आई नशिबाने माझा नवराच माझ्यापासून हिरावून नेला गं… फक्त ३२ वर्षाचं माझं बाळ (नवरा) २० मिनिटांपूर्वी माझी थट्टा करत होतं. तोंडातला सोन्याचा घास हिरावून नेला त्या देवानं… काय त्याची चूक होती. म्हणतात ना तो हुंदका आला त्याला आणि तिथेच माझं आयुष्य काही सेकंदामध्ये थांबलं. आता कुठून आणू त्याला परत तूच सांग मला. देवाकडे हट्ट केला तर तो मला माझा नवरा परत देईल का? आई सांग ना गं… तो येईल का परत?
मी तासन् तास दाराकडे डोळे लावून बसते की तो आता येईल पण तो काही येत नाही आणि सांत्वन करायला येणारे लोक मात्र मलाच टोचून बोलल्याशिवाय जात नाहीत. त्यांना अगदी ओरडून सांगावसं वाटतं अरे, माझा नवरा होता तो… सांत्वन तर सोडाच पण फक्त श्वास घ्यायचा म्हणून जगणारी मी पाहून त्यांना दया येत नसावी का? त्या २० मिनिटांमध्ये नक्की काय झालं? तुझ्याबरोबरच होता ना तो मग तुला कसं कळालं नाही? त्याच्या त्रासाकडे तुझं दुर्लक्ष झालं का? आता पुढे काय? आई असे प्रश्न मला अनेक बायकांनी येऊन विचारले गं… पण मला प्रश्न विचारणाऱ्याही त्या स्त्रियाच होत्या ना? त्यांनाही माझं दुःख कळलं नसावं… काय उत्तर देणार होते गं मी या सगळ्या प्रश्नांना… प्रत्येकजण मला जाब विचारतात तसे प्रश्न विचारतात आणि मी वेगळ्याच जगात जाते.
आणखी वाचा – मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
आई ह्यांचं काय जातंय गं? नवरा माझा गेला, आयुष्य माझं उद्धवस्त झालं पण समाजाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधिल आहे का? फक्त मी एक स्त्री आहे म्हणून मला दोष देण्यामध्ये काय अर्थ? अगं नवरा मला सोडून गेला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते काय समाजाच्या रितीभाती, परंपरा असतात ना ते लोक मला समजवायला लागले. आता मंगळसूत्र काढ, बांगड्या घालायच्या नाहीत, पायात पैंजण नको असं बरंच काही…
मुंबईसारख्या शहरामध्ये हे घडावं… अगं आई कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावानं विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलाच की… विधवा महिलेचं कुंकू पुसणे, बांगडया फोडणे यांसारख्या तिरस्कार येईल अशा प्रथा एका छोट्याश्या गावाने बंद केल्या. मग शहरात जिथे सुशिक्षित माणसं चांगुलपणाचा मुखवटा घेऊन फिरतात तिथे माझ्यासारख्या मुलीला अशा परिस्थितीचा सामना का करावा लागतो?
आणखी वाचा – असे का होते, समजून घ्या! गरोदर असल्याचे कळले आणि… ४८ तासांत बाळही जन्मास आले
माझ्या नवऱ्याच्या जाण्याने माझं सगळंच गेलं हो… फक्त त्याला शेवटचं पाहण्यासाठी तडफडणारी मी तिथेही समाज आडवा आलाच. तिथेही त्यांनी मला मंगळसूत्र काढायला भाग पाडलं होतं गं… मला हजारो प्रश्न विचारणाऱ्या त्या समाजाला माझा एकच प्रश्न तुम्ही माझा नवरा मला परत आणून देणार का? देणार नसाल तर यापुढे फक्त एक स्त्री म्हणून मला जगू देणार का? अहो छे,हो! तुमच्या बंधनामध्ये अडकणारी ती स्त्री मी नाही. मी नव्याने माझं आयुष्य सुरु करणार पण समाजातील अशा अजून किती स्त्रियांचं जीवन तुम्ही रूढी- परंपरांच्या नावाखाली संपवणार याचंही उत्तर मला द्या!