विज्ञानाच्या अभ्यासाकडे अधिकाधिक महिलांनी वळावे याकरिता अक्षता मूर्ती मुलींना प्रोत्साहित करत असून ही प्रेरणा आई सुधा मूर्ती यांच्याकडून घेतल्याचे अक्षताने म्हटले आहे. १९७० च्या दशकात अभियांत्रिकी क्षेत्रात असलेल्या कंपनीतील एकमेव महिला अभियंता असलेल्या आणि पारंपारिक चौकट भेदणाऱ्या आपल्या आईचा म्हणजेच सुधा मूर्ती यांचा आदर्श आपल्या मुलींनीही घ्यावा, असा आग्रह अक्षता मूर्ती धरतात.
आणखी वाचा : RCB साठी ९९ धावांची झुंजार खेळी करत सामना खिशात घालणारी सोफी डिव्हाईन कोण आहे?
‘इंडिपेंडंट’च्या सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवलेल्या अक्षता मूर्ती आपले विचार मांडताना ‘माझ्या मुलीदेखील नवनवीन क्षेत्रांना गवसणी घालण्याचा विचार करतच मोठ्या होतील,’ अशी आशा व्यक्त करतात. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सर्व विद्यार्थ्यांनी वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत गणिताच्या काही प्रकारांचा अभ्यास अवश्य करावा, जेणेकरून भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी ही मुले तयार असतील, असे विचार विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मूर्ती लिहित्या झाल्या आहेत.
आणखी वाचा : Open Letter: “आम्हाला आळशी म्हणण्यापेक्षा…” सोनाली कुलकर्णीला भारतीय मुलीचं खुलं पत्र
आपल्या आईची प्रेरककथा त्या लिहिताना त्या म्हणतात, सुधा मूर्तींची गोष्ट तर १९६० च्या उत्तरार्धात घडली. त्यासुमारास ज्या विद्यापीठात त्या शिकत होत्या तिथे त्या एकमेव महिला विद्यार्थिनी होत्या. तत्कालिन चाकोरीबद्ध शैक्षणिक वातावरणाला छेद देत आपल्या आवडीला प्राधान्य देत सुधा मूर्तींनी स्टेम ((STEM) म्हणजे ज्यात गणित व विज्ञान हे विषय असतात) विषयांचीच निवड अभ्यासासाठी केली. ‘स्टेम’ने सुधा मूर्तींना विद्यापीठीय आणि व्यावसायिक स्तरावर प्रस्थापित सीमांना भेदण्याची शक्ती दिली. इतकंच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधे क्रांतीकारक बदल घडवण्याइतके सक्षमही केले. १९७० च्या दशकामधे सुधा मूर्तींच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरूवात झाली आणि त्याकाळी त्यांच्या कंपनीतील त्या एकमेव महिला अभियंता होत्या. म्हणूनच ‘स्टेम’ विषय अभ्यासासाठी निवडणाऱ्या, त्यात यश मिळवणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायला हवा आणि अन्य महिलांनादेखील त्यासाठी प्रोत्साहित करायला हवं, असं मत अक्षता मूर्ती अभिमानाने मांडतात.
आणखी वाचा : पहिली रोहिंग्या ग्रॅज्युएट-ताश्मिंदा आहे तरी कोण?
“जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने मी जेव्हा माझ्या मुलींकडे म्हणजेच त्यांच्या भविष्याकडे पाहते तेव्हा त्यांनासुद्धा आजीकडून नवनवीन क्षेत्रांबद्दल विचार करण्यासाठी, ‘स्टेम’च्या आधारावर उभ्या राहणाऱ्या नाविन्यपूर्ण जगाची कल्पना करण्यासाठी आणि आवडीच्या विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा मिळेल, याची खात्री वाटते. ह्या मुली पुढल्या पन्नास वर्षांत कोणत्या, कोणाच्या गोष्टी सांगतील ह्याबद्दल मलाही कुतूहल आहे. तरीही १९६० च्या दशकात भारतामध्ये इंजिनीअरिंग शिकणाऱ्या आणि प्रस्थापित चौकटींना भेदणाऱ्या एका युवतीची गोष्ट त्यांच्यासोबत नक्कीच असेल, अशी आशा आहे.” ऋषी सुनक यांच्या विचारांतील आशयाचा धागा पकडून अक्षता मूर्तींनी असेही लिहिले आहे, की ‘विज्ञान आणि सृजनशील कल्पनांमध्ये गुंतवणूक केल्यास ब्रिटन जगाला नव्या तंत्रयुगाकडे नेऊ शकेल.’
पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या आवाहनानुसार ब्रिटीश ब्युटी कौन्सिलच्या नेतृत्वांतर्गत माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना ‘स्टेम’ (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) संबंधित सौंदर्य उद्योगक्षेत्रातल्या करीअरची ओळख करून दिली जाते. अक्षता मूर्ती म्हणतात, की ‘बॉडी शॉपपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंतच्या अनेक ब्रिटीश उद्योगांची यशोगाथा विज्ञान, उत्पादन – तंत्रज्ञानातील सर्जक कल्पना, निर्मिणाऱ्यांची प्रखर इच्छा आणि दृढ निश्चयाशिवाय अस्तित्वातच येऊ शकली नसती.’