अशी सजावट दाखवणार आहोत, जी अगदी १०० रुपयांत (किंवा त्यापेक्षाही कमी खर्चात) होऊ शकते आणि तीही खूप कमी वेळात. ही सजावट ‘इकोफ्रेंडली’ तर आहेच, पण ती इतकी सोपी आहे, की तुमच्यासह घरातली लहान मुलंही ती सहज करू शकतील आणि त्यांनाही निर्मितीचा आनंद मिळेल.

गणपती बाप्पाचं आवडतं फूल म्हणजे लाल जास्वंद. म्हणून या सजावटीत आपण जास्वंदीच्या फुलाचं आसन बनवू या. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जाड लाल रंगाचा कागद, सोनेरी रंगाचा कागद, सोनेरी रंग, कात्री, डिंक आणि पुठ्ठा. हे सगळं साहित्य तुम्हाला जवळच्या स्टेशनरी दुकानात सहज मिळेल आणि त्यातलं निम्मं तर कदाचित घरातच उपलब्ध असेल.

  • सर्वांत आधी आपण फुलाच्या ५ पाकळ्या लाल रंगाच्या कागदापासून बनवू या. त्यात एक पाकळी बाकीच्या ४ पाकळ्यांपेक्षा थोडीशी मोठी बनवायची आहे. मोठ्या पाकळीची साधारण लांबी २६ सेमी. आणि रुंदी ३० सेमी. तसंच बाकीच्या ४ पाकळ्यांची साधारण लांबी २२ सेमी आणि रुंदी २५ सेमी ठेवावी. हे आकार केवळ लाल रंगाच्या कागदावर पेन्सिलनं काढून कात्रीच्या मदतीनं कापून घ्यायचे आहेत.
  • आता या पाकळ्या सजवण्यासाठी त्यांच्या कडांना छोटा ब्रश वापरून सोनेरी रंग द्यायचा आहे. म्हणजेच सोनेरी बॉर्डर रंगवायची आहे. तुम्हाला जर ब्रश वापरायचा नसेल, तर आणखी सोपा उपाय आहे. सोनेरी मार्कर किंवा सोनेरी पेन वापरूनही बॉर्डर रंगवता येईल.
  • आता पुढची स्टेप म्हणचे गणपती बाप्पा ज्यावर बसणार आहेत, त्या आसनाचा बेस बनवणं. त्यासाठी आपण एखाद्या बॉक्सचा पुठ्ठा घ्यायचा आहे आणि त्यावर दोन समान आकाराची वर्तुळं काढून कात्रीनं ती कापून घ्यायची आहेत. याबरोबरच पुठ्ठ्याच्या ४० सेमी लांबी आणि ६ सेमी रुंदी अशा आकाराच्या दोन पट्ट्याही कापून घ्यायच्या आहेत. आता या पुठ्ठ्याच्या पट्ट्या गोलाकार आकारात वळवून घायच्या आणि दोन गोलाकार पुठ्ठ्यांच्या मध्ये त्या बरोबर दिलेल्या फोटोत दाखवल्याप्रमाणे डिंकाच्या सहाय्यानं चिटकवून घ्यायच्या आहेत.
  • हे सर्व आकार योग्य रीतीनं एकमेकांना चिकटवून घेतल्यावर आपल्याला एक गोलाकार बेस मिळतो. आता या बेसला सोनेरी रंगाचा कागद सगळीकडे चिटकवून घायचा, म्हणजे ते छान चमचमतं दिसेल. मात्र पुठ्ठ्याचे गोल आणि कडेला गोलाकार चिकटवलेल्या पुठ्ठ्याच्या पट्ट्या भक्कम असतील आणि त्या नीट चिकटतील याकडे लक्ष द्या, म्हणजे हा बेस पक्का झाल्याची खात्री होईल.
  • आता शेवटची स्टेप म्हणजे गोलाकार बेसच्या कडेला मध्यभागी आपली एकच असलेली मोठी पाकळी आणि त्याच्या बाजूला थोडं थोडं अंतर सोडून एकानंतर एक अशा उर्वरित चार पाकळ्या डिंकानं चिटकवून घ्यायच्या आहेत. या चार पाकळ्यांना हातानं बाहेरच्या बाजूस किंचित वाकवून त्यांना खऱ्या पाकळीसारखा आकार द्यायचा आहे. या सर्व पाकळ्या अशा रितीनं चिकटवायच्या आहेत, की जणू हातात धरलेल्या, फुललेल्या जास्वंदीच्या फुलाचाच भास निर्माण व्हावा.
सर्व फोटो- ‘ग्रेटफुल आर्ट बाय पूनम’ या यू-ट्यूब हँडलवरून साभार.

गणपत्ती बाप्पांना आसनस्थ होण्यासाठी आपली सुंदर, आकर्षक सजावट तयार झाली. या सजावटीत केवळ कागद आणि पुठ्ठा वापरला गेला आहे. थर्माकोलचा वा प्लॅस्टिकचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे ती इकोफ्रेंडली आहे. शिवाय त्यासाठी आपल्याला बहुदा केवळ लाल आणि सोनेरी कागद आणि सोनेरी रंग इतकंच साहित्य बाहेरून आणावं लागेल. (खरंतर हल्ली चतुरा सातत्यानं कलात्मक काही ना काही करत असल्यामुळे तेही घरात असू शकेल.) आपल्या घरात सतत काही नाही सामानाबरोबर जाड पुठ्ठ्याची खोकी येतात. ती नीट जपून ठेवली असतील, तर त्याचा पुठ्ठा निश्चित वापरता येईल.

करून पाहा ही अगदी सोपी गणपती सजावट. ती पाहून चारजण तुम्हाला नक्की त्याबद्दल विचारतील ही आमची खात्री!

(लेखिका डिजिटल कंटेंट क्रिएटर आहेत.)
grateful.art7@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2021 here are some innovative ganpati decoration ideas for home only in 100 rupees nrp