प्रिय मानसी नितीन देसाई,
तुझं सांत्वन करावं तितकं कमीच आहे. कारण, आपल्या वडिलांचं (प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई) असं अकाली, अकस्मात निधन व्हावं हे कोणत्याही मुलीसाठी दुःखदायकच असतं. त्यामुळे तुझ्यावर कोसळलेलं दुःख कितीही सांत्वन केलं तरी कदापि कमी होणार नाही. परंतु, याही परिस्थितीत तुला तुझ्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देता आला, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब.
कारण, समाजाने घालून दिलेल्या चौकटीनुसार बाईने कोणत्याही पार्थिवाला खांदा देऊ नये अशी रित आहे. ही रित अनेकींनी मोडून काढली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा शेवटचा प्रवास आपल्या साक्षीने व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होत नाही. प्रथांची चौकट आणि त्या वाईट प्रसंगात प्रवाहाविरोधी विचार करण्याची शमलेली क्षमता यामुळे अनेकजणी आपल्या आई-वडिलांना खांदा न देता आल्याने कुंठत राहतात. पण तू असे होवू दिले नाहीस, हे महत्त्वाचे.
आपल्या प्रियजनांना खांदा देण्याची वेळ खरंतर कोणावरही ओढवूच नये. पण तशी वेळ आलीच तर समाजातील रुढी परंपरा झुगारून त्या व्यक्तीच्या जवळच्या महिलांनाही तो अधिकार मिळायला हवा. ज्या वडिलांनी आयुष्यभर आपल्याला त्याच्या अंगा-खांद्यावर खेळवलेलं असतं, त्यांना आपल्याला साधा खांदाही देता येत नाही, याची किती खंत वाटत असेल मुलींना. फक्त वडील- मुलीच्या नात्यातच नाही तर कित्येक नात्यांमध्ये ही खंत जाणवत राहते. आयुष्याचा जोडीदार साथ सोडून जातो, तेव्हाही त्याच्या पत्नीला रडत बसण्यावाचून आणि शरीरावरील सौभाग्याचे अलंकार काढून ठेवण्यावाचून काही उरत नाही. जन्मदात्या आईने प्राण सोडल्यावरही लेकीला वाटत असतंच की, जिच्या कुशीतून आपण जन्माला आलो तिला शेवटच्या क्षणी खांदा द्यायला हवा होता. पण समाजातील रुढी परंपरा इतक्या पुरुषप्रधान आहेत की बाईलाही भावना असू शकतात याचा विचारच केला जात नाही. त्यामुळे तुझ्या वडिलांच्या शेवटच्या प्रवासात तुला खांदा देता आला, ही त्यातल्या त्यात सकारात्मक बाब आहे.
हेही वाचा >> स्टेअरिंग हाती आलं, पण घुसमट थांबली नाही
नेमकं कधी ते आठवत नाही, पण दहा -बारा वर्षांपूर्वीची बातमी असेल. एका मुलीने म्हणे तिच्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. तिला भाऊ नव्हता, इतर नातेवाईकांशी फार जुळलेलं नव्हतं. मग कोणीतरी येऊन खांदा देईल, त्यापेक्षा वडिलांच्या पार्थिवाला आपला एक खांदा लागला तर पुण्यच मिळेल असं तिला वाटलं. समाजाने घालून दिलेल्या चौकटी तिने एका क्षणात झुगारल्या आणि वडिलांचा शेवटचा प्रवास तिच्या खांद्यावरून झाला. त्यानंतर, अशा अनेक बातम्या कानावर येऊ लागल्या. पण जे बाईला भावनेच्या आधारे मिळायला हवं ते तिला हिसकावून किंवा पर्याय म्हणून का करावं लागतं? हा प्रश्न आहे.
आई-वडील, भाऊ-बहिण, जोडीदार यांच्या आजारपणात बाईने कसूर सोडता कामा नये. तिने तिचं अस्तित्त्व विसरून आजारी माणसांवर औषधोपचार करायला हवेत. यात वावगं काहीच नाही. प्रेमापोटी, आपलेपणाने बायका हे सोपस्कार पार पाडतात. पण, जेव्हा तीच व्यक्ती निघून जाते तेव्हा पार्थिवाला खांदा द्यायला किंवा अग्नी द्यायला घरातील पुरुषाकडे जबाबदारी दिली जाते. ज्या माणसाचं आजारपण काढतो, त्या माणसाला त्याच्या शेवटच्या प्रवासात खांदा देता येऊ नये ही समाजातील शोकांतिका नाही तर काय म्हणावे लागेल?
पण, याही परिस्थितीत तू तुझ्या वडिलांना शेवटपर्यंत साथ करू शकलीस, त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्यासोबत चार पावलं चालू शकलीस यामुळे कदाचित समाजात उद्या आणखी बदल घडेल, ही आशा आहे. बाकी, तुला तुझ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि सावरण्यासाठी बळ मिळो,हीच प्रार्थना!