-सिद्धी शिंदे
Gautami Patil Lavani Viral Video: काय मग मंडळी, गौतमी पाटीलची लावणी पाहिलीत का? पांढरी साडी, निळा ब्लाउज, अंगावर पाणी ओतून नाचणारी… किती अश्लील आहे ना? तिच्या डान्स व्हिडीओच्या कमेंटस् वाचत होते, काहींनी लिहिलं होतं की, खरंच अशा लोकांना बॅन करायला हवं, संस्कृतीची समज आहे का यांना, लावणीमधला ‘ल’ तरी समजत असेल का… पण काय हो या गौतमीच्या प्रसिद्धीमध्ये एक व्ह्यू तुमचाही आहेच ना?
Every Publicity Is Good Publicity… शो बिझनेसचं एक साधं सोपं गणित.. लोकं वाईट बोलत असले तरी तुमच्याविषयी बोलत आहेत हीच गोष्ट अनेक सेलिब्रिटींना शो बिझनेसमध्ये टिकून राहण्यासाठी मदत करते. ही गौतमी पाटीलही काही त्याला अपवाद नाही. आतापर्यंत गौतमीचं नाव जेव्हा जेव्हा समोर आलं तेव्हा अनेकांनी नाकं मुरडली, तोंडं फिरवली. चांगली गोष्ट आहे, लावणी- तमाशाची अब्रू वाचवण्यासाठी लोकं पुढे येत आहेत याचं कौतुकच करायला हवं. पण एक गोष्ट कळत नाही की शंभर लोकांचं मत हे गौतमीच्या विरुद्ध असेल तर गौतमीच्या शोला शंभर टक्के गर्दी कशी काय होते?
गौतमी पाटील अश्लील नाचते म्हणे.. निश्चितच! बिभत्सतेचा कळस म्हणता येईल इतकं, विचित्र आणि उच्श्रृंखल आहे तिचं. तुलनाच करायची तर अशी एक गोष्ट/वस्तू/ व्यक्ती आठवा जिचं नाव घेताच तुम्हाला अगदी शिसारी यावी. आता मला सांगा त्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही पैसे मोजाल का? नाही ना? पण मग गौतमीचा किळसवाणा ठरवलेला डान्स पाहायला लोकं पैसे मोजायला का तयार होतात? याचा अर्थ ती जे करतेय ते समाजातल्या त्या ‘रसिक’ मंडळींना पाहावंसं वाटतंय. टीका करण्यासाठी असो किंवा आनंद घेण्यासाठी.. पण लोक ते पाहतात, अगदी तुम्ही आणि मीही! आणि यातूनच गौतमीसारखी मंडळी मोठी होतात.
अनेकांनी गौतमीवर ताशेरे ओढले. पण मंडळी अर्थशास्त्रात एक साधी संकल्पना आहे मागणी तसा पुरवठा! मग अशावेळी शंभर टक्के दोष गौतमीला कसा देता येईल? आजवर अनेकदा ‘आयटम सॉंग्स’वरही टीका झाली पण सगळ्या कार्यक्रमात हीच गाणी तर वाजतात ना? अगदी हळदीपासून ते गणपतीच्या मिरवणुकीतही, ही गोष्ट आपल्यापैकी कितीजण अमान्य करतील?
अश्लीलतेचा टॅग लावणाऱ्यांनी अश्लीलतेची व्याख्या सांगावी, जमेल का? एखादा माणूस चौकात उभा राहून अश्लील नाचू लागला तर निश्चितच त्याला दोष देऊ शकता, त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण त्या माणसाला जेव्हा तिथे येण्यासाठी पैसे दिले जातात, सर्वजण त्याच्या त्या वेड्याचाळ्यांची मज्जा घेतात, आपल्या फोनमध्ये शूटिंग करतात, तिथे शिट्ट्या, टाळ्या वाजवतात अशा लोकांना त्या माणसाला नावं ठेवण्याचा काय हक्क आहे? आपल्यापैकी अनेकजण म्हणतील… आम्ही नाही जात पाहायला. पण आज प्रत्येकाला गौतमीचं नाव माहीत आहे, तिचा डान्स पाहिलेला आहे यातच सगळं आलं, नाही का? तुमचाही एक व्ह्यू हा तिच्या प्रसिद्धीला खतपाणी देतोय, हो ना?
राहता राहिला प्रश्न गौतमीचा… कितीही मागणी असली तरी पुरवठा करणं- न करणं हा निर्णय विक्रेत्याचा असतो बरोबर? तो निर्णय तिने घेतला, त्यामागची मानसिकता, मूल्य कितीही चिंताजनक असली तरी तो सर्वस्वी तिचा निर्णय आहे. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बाबत असाच एक ऐतिहासिक निर्णय दिला होता, सोप्या शब्दात सांगायचं तर ‘देहविक्री करणं हा सर्वस्वी त्या महिलेचा निर्णय असायला हवा’, ती महिला कुणालाही बळजबरी करत नसल्यास तिच्याकडे जाणं, न जाणं हे ठरवण्याची मुभा प्रत्येकाला असते. अन्यथा गौतमीचं नाचणं थांबण्यासाठी तिचा नाच पाहायला जाणं, तिला त्यासाठी आमंत्रण देणं हे तिच्याकडून नव्हे तर आपल्याकडून थांबायला हवं.
एक महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे गौतमीला जी मंडळी सांगतात की बाई म्हणून हे असं वागणं चुकीचं आहे, आज तू आहेस उद्या तुझ्या जागी दुसरी गौतमी येईल, हे सांगितल्याने गौतमी बदलेलही, कदाचित! पण ज्या मागणीतून आज गौतमी उभी राहिली ती मागणी थांबवणं हे अधिक महत्त्वाचं आहे… नाही, का?
मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
या सगळ्या व्यक्तिरिक्त गौतमीलाही एक प्रांजळ सल्ला द्यायचा झाला तर इतकंच सांगेन, बाई गं ! आज तू तुझा निर्णय घेतला आहेस, तुझं भविष्य तुझ्या हातात.. काही दिवसांपूर्वी तू इमोशनल होऊन स्वतःच्या कुटुंबाची कहाणी सांगितलीस. स्वतःची दया यावी यासाठी हे मार्ग निवडू नकोस, तुला पैसे दिले जातात , तुला नाचायला आवडतं तर ते बिनधास्त कर, आणि जर हे आवडत नसेल तर वेळीच थांब!