डॉ. राजन भोसले, लैंगिक विज्ञानतज्ञ
अनेक लहान मुलांना जननेंद्रिय हाताळण्याची सवय असते. त्यावर पालक मुलांना रागवतात. ही सवय जावी म्हणून मारतातही. यामुळे मुले अधिकच बिथरू शकतात. काय आहेत त्यामागची कारणे आणि कशी सोडवाल ही सवय.
प्रश्न: माझा चार वर्षांचा मुलगा, रात्री झोपेत स्वत:चे लिंग हाताने घट्ट पकडून झोपतो. हात सोडवण्याचा प्रयत्न केला तर झोपेतच किंचाळून उठत रडायला लागतो. काही दिवसांपूर्वी त्याला दिवसा जननेंद्रियाशी खेळत राहण्याची घाणेरडी सवय लागली होती. त्यावेळी मी अनेकदा त्याच्यावर रागावले, हातावर चापट्या मारल्या व हातमोजे घालूनही बसवलं. आता ती सवय गेली आहे व ही नवीन सवय लागली आहे. उद्या मोठा झाल्यावर त्याच्यात लैंगिक विकृती तर निर्माण होणार नाही ना, याची मला काळजी वाटू लागली आहे.
उत्तर : लहान मुलं निरागस असतात. जननेंद्रियाचा लैंगिकतेशी असलेला संबंधही त्यांना माहीत नसतो. शरीराचे इतर अवयव व जननेंद्रिय यांमध्ये त्यांच्या मनात जराही भेदभाव नसतो. तो आपल्या मनात असतो. जसे नाक, कान, हात, पाय तसे जननेंद्रिय – असा त्यांचा निष्पाप दृष्टीकोन असतो. पालकांच्या मनात मात्र जननेंद्रियांबाबत पूर्वग्रह असतात. जननेंद्रियाच्या लैंगिकतेशी असलेल्या संबंधांबाबत त्यांच्या वैयक्तिक धारणा जुळलेल्या असतात. त्यामुळे मुलं जननेंद्रियांना हात लावताना बघून पालक विचलित होतात. काहीतरी चुकीचं घडतंय असा समज करून घेतात व जे मुलांच्या ध्यानी – मनीही नाही, त्याकडे मुलांचं लक्ष वेधलं जातं.
निसर्गाने आपल्याला दिलेला कुठलाही अवयव निकृष्ट दर्जाचा किंवा ‘घाणेरडा’ नाही. प्रत्येक अवयवाचं स्वत:चं असं एक कार्य असतं व स्वत:चं असं महत्त्व असतं. मुलं जेव्हा जननेंद्रियाला स्पर्श करतात किंवा न्याहाळतात तेव्हा त्यामध्ये लैंगिकता नव्हे, तर कुतूहलाचा भाग प्रामुख्याने असतो. प्रत्येक अंग – प्रत्यंगाची माहिती करून घ्यावी, असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. जननेंद्रियाला हात लावताच होणाऱ्या पालकांच्या प्रतिक्रिया पाहून मुलं संभ्रमात पडतात व त्यांच्यातील निरागस कुतूहलावर आघात होतात. जननेंद्रियाबद्दल एक ‘हीन’ पणाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. ही भावना वाढत्या वयाबरोबर वाढत जाा्रन मग पुढे वयात आल्यावर त्याचे पडसाद त्यांच्या लैंगिकतेवर, नातेसंबंधांवर व इतर अंगांवर उमटू लागतात.
जननेंद्रियाला हात लावण्याबद्दल जेव्हा पालक मुलाला रागावतात किंवा मारतात; तेव्हा असं करत असतानाच आपण मुलामध्ये एक विक्षिप्ततेचं किंवा न्यूनगंडाचं बीज रुजवत आहोत, हे पालकांच्या ध्यानात येत नाही. तुमचा मुलगा दिवसा जननेंद्रियाला हात लावत असताना तुम्ही त्याच्याशी जे कडक वागलात त्यामुळेच झोपल्यानंतर स्वत:च्या जननेंद्रियाबद्दलच्या संरक्षणात्मक काळजीतून त्याच्याकडून हा प्रकार घडतो आहे. त्याचं सुप्त मन कुठेतरी ही भीती बाळगून आहे की, माझा हा अवयव आईला आवडत नाही. त्याच्या मनाने करून घेतलेला हा समज दूर करण्यासाठी आधी तुम्ही तुमचे पूर्वग्रह दूर सारा. इथून पुढे जुन्या चुका करू नका.
तुमचा मुलगा फक्त् चार वर्षांचा आहे. आईचा पवित्रा बदललेला पाहून त्याच्या मनातील ही भीती हळूहळू कमी होईल. तसे न झाल्यास पुष्पौषधी उपचार पद्धतीने त्याचा इलाज करणं फारसं अवघड नाही. बालपणी मनावर झालेल्या आघात व जखमांवर पुष्पौषधींमध्ये अत्यंत प्रभावी उपचार आहेत. बरोबरच एखाद्या समुपदेशकाची मदत घ्यायला हरकत नाही.
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.