आज देवाने माझं सर्वस्व हिरावून नेलं. हो सर्वस्वच होतं ते माझं. माझ्या बाबांनी माझी साथ अर्ध्यावर सोडली. त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती. पण तरीही माझ्यापाठी वटवृक्षासारखे उभे होते. कुटुंबासाठी आजवर त्यांनी काय काय सहन केलं याचा विचारही मी करु शकत नाही. आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ. फुलांच्या हारविक्रीचा आमचा सुरुवातीपासूनचा व्यवसाय. आई-बाबा दोघांनीही या एका व्यवसायावर आम्हा चारही भावंडांना लहानाचं मोठं केलं.
आम्हा चारही भावंडांची लग्नं अगदी थाटामाटात बाबांनी करुन दिली. पण तरीही बाबा टेन्शन-फ्री कधीच जगले नाही. लग्नानंतर काही वर्षांमध्येच मी पुन्हा माहेरी आले आणि तेही कायमची… नवऱ्याला दारुचं व्यसन. दारुच्या आहारी गेलेल्या माझ्या आयुष्यभराच्या साथीदाराला मी गमावलं. आम्ही सांभाळणार नाही असं थेट शब्दांत सासरच्यांनी बाबांना सांगितलं. क्षणाचाही विलंब न लावता माझे बाबा मला घरी घेऊन आले. तिथपासून मी माहेरीच.
पुन्हा माहेरी आल्यानंतर परकेपणाची जाणीव आई-बाबांनी मला कधीच करुन दिली नाही. “बाळा, मी नेहमीच तुझ्या पाठिशी आहे” या बाबांच्या एका वाक्याने मला किती आधार मिळायचा हे मी शब्दांमध्ये व्यक्तच करु शकत नाही. बाबांना जाऊन फक्त पंधरा दिवस उलटले आहेत. पण या पंधरा दिवसांमध्ये माझे बाबा गेल्याचा गैरफायदा मात्र लोकांनी-नातेवाईकांनी उचलला.
आणखी वाचा – मुलींना स्पर्श करण्यात कसलं सुख? तुमच्यासारख्या राक्षसांना तर…
माझ्या आई-बाबांना माझं ओझं कधीच वाटलं नाही. पण लोकांसाठी मी ओझं झाले. एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की त्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना हाक मारण्याची (सांत्वन करण्याची) आपल्याकडे पद्धत आहे. पण हे लोक एखाद्याचं सांत्वन करायला नव्हे तर त्याचं खच्चीकरण करायला येतात एवढं नक्की… हे मी पंधरा दिवसांमध्ये अनुभवलं.
बाबांचं वय झालं होतं आता रडत बसू नकोस, तुझं पुढे काय ते बघ, खूप वर्ष माहेरी राहिलीस आता तुझ्या लग्नाचं बघ! बाबा होते तोपर्यंत ठिक होतं आता पुढे काय करणार? असे अनेक प्रश्न व सल्ले मला लोकांनी दिले. ‘आता मुलीच्या लग्नाचं बघा’ असे सल्लेही माझ्या आईला देण्यात आले. एका काकूंनी तर हद्दच पार केली. घरी आल्यानंतर माझं सांत्वन केलं. आई रडत आहे हे पाहून त्यांनाही रडू कोसळलं…
बराच वेळ त्या काकू माझ्या आईच्या शेजारी बसल्या. बोलणं झाल्यानंतर बाहेर जायला निघायल्या. मीही त्यांच्या पाठोपाठ पाच मिनिटांनी घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर पडले. “या मुलीला बापाने आयुष्यभर सांभाळलं. पण मुलीला काही सुख-दु:ख आहे की नाही? डोळ्यामध्ये पाण्याचा एक थेंब नाही. आता शेवटी भावावर आलं ना आणखी एका जबाबादारीचं ओझं…” असं त्या काकू बाहेर उभ्या राहून दुसरीच्या कानात कुजबूजत होत्या.
आणखी वाचा – वयाच्या तिशीमध्ये नवरा मी गमावला, पण तुम्ही मात्र…
ते शब्द माझ्या कानी पडले आणि मला धक्काच बसला. मी माहेरी आल्यानंतर ज्या बाबांनी मला आयुष्यभर सांभाळलं, माझ्या कुटुंबातील मंडळी आजही मला सांभाळून घेतात… त्यांना कधीच माझं ओझं वाटलं नाही. पण बाबा गेल्यानंतर अचानक मला दोष, सल्ला देणारी, प्रश्न विचारणारी मंडळी आली कुठून? बरं आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेली म्हणून त्या व्यक्तीने चोवीस तास रडतंच राहावं अशी या लोकांची अपेक्षा…
बाबा गेल्यानंतर मी काय करावं अथवा मला दुःख झालं की नाही हे दुसऱ्या कोणी का ठरवावं? मी कोणाच्याही प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. मी यापुढे पुन्हा लग्न करायचं की नाही, हाही सर्वस्वी माझा निर्णय असेल. पण ज्या दिवसांमध्ये मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते… तिथे इतर लोक माझं खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नात होते.
आणखी वाचा – वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…
छे, हो! लोकांचं बोलणं ऐकून खचणारी मी मुलगी नाही. बाबा गेल्यानंतरही मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणार. योग्य त्यावेळी, योग्य तो निर्णय घेणार. तसेच संपूर्ण आयुष्यामध्ये बऱ्याच कठिण प्रसंगांचा सामना केल्यानंतर फक्त रडत बसून काहीच न करणाऱ्यातलीही मी मुलगी नाही. बाबांच्या सगळ्या जबाबादाऱ्या एकटीने सांभाळण्याची ताकद, क्षमता माझ्यात आहे. पण माझ्यासारख्या कित्येक स्त्रिया या समाजात आहेत. त्यांनाही तुम्ही अशीच वागणूक देऊन त्यांचं मानसिक स्वास्थ बिघडवणार का? आणि तसंच जर करायचं असेल तर दुसऱ्या मुलीला बोलण्याआधी स्वतःच्या मुलीला व स्वतःला त्याजागी ठेवून पाहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर आपोआपच मिळतील!