प्रसंग पहिला :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोशी काका-जोशी काकू यांना दोन मुली आणि एक मुलगा. दिवसरात्र कष्ट करून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवले आणि आपल्या पायांवर उभे केले. तिघांचे लग्नही लावून दिले. मुली त्यांच्या सासरी सुखी होत्या. मुलाने पत्नीसह वेगळा संसार थाटला होता. सासू-सुनांचे वाद टाळण्यासाठी लांब राहून नातं टिकवणे त्याला शहाणपणाचे वाटले. पण, आता जोशी काका आणि जोशी काकू दोघच मागे राहिले. स्वयंपाकापासून धुणे-भांड्यापर्यंत सर्व कामं स्वत:च करत होते. कधी तरी लेकी-सुना, जावई-नातवंड सुट्टीला येतं आणि त्यांच्या घराचे नंदनवन होई. पण, सगळे पुन्हा आपल्या घरी गेले की दोघेही एकटे पडत असत. लेक कधीही त्यांना स्वत:कडे चार दिवसांपेक्षा जास्त ठेवत नसे आणि लेकीकडे ते चार दिवसांपेक्षा जास्त राहत नव्हते. औषधपाणी सर्व काही लेक-जावई बघत असे. पण, आता परिस्थिती बदलली होती. आता जोशी काका आणि काकू दोघेही थकले होते. पण, तरीही लेकाने त्यांना स्वत:च्या घरी नेण्याचा विषय काढला नव्हता. सासू-सुनांचे वाद टाळण्यासाठी त्याला लांब राहणे हाच योग्य मार्ग वाटत होता. लेकींना आई-वडिलांचे हाल पाहवत नव्हते, त्या त्यांना आपल्या घरी येऊन राहण्याचा आग्रह करत, पण जोशी काका आणि काकू यांना मात्र ते कधी पटलेच नाही. लेकींच्या घरी राहणे त्यांना पाप केल्यासारखे वाटत होते. जोशी काका-काकूंना मात्र फक्त आपल्या लेकाबरोबरच राहायचे होते.

आई-वडील लेकाकडे हक्काने राहू शकतात तर लेकीकडे का नाही? जोशी काका-काकूंच्या या मानिसकतेला जबाबदार आहे हा आपला समाज. आपल्याकडे लहानपणापासूनच मुलींना परकं समजलं जातं. कारण एक दिवस त्या आई-वडिलांचे घर सोडून नवऱ्याच्या घरी जातात. नवऱ्याचे घर हेच लेकींसाठी सर्वस्व होऊन जाते. लहानाचे मोठे झालो ते हक्काचं घर आणि घरातील माणसे परके होतात. कधी बदलणार ही समाजाची मानसिकता. जेव्हा मुलगा-मुलगी समान आहेत असे आपण म्हणतो, तेव्हा त्यांचा फक्त हक्कच नाही तर जबाबदाऱ्यादेखील समान असतात. जर मुलावर आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबादारी आहे, तर ती मुलींवरही आहे. लग्नानंतर नवरा, सासू-सासरे यांना सांभाळणे हे सून म्हणून मुलीचे कर्तव्य आहे असंही शिकवलं जातं. पण, सून म्हणून कर्तव्य पार पाडताना मुलगी म्हणून तिची कर्तव्य बाजूला का सारली जातात?

प्रसंग दुसरा :

सीमा ही स्वावलंबी, नोकरी करणारी आजच्या काळातील तरुणी. तिच्या घरची परिस्थिती हलाकीची होती. तिच्या आई-वडिलांनी मिळेल ते काम करून तिला आणि तिच्या भावंडांना शिकवले. सीमाला लहानपणापासूनच स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या आई-वडिलांना मदत करायची होती, तिने ते करूनही दाखवले. नोकरी लागल्यानंतर घरची परिस्थिती जरा सुधारली. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी कमावलेले पैसे खर्च झाल्यामुळे सीमाच्या आई-वडिलांकडे मुलींच्या लग्नासाठी एक पैसाही शिल्लक नव्हता. सीमाच्या मोठ्या बहिणीने लग्नासाठी पैसे साठवून स्वत:च्या लग्नाचा खर्च उचलला. सीमाला बहिणीचा आदर्श घ्यायचा होता. तिनेही लग्नासाठी पैसे साठवले होते आणि आई-वडिलांचे टेन्शन कमी केले होते. सीमाला लग्नानंतरही आई-वडिलांना आर्थिक मदत करायची होती. लहान भाऊ होताच, पण तिला नेहमी असे वाटे की, फक्त मुलांनीच का आई-वडिलांना सांभाळायचे. आई-वडिलांना मुलगीही सांभाळू शकते . मनापासून तिचीही इच्छा होती आणि तिला अशाच व्यक्तीबरोबर लग्न करायचं होतं, जो तिला या निर्णयात पाठिंबा देईल. पण, सीमाच्या पदरी निराशाच आली. मुले आधी प्रत्येक गोष्टीला होकार देत असतं, पण जेव्हा सीमा हा मुद्दा स्पष्टपणे मांडत असे तेव्हा मात्र “बघू ते लग्नानंतर” किंवा ते “नंतर ठरवता येईल”, अशी उत्तरे मिळत होती. सीमाला त्यांच्या उत्तरामुळे खात्री होत नसे, त्यामुळे तिचीही निराशा होत असे.

हेही वाचा – खिडकी… सोशल मीडियाची!

सीमासारखी मुलगी जर स्वत:च्या आई-वडिलांचा इतका विचार करत असेल तर ती सासू-सासऱ्यांचा विचार करणार नाही का? आजच्या काळात मुली स्वत:हून आई-वडिलांची जबाबदरी स्वीकारत असतील तर त्यात चुकीचं काय आहे? मुलींच्या या विचारांना पाठिंबा देण्याऐवजी विरोध का केला जातो, नकार का दिला जातो?

लग्न ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे मुलींचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. लग्नानंतर मुलींना आपले घर सोडून नवऱ्याच्या घरी जावे लागते आणि आपला संसार मांडावा लागतो. लग्नानंतर सासर हेच मुलींचं घर असतं, असे त्यांना लहानपणीपासून शिकवले जाते. आपल्या समाजात मुलांकडून अपेक्षा केली जाते की, मुलांनी शिकावे, चांगली नोकरी करावी आणि म्हातारपणी आई-वडिलांचा सांभाळ करावा. मग हीच अपेक्षा मुलींकडून का नाही केली जात? आता काळ बदलतो आहे, कित्येक आई-वडील आपल्या मुलींनाही शिकवतात आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करतात. मग त्याच आई- वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींना का देऊ नये? जर सासू-सासऱ्यांना सांभाळणे हे सून म्हणून मुलीचे कर्तव्य असेल तर आई-वडिलांना सांभाळणे हेदेखील तिचेच कर्तव्य आहे ना? मग त्याला महत्त्व का नाही दिले जात? खरचं लग्नानंतर मुली इतक्या परक्या होतात का की, आपल्या आई-वडिलांना सांभाळण्याचा अधिकारही त्यांना नसतो? ज्या आई-वडिलांनी मुलींना फुलासारखं जपलं, लहानाचे मोठं केलं ते अचानक असे परके असल्यासारखे का वागतात?

समाजाच्या चुकीच्या मानसिकतमुळे ही स्थिती निर्माण होते. अजूनही मुलगा-मुलगी हा भेदभाव अशा स्वरूपात केला जातो. कायद्यानुसार मुली संपत्तीमध्ये बरोबरीच्या वाटेकरी असतात; पण जबाबदारीमध्ये त्यांना समान वाटेकरी मानले जात नाही. ज्या मुली आपल्या सासू-सासऱ्यांसह आई-वडिलांना सांभाळू शकतात, त्यांची इच्छा असूनही समाजाच्या मानसिकतेमुळे करू शकत नाही. मुलीच्या घरी राहिले तर समाज काय म्हणेल, या भीतीने आई-वडील हाल सहन करतात. ज्या जोडप्यांना एकुलती एक लेक असेल तर ते म्हातारपणी कोणी आपल्याला सांभाळेल, अशी अपेक्षा सोडून देतात.

ज्या मुली नोकरी करत नाही आणि गृहिणी असतात, त्यांच्या मनात कितीही इच्छा असली तरी आई-वडिलांसाठी काही करता येत नाही. कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. पण, अशावेळी जावई म्हणून मुलाने पुढाकार घ्यायला हवा ना. कारण त्या मुलींनी आपला संसार सांभाळण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो. मग तिच्या जबाबदाऱ्या नवरा म्हणून मुलांनी वाटून घेतल्या तर काय चुकीचे आहे? फूल ना सही फुलाची पाकळी म्हणून जमेल तशी सासू-सासऱ्यांना मदत केली तर हरकत काय आहे?

हेही वाचा – Lavanya Nalli : भारतात कौटुंबिक साडी व्यवसायासाठी हार्वर्डच्या माजी विद्यार्थिनीने सोडली अमेरिकेतील उच्च पगाराची नोकरी

कित्येक जण आपल्या आई-वडिलांना नीट सांभाळतात, पण पत्नीच्या आई-वडिलांची जबाबदारी मात्र घेत नाहीत. मुलीने सासू -सासऱ्यांची सेवा करावी अशी अपेक्षा केली जाते, तर मुलाने सासू-सासऱ्यांचा सांभाळ करावा ही अपेक्षा का केली जात नाही. अनेकदा मुलगी आई-वडिलांसाठी काही करत असेल तर सासरच्या मंडळींना ते पाहवत नाही. खरं सागायचं तर कोणीही एवढा विचार करतच नाहीत. समानता ही अशी गोष्ट आहे, जी फक्त पैसा, संपत्तीसाठीच मर्यादित नाही तर जबाबदारी म्हणूनही एकसमान असली पाहिजे.

मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता जर आई-वडील दोघांकडे हक्काने राहिले तर त्यांना आनंद होणार आहे. मुलांवर एकट्यावरच असलेली आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबादारी मुलींनी जर वाटून घेतली तर त्यांनाही मदतच होईल. जितक्या आपुलकीने मुले आपल्या आई-वडिलांची काळजी करतात, तितक्याच आपुलकीने आपल्या सासू-सासऱ्यांचीही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तुमच्या पत्नीच्या मनातील तुमच्यासाठी आदर आणि प्रेम वाढेल आणि तितक्याच प्रेमाने ती सासू-सासऱ्यांची सेवाही करेल. जी मुलगी आपल्या आई-वडिलांना सांभाळू शकते, ती सासू-सासऱ्यांनाही सांभाळू शकते. नात्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या महत्त्वाच्या असतात. नात्यात थोडं संतुलन साधता आलं तर सर्वजण आनंदी राहू शकतात. समाजाची चुकीची मानसिकता जरा बाजूला केली तर कित्येक प्रश्न सुटू शकतात… तुम्हाला काय वाटतं?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls also have the responsibility to take care of their parents but why society is narrow minded snk
Show comments