मेदिनी कोरगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याकडे गणपतीत निरनिराळ्या प्रकारे गौरी बसवल्या जातात- उभ्याच्या, मुखवट्यांच्या, खड्यांच्या… समाज आणि प्रदेशानुसार गौरींचा प्रकार वेगळा असला, तरी त्यांची सजावट मात्र सगळीकडेच केली जाते. यात गौरींच्या आजूबाजूला केलेली सजावट तर असतेच, पण आलेली गौर उत्तम साडी-दागिन्यांनी सजवण्यात घराघरातल्या ‘चतुरा’ रमून जातात. गौरी येणं, जेवणं आणि पाठवणी हा उत्सवातला दुसरा खास उत्सव! गौरींचे दागिनेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिसतात. यातले काही दागिने घरात परंपरागत पद्धतीनं चालत आलेले असतात. तरीही दरवर्षी कुटुंबं जशी गणपतीसाठी आवर्जून एखादा सोन्या-चांदीचा दागिना, चांदीची भांडी, अशा वस्तू खरेदी करतात, तसंच घरात कितीही पारंपरिक दागिने केवळ गौरींसाठी म्हणून आधीपासून असले, तरी दरवर्षी आणखी एखादा खास दागिना अगदी हौसेनं घेतला जातो. हा दागिना नेहमी पूर्ण सोन्याचाच असायला हवा असंही काहीही नसतं. सुंदर दिसणारे, पण इतर धातूचे असे ‘गोल्ड प्लेटेड’ दागिनेही मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. खोटे न दिसणारे, टिकाऊ आणि सामान्यांना परवडतील असे म्हणून हे दागिने गौरींच्या खरेदीत नेहमीच ‘ट्रेण्डिंग’ राहिले आहेत.

सणासुदीचे दिवस म्हणजे एकूणच स्त्रियांच्या नटण्यासजण्याचे दिवस. शृंगार म्हटलं की दागिना आलाच. दागिना, मग तो खऱ्या सोन्यामध्ये असो वा खोटा- ‘इमिटेशन’चा, तो शृंगाररसाला पूरकच असतो. आजच्या घडीला सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य स्त्रीवर्ग इमिटेशन ज्वेलरीकडे वळलेला दिसतो.

गौरींच्या दागिन्यांमध्ये गळ्यात चिंचपेटी, ठुशी, वज्रटीक असे अनेक प्रकारचे दागिने घातले जातात. बाजूबंद, कंबरपट्टा, कर्णभूषणं असे इतरही कित्येक दागिने असतात. सोन्यापेक्षा या दागिन्यांत एक ग्रॅम दागिन्यांची चलती बाजारात आहे.

एक ग्रॅमचे दागिने हुबेहुब सोन्यासारखे दिसतात, पण इमिटेशन ज्वेलरीपेक्षा अधिक छान दिसतात व टिकतात. यात गौरींच्या दागिन्यांमध्ये खूप नवनवीन डिझाइन्स बाजारात येत आहेत आणि ‘चतुरां’चा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. पारंपरिक दागिन्यांना नवं रूप देऊन पारंपरिक-आधुनिक असं मिश्र रूप ल्यालेले दागिने आज सगळीकडेच विशेष लोकप्रिय आहेत आणि गौरींचे दागिनेही त्याला अपवाद नाहीत.

गौरींचे नव्या तऱ्हेचे काही आकर्षक दागिने पाहू या.

क्रिस्टल ठुशी

क्रिस्टल ठुशी

गौरीसाठीचा आताचा नवीन ट्रेण्ड म्हणजे खऱ्याखुऱ्या खड्यांचे- स्टोनचे दागिने. एक- एक खडा धाग्यामध्ये गुंफून त्याचा गोफ तयार करायचा. यातला हातानं बनवलेला अतिशय आकर्षक दागिना म्हणजे ‘क्रिस्टल ठुशी’. यात दुहेरी माळेची म्हणजेच ‘डबल ठुशी’ नवीन आहे. ठुशी ही मुळात महाराष्ट्रातल्या लोकांना नवीन नाही. आपल्या पारंपरिक दागिन्यांचा हा अविभाज्य भागच. पण त्यात अनेक प्रयोग आजवर होत आले आहेत. पारंपरिक डिझाइनच्या ठुशीला कल्पक नवं रूप देऊन आणखी सुटसुटीत आणि मोहक करण्याचा प्रयत्न होतो आहे. गौरींच्या दागिन्यांमधला हा एक अतिशय लोकप्रिय दागिना.

गोल्डन लफ्फा

गोल्डन लफ्फा

हाही एक पारंपरिक दागिना आहे. शुद्ध तांब्यात (ब्रास) बनवलेल्या पेट्यांना गोल्ड मुलामा देऊन एक एक पेटी गादीवर घट्ट बांधत तयार झालेला हा गोल्डन ‘अँटीक’ शैलीतला लफ्फा. यातली कलाकुसर म्हणजे प्रत्येक पेटीच्या तळाला हातानंच घडवलेली खड्याची लटकन. हा लफ्फा परिधान केलेल्या गौरींचं रूप मोठं लोभसवाणं दिसतं. गळ्यालगत बसणाऱ्या गोल्डन लफ्फ्यासारखा मोत्यांचा हॅण्डमेड लफ्फाही गौरींसाठी आवर्जून खरेदी केला जातो.

बाजूबंद/ तोडा

बाजूबंद/ तोडा (सर्व फोटो- मेदिनी कोरगावकर यांच्या ‘कौमुदी ज्वेल्स’ यांचे…)

एक एक गोल्डन मणी गादीवर एका खाली एक बसवत घडवलेला हा आकर्षक दागिना आहे. गौरीच्या गळ्यात किंवा बाजूबंद वा तोडा म्हणून (आकारानुसार) तो परिधान करता येतो. विविध रंगांमध्ये मिळणारा हा दागिनाही जुन्या, सुंदर शैलीची आठवण देतो, कदाचित म्हणूनच गौरींच्या दागिन्यांमध्ये दरवर्षी त्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आणि यंदाही तोच ट्रेण्ड दिसून येतो आहे.

(लेखिका ज्वेलरी डिझायनर आहेत.)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2022 gauri ganesh jewellery traditional and trending nrp