सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या मोकळ्या वेळात करायचं काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. उभं आयुष्य ऑफिसमध्ये गुंतलेल्यांना हा प्रश्न पडतोच, पण ज्यांनी घर आणि ऑफिसव्यतिरिक्त आजवर आपला परीघ वाढवला नव्हता किंवा विविध कारणांनी त्यांना तो वाढवता आला नाही, त्यांना सेवानिवृत्तीनंतर हाताशी आलेला वेळ आनंदाचा न वाटता कंटाळवाणा होण्याचीच शक्यता अधिक असते. यात स्त्री आणि पुरूष अशी तुलना करून पाहिली, तर सर्वसाधारणपणे असं दिसून येतं, की अनेक स्त्रियांचा मैत्रिणींचा गोतावळा, पुरूषांच्या ‘मित्रांच्या कट्ट्या’प्रमाणे प्रौढ वयात टिकलेला नसतो. त्यामुळे स्त्रियांना निवृत्तीनंतर केवळ घरकामात अडकून न राहाता मोकळ्या वेळात काय सकारात्मक करता येईल, याचा विशेष शोध घ्यावा लागतो. यावर हल्ली काही मंडळी एक चांगलं उत्तर शोधत आहेत, ते म्हणजे बागकाम.
आणखी वाचा : तान्ह्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक असते? कसे ओळखावे?
बागकाम ही गोष्ट आपल्याला वाटते तितकी सोपी नसली, तरी ती फार अवघडही नाही. किंवा बागकाम करण्यापूर्वी त्याचा काही विशिष्ट अभ्यासक्रम करायलाच हवा, असंही नाही. आपल्या जमतील तशी, अगदी चार कुंड्यांत साधीशी झाडं लावूनही आपण ‘चतुरा’ बागकामाची सुरूवात करू शकू. अनेकांकडे स्वयंपाकघरातील ओट्याला लागून असलेल्या खिडकीला ग्रिल बसवून खिडकीच्या पुढे थोडीशी बंदिस्त जागा केलेली आढळते. हल्लीच्या आधुनिक इमारतींमध्ये हॉलच्या खिडक्यांनाही अशा प्रकारे कुंड्या ठेवण्यासाठी ग्रिल केलेलं असतं. पुष्कळ जणांच्या घरांना बाल्कनी वा व्हरांडा असतो. यापैकी कुठेही अगदी एक किंवा दोन कुंड्यांमध्ये आपल्या आवडीचं छोटंसं झाड लावून सुरूवात करू या.
आणखी वाचा : विवाह समुपदेशन : प्रेमाचे काचणारे बंध
पटकन रुजणारी, फारशी काळजी न घ्यावी लागणारी झाडं आधी लावता येतील. उदा. विविध फुलझाडं (तयार मिळणारी रोपं लावून), कढीपत्ता (तयार रोप लावून), बडिशेप (बडिशेपेचे दाणे पेरून), कांदा आणि आलं (अख्खा कांदा वा आल्याचा अख्खा कंद पेरून), कोथिंबीर (धने पेरून), मिरची (मिरचीच्या बिया पेरून), कारलं, घेवडा, वालपापडीसारख्या वेलभाज्या (या भाज्यांच्या घरी सुकवलेल्या बिया पेरून) ही झाडं लगेच मूळ धरतात, त्यांना खूप जास्त जागा लागत नाही, शिवाय त्यांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. रोज झाडाला पाणी, ऊन योग्य प्रमाणात मिळेल हे पाहिलं आणि पाखरांपासून कोवळी रोपं वाचवली की झालं. तुम्ही लावलेलं एक जरी झाड रुजलं, की तुमचा हुरूप किती वाढतो ते बघा! मग तुम्ही आणखी खोलवर माहिती घेऊन अधिक देखभालीची रोपं लावू शकाल. आणखी थोडा रस वाढला की बागकामाचा एखादा अभ्यासक्रम करून आपल्या ज्ञानात आणि बागेत भर घालू शकाल.
आणखी वाचा : उपयुक्त : …अशी करा बाह्यांची फॅशन!
काही सेवानिवृत्त मंडळी असे प्रयत्न करतही आहेत आणि समाजमाध्यमांवर त्यांच्या बागेतील यशाचे फोटो पाहायला मिळतात. असाच एक अनुभव आहे कलाकार कुमार रणदिवे यांचा. रणदिवे यांनीही सेवानिवृत्तीनंतर बागकाम सुरू केलं. त्यांनी घरातील गच्चीचा वापर करुन बागकाम करण्याचं निश्चित केलं आणि यूट्यूबवर रीसर्च करून संपूर्ण माहिती गोळा केली. मग कुंड्या, ग्रो-बॅग, माती, खत, काही रोपं खरेदी केली. त्यांच्या बायकोलाही बागकामाची आवड असल्यामुळे तिची त्यांना साथ मिळाली.
आणखी वाचा : विधवांनीच का हे सहन करायचं? आणि आणखी किती काळ?
समाजमाध्यमांवर फोटोंसह गाजणाऱ्या आपल्या पोस्टमध्ये रणदिवे म्हणतात,‘मी लहान रोपं कुंड्यांमध्ये आणि काही भाज्यांच्या बिया ग्रो-बॅगमध्ये लावल्या. हळूहळू बाग बहरली तसा हुरूप वाढला. घरातल्या कचऱ्यापासून खतं तयार केली. सर्व कुंड्या आकर्षक रीतीनं रंगवल्या. झाडांना भरपूर फुलं येऊ लागली, भाज्या काढणीला आल्या. खालून रस्त्यावरून जाणारी लोकं वळून वळून माझी बाग पाहात होते! दहा रंगांची जास्वंद, आठ रंगाची बोगनवेल, मोगरा, जाई-जुई, गोकर्ण, चिनी गुलाब आणि बरीच फुलं! बागेत नुसती रंगांची उधळण सुरू झाली. घरच्या ‘ऑरगॅनिक’ भाज्या खाताना वेगळीच मजा आली. दोन-तीन ठिकाणी मी स्वतः घरीच कृत्रिम वॉटरफॉल्स (धबधब्यांची सजावट) बनवले. बाग सुंदर रूप घेऊ लागली आणि लोक बघायला येऊ लागले. एखादं झाड जास्त-कमी पाण्यानं दगावतं तेव्हा आपल्या शेतकऱ्यांची अवस्था मला जाणवते. रोज सकाळी उठल्यावर गच्चीत जाऊन झाडं न्याहाळून, कालच्यापेक्षा आजचा बदल बघून मन प्रसन्न होतं. रोजचा वेळ कसा जातो हे कळतदेखील नाही!’
आणखी वाचा : वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?
इतरही सेवानिवृत्त मंडळी, विशेषत: सेवानिवृत्त मैत्रिणी- चतुरा केवळ घरच्या धबडग्यात गुंतून न राहाता बागकामात निखळ आनंद मिळवू शकतील. स्त्रियांना तर नवनिर्मितीची आस मुळातच असते. नवा जीव प्रेम देऊन जगवण्याचं कौशल्यही त्यांच्यात जात्याच असतं. त्यामुळे आपल्या ‘चतुरा’ बागकामाचा छंद निश्चितपणे लवकर आपलासा करू शकतील यात शंका नाही! तुम्ही मैत्रिणी असं काही करत असाल, तर आम्हाला तुमचा अनुभव आणि तुमच्या घरातल्या तुम्ही रुजवलेल्या बागेचे फोटोही जरूर पाठवा.
संपर्क – lokwomen.online@gmail.com