कठोर परिश्रमाचं फळ हे एक ना एक दिवस नक्कीच मिळतं. त्यापैकीच एक ताजं उदाहरण म्हणजे, कर्नाटकमधील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील गणेश नगरमधील गौरी चंद्रशेखर नायक. त्यांनी गावखेड्यातील लोकांच्या पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी विहिरी खोदण्याची शपथच घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी दोन विहिरी खोदल्या आहेत. आता तिसऱ्या विहिरीचं कामसुद्धा चालू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५२ वर्षांच्या गौरी यांचं शिक्षण जेमतेम दुसरीपर्यंत झालं असलं तरी त्या शिक्षणाचं महत्त्व पुरतं ओळखून आहेत. त्यांच्या गावात आठवड्यातून दोनदाच पाणी येतं. गावातील शाळेत पाण्याचा तुटवडा भासत असे, त्यामुळे गावातील मुलं शाळेत जाण्यास टाळाटाळ करत. म्हणून त्यांनी पहिली विहीर शाळेजवळच खोदायचा विचार केला. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन विहीर खोदायला सुरुवात केली आणि तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर पहिली विहीर खोदून तिला पाणीसुद्धा लागलं अन् त्यांच्या पहिल्याच प्रयत्नाला यश आले. गौरी म्हणतात की, मी विहिरीला मंदिर मानून माझ्या कामाला सुरुवात करते. विहीरीत खोदताना खोलवर जाण्याची भीती वाटत नाही, पण खोलवर गेलं की पाणी लागेल की नाही याचीच भीती वाटते.

आणखी वाचा-‘क्लॉडिया शेनबॉम’ पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनून घडवला इतिहास! कोण आहेत क्लॉडिया शेनबॉम जाणून घ्या

त्यांनी दुसरी विहीर त्यांच्याच शेतात खोदली. त्यांची सहा गुंठे जमीन आहे. त्यात सुपारी व केळ्यांची लागवड केली आहे. पण त्यांना पुरेसं पाणी मिळत नव्हतं म्हणून त्यांनी दुसरी विहीर स्वत:च्याच शेतात खोदायची ठरवलं. पण दुसरी विहीर खोदताना पहिल्या विहीरीसारखं पाणी लागेल की नाही याची चिंता त्यांना होती. खूप विचार केल्यानंतर त्यांनी ‘काय होईल ते होईल’ असा विचार करून शेतात विहीर खोदायला सुरुवात केली अन् काही अंतरावर विहीरीला पाणी लागलं. अशाप्रकारे दुसरी विहीर खोदण्याच्या कामालादेखील यश आले.

गौरी या विहीर खोदण्यासाठी कोणतंही अत्याधुनिक तंत्रज्ञान न वापरता फावडे, बादली आणि दोरी एवढ्याच साधनांचा वापर करून विहीर खोदण्याचे काम करत आहेत. विहीर खोदाताना चढ-उतार करायला यावे यासाठी पाय ठेवण्याइतपत लहानलहान पायऱ्या देखील तयार करतात. विहिरी खोदाताना त्यांना अडचणीदेखील येत होत्या. खोदकाम करताना त्यांच्या छातीत देखील दुखू लागलं होतं. तसेच पाणी नाही मिळालं तर पुढे काय असे विचार मनात येत होते. पण त्या डगमगल्या नाहीत. हे काम करताना उर्जा वाढवण्यासाठी जेवणासोबतच, बिनासाखरेचा काळा चहा, थोडे शेंगदाणे असा त्यांचा आहार असे. आज गौरी यांची शेतातील विहीर फक्त त्यांच्या शेतीसाठीच नाही तर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या त्यांच्या गावकऱ्यांसाठी एक पाण्याचा स्रोत बनली आहे.

आणखी वाचा-पॉडकास्टर, गोल्फर अन् भारतातील OpenAI मध्ये निवड झालेली पहिली व्यक्ती! जाणून घ्या कोण आहेत प्रज्ञा मिश्रा?

गौरी म्हणतात “आपल्याला आपल्या मनासारखं काम करून आनंदी राहायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. तुमची कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही हाती घेतलेलं कोणतंही अवघड काम सहज पूर्ण करू शकता. गौरी यांच्या मुलांनादेखील त्यांच्या आईच्या विलक्षण कामगिरीचा सार्थ अभिमान आहे. ते म्हणतात की, आमची आई पहिल्यापासूनच कामसू आहे. आमचे वडील दहा वर्षांपूर्वी गेले. आता आम्ही बहीण-भाऊ दोघेही कामाला जाऊन व्यवस्थित पैसे कमवत आहोत. अशावेळी आई घरी शांतपणे बसून राहू शकते. पण तिच्या कामसूपणामुळे ती शांत बसत नाही. सतत काही ना काही काम करण्याची तिची इच्छा असते. आणि गावात पाणी समस्या असल्यानं तिनं आता गावातील पाणी समस्या दूर करण्याचा निश्चय घेतला आहे.

गौरी यांच्या या कार्यकुशलतेमुळे त्यांची तुलना दशरथ मांझी यांच्याशी केली जात असून विभागात त्यांना लेडी भगीरथ म्हणून ओळखले जात आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri chandrasekhar nayak lady bhagirath of karnataka mrj