सैयामी खेर
माझी आजी- वडिलांची आई उषा किरण ही ५०-६० दशकातील नामवंत अभिनेत्री. राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार या टॉप स्टार्सची ती नायिका होती. अनेक मराठी चित्रपटांतही तिनं महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. वयाच्या पुढच्या टप्प्यावर चरित्र व्यक्तिरेखाही साकारल्या. मी ८-९ वर्षांची असताना आजी गेली. त्यामुळे तिच्याकडून मला अभिनयाच्या टिप्स घेणं वगैरे करण्याची संधी मला मिळाली नाही. माझी सख्खी आत्या तन्वी खेर (तन्वी आझमी) हीसुद्धा मराठी-हिंदीत काम करणारी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. आई उत्तरा खेर तिच्या काळातली प्रसिद्ध मॉडेल आणि वडील अद्वैत खेर फॅशन फोटोग्राफर आणि मॉडेलही. माझी बहीण संस्कृती हीसुद्धा मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आहे. त्यामुळे माझाही ओढा अभिनय, कला, फोटोग्राफी आणि क्रिडा या सगळ्याकडे होताच. मी २०१६ मध्ये फुल मॅरेथॉन जिंकले आहे, क्रिकेटही चांगलं खेळते. मी सायकलपटू आहे आणि स्पर्धांमध्ये जिंकत आलेय.
आई-बाबांनी स्वतः आणि आजीच्या नजरेतूनही ग्लॅमर वर्ल्ड जवळून पाहिलं होतं. महानगरी मुंबईच्या कोलाहलातून मुलींना दूर ठेवावं, त्यांच्यात खेळांची आवड जोपासावी, निर्सगाच्या सानिध्यात राहावं, म्हणून आम्ही चौघे नाशिकला शिफ्ट झालो. इथे आमचं फार्म हाऊस आहे आणि आम्ही धान्य, भाजीपाला पिकवतो. बाबांनी मळ्यात पिकवलेल्या ऑरगॅनिक धान्य-भाज्यांपासून पदार्थ बनवतो. हे बाबांचं पॅशन पुढे रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित झालं. नाशिकला मला आणि संस्कृतीला आई-बाबांनी खेळ, सायकलिंग, स्विमिंग, बास्केटबॉल, मॅरेथॉन रनिंग यात पारंगत केलं. उद्योजकाचा दृष्टिकोन बाळगणं शिकवलं. आमच्या रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्डवर असलेले जवळपास सगळे पदार्थ मी चांगले बनवू शकते. याचं अनेकांना आश्चर्यही वाटतं. रुमाली रोटी शेफ्ससारखी हवेत उडवून करणं जमावं, म्हणून मी अनेक तास हॉटेलच्या किचनमध्ये घालवलेत, त्यात नैपुण्य मिळवलं. याचं श्रेय आमच्या आईबाबांनाच. आम्ही दहावी उत्तीर्ण होईपर्यंत आम्हाला चित्रपट पाहणं पूर्ण वर्ज्य होतं. पण त्या निमित्तानं मी इतर अनेक गोष्टी शिकत सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगले. जीवन मूल्यं शिकले.
हेही वाचा… सुभग दर्शनाचं दुसरं नाव ‘सीमा’!
मुंबईच्या झेव्हियर्स कॉलेजमध्ये शिकताना मात्र मला मॉडेलिंगच्या ऑफर्स आणि मग दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. सहज म्हणून मी ‘लीवाइज’, ‘पॅन्टालून्स’ आणि अन्य काही ॲड फिल्म्समध्ये काम केलं. तेव्हाही मला किंवा बाबांना असं वाटलं नव्हतं, की हेच माझं करिअर होईल. मनाला नको असलेल्या तडजोडी न करता मिळेल तेच तू स्वीकार, अशी त्यांची शिकवणूक होती. पुढे अन्य काही जाहिराती आणि तेलुगू फिल्म ‘रे’ (२०१५ ) मिळाली. पुढे २०१८ मध्ये रितेश देशमुखसमवेत ‘माऊली’ चित्रपटात काम केलं. ‘मिर्झिया’ चित्रपटासाठी माझं नाव गुलझार यांनी राकेश ओमप्रकाश मेहरा यांना सुचवलं. या माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाला अपयश मिळालं, पण या सिनेमामुळे मला खूप शिकायला मिळालं. हॉर्स रायडिंग ते तलवारबाजी, डायलॉग डिलिव्हरी ते अभिनय अशा खूप गोष्टी गुलझार, राकेश ओमप्रकाश मेहरा यांसारख्या दिग्गजांकडून आत्मसात करता आल्या. अभिनेता हर्षवर्धन कपूरसारखा मित्र लाभला. या चित्रपटाच्या अनपेक्षित अपयशामुळे माझ्यासाठी मोठ्या बॅनरचे दरवाजे उघडले गेले नाहीत, पण अनेक वेब सिरीज, फिल्म्समधून माझी सावकाश वाटचाल पुढे चालू राहिली.
हेही वाचा… बसचालकाची लेक सना अलीची ISRO मध्ये झेप; आईने दागिने गहाण ठेवले, वडील राबले आणि नवऱ्याने…
चार वर्षांपूर्वी आर. बाल्की यांनी मला एका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये षटकार ठोकताना पाहिलं आणि ‘घूमर’ची नायिका ‘अनिना’ त्यांना मिळाली. उजवा हात गमावल्यामुळे डाव्या हातानं ही नायिका क्रिकेट खेळते आणि त्यात कोचच्या (अभिषेक बच्चन) मदतीनं निपुण होते. डाव्या हातानं क्रिकेट खेळणं सोपं नव्हतं. ४ महिने मला बाल्की यांनी दिले होते डाव्या हातानं सराव करण्यासाठी. माझा सराव पूर्ण झाल्यावरच २०२० मध्ये चित्रीकरण सुरु झालं. डाव्या हातानं लिहिणं, स्वयंपाक करणं, कपडे धुणं, क्रिकेटसाठी बॉलिंग-बॅटिंग डाव्या हातानं नियमित करणं, असा सराव होता हा. उत्कृष्ट क्रिकेट खेळणाऱ्या युवतीच्या हाताला अपघात होतो, हात कापावा लागतो आणि आता आपलं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न भंगणार की काय, असं वाटत असतानाच तिच्या जीवनात तिचा क्रिकेट कोच येतो. हात गमावलेल्या अवस्थेत क्रिकेटमध्ये तिला टिकता येतं, देशासाठी खेळता येतं. शारीरिक अपंगत्व ही मनाची अवस्था आहे, मानसिक बळ, मानसिक ऊर्जा असलेली व्यक्ती जग जिंकू शकते, हा आत्मविश्वास ‘घूमर’ समस्त स्त्रियांना आणि इतरांनाही देऊ पाहतो. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, हे बघून मला आनंद वाटतो.
खेळ आपल्याला अधिक विनम्र बनवतात असं मला वाटतं. अभिनयाचं श्रेय सहसा हे फक्त व्यक्तिगत कलाकाराला लाभतं. त्यामुळे कदाचित व्यक्तीत ‘अहं’पणा येत असावा! खेळ मात्र सांघिक भावनेनं खेळले जातात. त्यात हार-जीत ही नेहमीची असते आणि हीच हारजीत आयुष्याचे धडे देत असते. खेळात प्राविण्य हवं असल्यास खेळाडूला वेळ ही पाळलीच पाहिजे. शिस्त अधिक महत्त्वाची ठरते. हे अभिनयाच्या क्षेत्रात जरा अभावानं दिसून येतं. अर्थात प्रत्येक क्षेत्राचे फायदेतोटे आहेतच. कुणी काय घ्यायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न!
शब्दांकन- पूजा सामंत
lokwomen.online@gmail.com