संदीप चव्हाण
घरात वनस्पती लावताना त्याची पानगळ होणार नाही, वर्षभर पाने असतील अशा रोपांची आपण निवड करतो. मोठी पाने व जास्त पाणी लागणाऱ्या वनस्पतींची मुळेसुद्धा उथळ असतात. अशी झाडे आपण पसरट कुंडीत लावू शकतो. घरातील बाथरूममध्ये खिडकीत जिथे ऊन येते तसेच त्या जागी आर्द्रता असते तेथे नेचे व अळू ही रोपे होऊ शकतात.
घरातील हॉलमध्ये बरीच जागा असते. तेथे एखाद्या कोपऱ्यात मोठ्या कुंडीत मॉसस्टिक लावून वाढणारे औषधी वेल लावू शकतो. या सर्वांची पाने फार छान तजेलदार असतात. या पानांचा उपयोग, त्यांना येणाऱ्या फळांचा उपयोग आपण आपल्या आहारात आरोग्यासाठी नक्की करू शकतो. बुशपेपर नावाने कुंडीत वाढणारी काळीमिरीची रोपे नर्सरीत मिळतात. शोभेचे रंगीत अळू, अर्धसावलीत वाढणारे झिपरीचे (अरेलिया) प्रकार हॉलमध्ये चांगले वाढू शकतात. त्यांची वाढ संथ असते व पाने झाडावर खूप दिवस टिकतात. त्यांना पाणीसुद्धा कमी लागते.
गॅलरीत किंवा जिन्यात आपण शोभेच्या रंगीत पानांचे कोलियस, क्रोटॉन्स, मरांटा, डिफेनढोकिया, अल्पेनिया इत्यादींचे अनेक प्रकार आपण कुंडीत लावून सजावट करू शकतो. या सर्व वनस्पती पानांच्या रंगासाठी उपयुक्त आहेत. फुलांमध्ये अबोलीचे प्रकार सावलीत वाढू शकतात.
मध्यम ऊन असलेल्या जागी जाई, जुई, मोगरा, कृष्णकमळाच्या जाती व रंग, चमेली, सायली यासारख्या सुगंधी फुलं येणारे वेल, इ. गॅलरीतील ग्रिलवर नक्कीच चढवू शकतो. या ॲरोमाथेरपीबद्दल आपण सर्वच ऐकतो. या फुलांचे सुगंध स्त्रियांच्या वेगवेगळ्या रोगांवर खूप उपयुक्त आहेत. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येणारी त्यांची फुले शरीरात उष्णता व थंडावा निर्माण करतात. मोगऱ्याला आधार मिळाला तर तो वेलीसारखा वाढू शकतो.
जास्त जागा व ऊन असेल तर आपण त्यात भाजीपाल्याची झाडेसुद्धा हंगामाप्रमाणे लावू शकतो. कुंडीमध्ये कढीपत्ता, पुदिना, गवती चहा, आले अशा आरोग्यकारक वनस्पतींसोबत वांगी, मिरची, कोबी, काकडीसुद्धा कुंडीत वाढतात. झुकिनी, ब्रुकोली, लेटय़ुस अशा कमी दिवसांच्या परदेशी भाज्या हिवाळ्यात लावून त्यांची फळे खाऊ शकतो. पावसाच्या शेवटी सप्टेंबरमध्ये त्यांची रोपे करून कुंडीत लावली तर हिवाळ्यात त्या भाज्या आपल्याला मिळतात. गॅलरीत ग्रिलमध्ये २ ते ३ ट्रेमध्ये गव्हांकुर करून त्याचा रस घेऊन आरोग्य व आजार सुधारता येतात. तसेच पालेभाज्यासुद्धा लावता येतात. कोथिंबीर, मेथी, पालक यांसारख्या भाज्या रोटेशनने लावता येतात, ज्या दोन महिन्यांत तयार होतात. टोमॅटो, मिरची इ.सारखी भाजी तर आपण जवळजवळ वर्षभर लावू शकतो. फक्त दर तीन ते चार महिन्यांनी त्यांची नवीन रोपे करून लावावीत.
काकडी, कारर्ली, तोंडली इ.ची रोपे लावून कमी जागेत चार जणांसाठी भाजी मिळवू शकतो. ही आरोग्यपूर्ण घरात तयार झालेली भाजी आपल्याला नक्की आनंद देऊन जाते.