प्रदर्शन पाहताना जितकी मजा येते तितकीच मजा बाहेरील दुकानांना भेट देताना येते. प्रदर्शनात पाहिलेल्या रचना, प्रयोग यांसाठी लागणारं सर्व साहित्य या बाहेरच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतं. अनेक प्रकारची फुलझाडे, वेली तसेच मोठ्या कुंडीत लावलेली फळझाडं. थोडक्या जागेत लावलेला कुंडीतील भाजीपाला, बांबूच्या सहाय्याने घातलेले छोटे सुबक मांडव, मिंट, पुदीनापासून हाडजोडी पर्यंतची अनेक औषधी झाडं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळ्याचे दिवस आले की जशी मैफिली, समारंभ यांची रेलचेल होते, तशीच विविध प्रदर्शनं ही भरू लागतात. बागप्रेमींसाठी हे दिवस फार महत्त्वाचे असतात. वर्षभर पुरतील इतक्या गोष्टी याच दिवसांत खरेदी करता येतात. अनेक नवनवीन प्रयोग जाणून घेता येतात, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करता येते. प्रत्येक मोठ्या शहरात फळे व भाजीपाला, पुष्परचना, सृष्टीमित्र अशा विविध संकल्पना राबवत अनेक प्रदर्शनं भरवली जातात. या प्रदर्शनांना भेट देणं म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण घेणं आहे.

बी.एस्सीला असताना मोझेस कोलेटसरांबरोबर आम्ही दरवर्षी एखादं धार्मिक कार्य असावं तसं भक्तीभावाने प्रदर्शनांना हजेरी लावत असू. वर्गात काय होईल, इतका अभ्यास या एका प्रदर्शन भेटीत होत असे. वनस्पतींची कुळे, जाती, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे उपयोग आणि मुख्य म्हणजे त्यांची लॅटीन नावे सगळ्या सगळ्याची उजळणी होई. दरवर्षी फ्रेंड्स ऑफ ट्रीजतर्फे भरवलं जाणारं प्रदर्शन तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे. अजूनही ती परंपरा चालू आहे फ्रेंड ऑफ द ट्रीजतर्फे साधारण फेब्रुवारी महिन्यात हे प्रदर्शन भरवले जाते. यात सर्वोत्कृष्ट रचना, फळं, भाजी, बोन्साय अशा विविध स्पर्धा तर असतातच, पण बाग प्रेमींसाठी निरनिराळ्या कार्यशाळा ही असतात.

हेही वाचा : समुपदेशन : ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ मधे आहात का?

प्रदर्शन पाहताना जितकी मजा येते तितकीच मजा बाहेरील दुकानांना भेट देताना येते. प्रदर्शनात पाहिलेल्या रचना, प्रयोग यांसाठी लागणारं सर्व साहित्य या बाहेरच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतं. अनेक प्रकारची फुलझाडे, वेली तसेच मोठ्या कुंडीत लावलेली फळझाडं. थोडक्या जागेत लावलेला कुंडीतील भाजीपाला, बांबूच्या सहाय्याने घातलेले छोटे सुबक मांडव, मिंट, पुदीनापासून हाडजोडी पर्यंतची अनेक औषधी झाडं. किटकभक्षी वनस्पती विशेषतः घटपर्णी सारख्या वैशिष्ट्य पूर्ण वनस्पती इथे बघायला मिळतात. बोगनवेलींच्या सुंदर रचना, पाम ट्रीजचे प्रकार, नेचे म्हणजेच फर्नसचे प्रकार, क्रोटन, युफोरबिया, सक्युंलंटस्, कैक्टस विविध लॉन, माती विरहित बाग, टेरारियम, कोकोडेमा, बोन्साय असे विविध प्रकार त्यांच्या रचना, विविध मिनीएचर जाती, हैंगिंग, एकाच प्रकारच्या रोपांपासून केलेल्या गुंतागुंतीच्या रचना, पाणवनस्पती असं सगळं सगळं इथे बघता येतं, निरखता येतं. नकळत खूप शिक्षण मिळतं. समोर मांडलेले ते विस्मयकारी प्रयोग, त्या रचना आपल्याला इतक्या गुंतवून ठेवतात की आपण एकाचवेळी रंग, गंध, स्पर्श, दृष्टी हे सगळे इंद्रियजन्य अनुभव घेतं ते सगळं सगळं जणू आपल्या आतमध्ये मुरवून घेतो.

माहिती बरोबरच एक विचारांचं सुसूत्र चक्र अव्याहत सुरू राहतं. हा अवलोकन सोहळा सुरू असताना आपल्या आजूबाजूला अनेक निसर्गप्रेमी, अभ्यासक, प्राध्यापक, वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी असतात. त्यांच्या संवादातून अनेक गोष्टी कळतात. मुंबईत शासनातर्फे भरवलं जाणारं फळं आणि भाज्यांचं प्रदर्शनसुद्धा असंच वैशिष्ट्यपूर्ण असतं.

हेही वाचा : स्त्री आरोग्य : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कसा टाळाल?

बागप्रेमींनी अशा प्रदर्शनांना आवर्जून भेट द्यायला हवी. अशाच एका प्रदर्शनात फिरताना मला मोठ्या आकाराच्या शंखांमध्ये केलेल्या रचना आढळल्या. प्रदर्शनाबाहेरील दुकानांमधे तसेच शंख विक्रीला ठेवले होते. विद्यार्थी दशेत मुळात पैशांची कमतरता असते अशावेळी बजेटमध्ये बसणारे ते छोटे मोठे शंख मी विकत घेतले. मोठ्या कुंड्या आणि इतर सामान तर आवाक्या बाहेरचं होतं. शंखांची मात्र मनसोक्त खरेदी केली. घरी आल्यावर छोट्याशा रिबीन ग्रासपासून ते गणेशवेलींपर्यंत सगळी झाडं या शंखात लावली. लहानमोठ्या आकाराचे हे सुंदर शंख इतके आकर्षक दिसत होते की कोणीही सहज प्रेमात पडावं. पुढे या शंख रचनांची विक्री करून मी वनस्पती शास्त्राची दोन महत्त्वाची आणि आवश्यक पुस्तकं खरेदी केली. तो आनंद काही वेगळाच होता.

बाग प्रेमींसाठी ही प्रदर्शनं म्हणजे माहितीचा मोठा खजिनाच असतात, त्यामुळे ती मुळीच चुकवू नका. वेळात वेळ काढून त्यांना आवर्जून भेट द्या.

mythreye.kjkelkar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garden plants exhibition in winter season css