मुलाखत : अभिनेत्री श्रेया बुगडे
कुठल्याही क्षेत्रात पाय रोवून घट्ट उभे राहायचे तर त्या व्यक्तीच्या कौटुंबिक सदस्यांचे प्रोत्साहन आवश्यक असते, मग तो पुरुष असो अथवा स्त्री! आजही स्त्रीला तिच्या आवडत्या क्षेत्रातले करिअर करणे तितकेसे सोपे नाही. पण माझ्याबाबत मी सांगेन, की मी खूप लकी आहे. मला माहेर आणि सासर दोन्हीकडून नेहमीच प्रोत्साहन आणि आनंद मिळाला.
मी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आले. माझ्या आईचे बालपण अलिबागमध्ये गेले. आईला अभिनय, नाटकाची खूप आवड होती, लग्नाआधी शाळा-कॉलेजमध्ये असताना तिने जमेल तशी आपली अभिनयाची हौस भागवून घेतली. आई लग्नानंतर मुंबईला म्हणजे सासरी आली. माझे वडील सेंट्रल एक्साइजमध्ये नोकरीला होते. बाबांना वाचनाची, साहित्याची खूप आवड होती, ते कलाप्रेमी आहेत. आईला फॅशनेबल राहणे आवडे, बेल-बॉटम, पंजाबी ड्रेस, चुडीदार कुडता घालणे तिला आवडे. माझी मावशी पुण्यात राहत असे, ती आईसाठी पुण्याहून ड्रेस शिवून आमच्या घरी, मुंबईत पाठवत असे. पण आमच्या आजीला असे फॅन्सी कपडे घालणे आवडत नसे. अगदी घरात गाऊन घालणंदेखील चालत नसे, त्यामुळे आईला साडीच नेसावी लागे, पण तिने आजीला दुखावले नाही. स्वतःच्या आवडी-निवडी गुंडाळून ठेवल्या, त्यामुळे नाटकांत काम करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. मात्र वडिलांचा साहित्य, कला, वाचन, संस्कृती, नृत्य यांचा वारसा तिने आमच्यापर्यंत पोहोचवला. या आवडी-निवडी आमच्यात तिच्यामुळे उतरल्या. शाळेत असल्यापासूनच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी भाग घेऊ लागले. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशनमध्ये मी चांगल्यापैकी परफॉर्म करू लागले. आईच्या एका मैत्रिणीने मला निर्मात्या -दिग्दर्शिका मीना नाईक यांच्याकडे पाठवण्याचा सल्ला दिला. मी ८ वर्षांची असताना मीना नाईक यांना प्रथम ‘पृथ्वी थिएटर’मध्ये भेटले, त्यांच्या भेटीनंतर मी बालनाट्यातून कामे करू लागले. रत्नाकर मतकरी लिखित ‘चमत्कार झालाच पाहिजे’ हे माझे पहिले नाटक. पुढे हा प्रवास चालूच राहिला, आजतागायत. प्रत्येक क्षणाचा मी आनंद भरभरून लुटला. लुटत आहे.
माझ्या कारकीर्दीचे हे २६वे वर्ष! आणि मला अपार लोकप्रियता मिळवून देणाऱ्या ‘झी मराठी’ शोचे हे नववे वर्ष. मधली काही वर्षं संघर्षाची होती. मात्र तो काही प्रमाणात संपला तो ‘हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमुळे. घराघरांत पोहोचले. आजवर या एका शोमधल्या २००० पेक्षाही अधिक व्यक्तिरेखा मी रंगवल्या आहेत. त्या प्रेक्षकांना आवडल्याही आहेत, पण एका धडपड्या आणि अभिनयाच्या प्रेमापोटी निष्ठेने काम करणाऱ्या कलावंताचा संघर्ष चांगल्या भूमिकांच्या शोधार्थ चालूच असतो. तो चालूच राहणार.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये, बहुतांशी पुरुष कलाकार आहेत, कॉमेडी भूमिका स्त्रियांच्या वाट्याला फारशा येत नाहीत, विनोदी भूमिका समर्थपणे करणाऱ्या स्त्री कलाकारांची संख्या तुलनेने कमी आहे. त्याचमुळे पुरुषप्रधान विनोदाच्या राज्यात माझी काही कुचंबणा तर होत नाही, असे मला कधी थेट विचारले जाते, तर कधी आडून! पण गेली ९ वर्षे सातत्याने मी वैविध्यपूर्ण भूमिका करत आलेय, त्या भूमिका सगळ्यांना आवडतात यातच वरील प्रश्नाचे उत्तर सामावले आहे. या शोच्या निमित्ताने आम्ही खूप फिरलो, अनेक जाहीर कार्यक्रम केलेत, पण माझ्या भूमिकेवर कुणी नाखूश आहे, माझी भूमिका एडिट होतेय असे कधी चुकूनही जाणवले नाही. उलट या शोमुळे मी कॉमेडी भूमिकाही करू शकते, मिमिक्री करू शकते हे मला नव्याने समजले. यापूर्वी अशी संधी मिळाली नव्हती. मी जेव्हा सर्वसामान्य लोकांना भेटते तेव्हा ते माझ्या फक्त कॉमेडीची नाही तर एकूण अभिनयाचीही जाणीवपूर्वक दखल घेतात, याचा मला आनंद वाटतो. मला लॉकडाऊनआधी ‘समुद्र’ हे नाटक मिळाले होते, त्यात भूमिका करण्याची असोशी वेगळीच होती.
२०१५ मध्ये मी निखिल शेठ यांच्याशी विवाहबद्ध झाले. माझ्या विवाहानंतर माझ्या करिअरला खीळ बसली असे झाले नाही. उलट सतत प्रोत्साहन आणि प्रेमच मला निखिल आणि घरातील सगळ्या सदस्यांकडून मिळत आले आहे. त्यामुळे मी माझं करिअर अधिक उत्साहाने, कसल्याही स्ट्रेसशिवाय करू शकते. ‘चला हवा येऊ द्या’चं शूटिंग खूप लांबतं काही वेळा. काल पहाटे ३ वाजता शूटिंग संपलं. मी लग्नानंतर पुण्यात राहायला गेले आहे. पुणे मुंबई प्रवास, शूटिंग, रिहर्सल अशी अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. लग्नानंतर मी टिपिकल सुनेच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे शेठ कुटुंबाला कधी वाटले नाही, अशा कुठल्याही अपेक्षा निखिलच नाही तर कुणीच माझ्याकडून ठेवल्या नाहीत. त्यामुळे स्वतःला मी खूप भाग्यवान समजते. माहेरी असताना आई -बाबांनी मला माझी कारकीर्द घडवण्यासाठी प्रयत्न केले. माझ्यातल्या अभिनयाला पैलू पाडण्यासाठी आईने जीवाचे रान केले. जे काम स्त्रिया करतात त्या कामाबद्दल पूर्ण आदर, स्वीकार तिच्या सासर-माहेरच्या मंडळींनी केला पाहिजे, नाही तर तिला भरारी घेता येणार नाही. दडपणाखाली राहून करिअर करता येत नाही.
माझे सासरे हल्लीच ‘कोथरूड कॅनरा बँके’तून जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झालेत. आताच्या त्यांच्या निवृत्तीनंतरच्या निवांत क्षणात ते बाजारहाटासाठी वगैरे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा रस्त्यात भेटणाऱ्या भाजीवाल्यापासून ते त्यांच्या पूर्वीच्या बँकेतल्या ग्राहकापर्यंत अनेकजण माझ्या कामाची तारीफ त्यांच्याकडे करतात. माझ्या प्रत्येक एपिसोडनंतर शेठ परिवाराचे नातेवाईक, मित्रमंडळींचे आलेले अनेक व्हॉट्सॲप मेसेज सगळ्यांना थॅंक्यू म्हणत मला फॉरवर्ड करतात. माझ्याविषयी त्यांना अभिमान आहे. माझ्या सासरचे वातावरण खूप हेल्दी आहे, प्रेमळ, पोषक आहे. ते नेहमी म्हणतात, “श्रेया, तुझ्यावर तुझ्या शोची जबाबदारी आहे, त्याचा आनंद घे, घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आम्ही सगळे आहोतच.” एका स्त्री कलाकाराला पुढे जाण्यासाठी आणि काय हवे असते?
माझ्या मनात फक्त कृतज्ञतेची भावना आहे! मन भरून आलं आहे! शब्द कमी पडत आहेत!
written by – पूजा सामंत
samant.pooja@gmail.com