-अपर्णा देशपांडे
“ हॅलो स्वीटीज्! मी आहे आर.जे. ढिंच्याक, आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा लाडका कार्यक्रम, ‘चील मार’! मैत्रिणींनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ‘बॉयफ्रेंड’ असणार, काहींची लग्नही झाली असतील त्याच्याबरोबर आणि काही स्वीट सिंगल स्टेट्स मिरवत असतील, पण तुमचं स्टेट्स कुठलंही असलं तरी आजचा एपिसोड तुम्हा सर्वांसाठी आहे. चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या मैत्रिणीला भेटू. ही आहे, कनिका, जी आपल्याच शहरात स्वतःचं एक आलिशान पार्लर चालवते. आज आपण ती, तिचा बॉयफ्रेंड आणि त्यांची स्पेस यावर बोलणार आहोत. हाय कनिका. मी सरळ सरळ प्रश्न विचारते, की तू तुझ्या बॉयफ्रेंडला त्याची अशी स्पेस देतेस का आणि कशी देतेस?”
“सगळ्यांना हॅलो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो म्हणजे एकमेकांचे चोवीस तास बांधील आहोत का? प्रेम असणं म्हणजे चोवीस तास एकमेकांच्या मागे कॅमेरा लाऊन फिरणं तर नाही ना? आम्हाला दोघांना आपली स्वतंत्र करिअर आहेत, वेगळं मित्रजगत आहे, वेगळी नाती आहेत, जी आम्ही आमच्या लेव्हलवर सांभाळतो. तो मित्रांबरोबर पार्टीला गेला, तर मी लगेच फोन करून कुठे आहेस, कधी येतो आहेस, मला सतत अपडेट करत जा… असा सासेमिरा मागे लावणं चुकीचं आहे ना? तो त्याचा वैयक्तिक वेळ एन्जॉय करतोय. तो त्याला त्याच्या मनाप्रमाणे घालवू देत की! उगाच फोन करून ‘हाय बेबी, कुठे आहेस? सोबत कोण आहे? मला कधी भेटतोस?’ असा कशाला त्रास द्यायचा? तो मला सांगून गेलाय, चोरून नाही गेला पार्टीला. मग सुखानं जगू देत की त्याला. विश्वास नाही का त्याच्यावर? जर विश्वास नसेल तर बॉस, तुमचं नातं एकदा तपासून बघा.”
आणखी वाचा-जागतिक दर्जाची टेनिसपटू ते अनेक कंपन्यांची ब्रॅण्ड अम्बॅसिडर, सानिया मिर्झाची संपत्ती माहितीय का?
“खूप छान सांगितलं कनिका. तो तुझ्यासोबत असताना त्याला आईचा फोन आला तर?”
“ आईचा फोन तर येणारच की! माझी आईसुद्धा मला फोन करते. तो बोलतो आईशी. मी देखील बोलते त्यांच्याशी. मला काहीच हरकत नसते. हां, जर तुमचं नातं घरी माहीत नसेल, आणि आई सारखीसारखी फोन करत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. त्याला बघुदे कसं सांभाळायचं ते. तुम्ही का त्यात नाक खुपसता? जर अतिरेक होत असेल तर मात्र बोलण्याची गरज आहे. आईशी आणि घरच्यांशी बोलावं लागेल.”
“ Thank यू कनिका. आता आपल्याशी संवाद करणार आहे, पल्लवी. ‘‘पल्लवी, तुझं नुकतंच लग्न झालं आहे. अशावेळी तू तुझ्या नवऱ्याला किती स्पेस देतेस?’’
आणखी वाचा-समुपदेशन : ‘मुलांच्या वागण्याचा घाईने अर्थ लावू नका’
“खरं सांगू का, नातं कोणतंही असो प्रत्येकाने दुसऱ्याला त्याची त्याची मोकळीक म्हणजे स्पेस द्यायलाच हवी. आमच्या लग्नाला दोन महिने झाले. म्हणजे आम्ही काय एकमेकांचे हात बांधून बसायचं का? नवरा बायको हे एकमेकांच्या आयुष्यात येण्या आधी त्यांचं एक स्वतंत्र जग असतं की नाही? त्याची भावंडं, कामाचं क्षेत्र, नातेवाईक, मित्र यांच्यासाठी त्याला वेळ द्यावाच लागेल. त्याच्या चुलत भावाच्या वाढदिवसाला दरवर्षी ते सगळी भावंडं एकत्र ट्रिपला जातात. मी म्हणाले, याही वर्षी तू जायचं. लग्न झालं म्हणून काय झालं? त्याला मी मुद्दाम त्याच्या बहिणीकडेही जायला सांगते. मी त्याच्या आयुष्यात नंतर आले, त्यापूर्वी ते एकमेकांच्या किती जवळ होते याचा विचार नको का करायला? हां, त्याच्या आधीच्या मैत्रिणी भेटतात तेव्हा मी जरा जागरूक असते की कुणाशी किती बोलतोय वगैरे …पण ते तितक्या पुरतं. फार खोलात नाही जात मी. आमच्या नात्याचा पायाच विश्वास हा आहे. मला जर कधी त्याचा संशय आलाच तर मी सरळ सरळ रोकठोक विचारेन. पण रोज उठून त्याच्या स्पेस मध्ये नाही घुसणार.”
“धन्यवाद पल्लवी. मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या शोना आणि बब्बुच्या आयुष्यात इतकीही ढवळाढवळ नको करायला, की त्या नात्यात त्याचा जीव गुदमरेल. तुम्ही तुमची वैयक्तिक स्पेस जपा आणि त्यालाही ती जपू द्या. मग बघा तुमचं नातं कसं अजून फुलून येईल. तर आज इथेच थांबू, पुन्हा भेटू तुमच्या लाडक्या ‘चील मार’च्या नवीन एपिसोडमध्ये. बाय बाय!
adaparnadeshpande@gmail.com