डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“सुवर्णा, अगं आजही लेट झाला तुला. एका आठवड्यात दोनदा लेट मस्टरवर सही केली आहेस, आता या महिन्यात पुन्हा लेट झाला तर एक रजा कापली जाईल तुझी. काही अडचण आहे का घरी?”ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जाता जाता सुषमा आणि सुवर्णा दोघींचं बोलणं चालू होतं.
“घरच्या अडचणी नेहमीच असतात आपल्याला सुषमा, त्या काय संपणार आहेत का? तो ‘बाईपण भारी देवा’ बघितला ना, ते खरंच पटलं बघ. बायकांच्या व्यथा कधी संपणारच नाहीत.”
“ते नेहमीचं पुराण मला सांगू नकोस, तुला आज का उशीर झाला ते सांग.”
“मी लेकासाठी, गोलूसाठी चांगल्या ठिकाणचे ‘डे केअर सेंटर’ किंवा पाळणाघर शोधत होते.”
“का गं? सासूबाई कुठं बाहेरगावी निघाल्यात का?”
“नाही गं, त्या कुठंही जात नाहीयेत, पण आता मी गोलुला त्यांच्याकडे ठेवणार नाही, मला त्यांचं वागणं आजिबात पटतं नाहीये.”
“अगं, त्या खूप कामाच्या आहेत, असं तू नेहमी म्हणत असतेस, मग?”
“सुषमा, कामाच्या बाबतीत त्यांचा हात कुणीच धरणार नाही. त्या एका वेळेस अनेक कामं करू शकतात, पण मुलांना शिस्त लावण्यात त्या अतिरेकी स्वभावाच्या वाटतात. मला त्यांचं अजिबातच पटत नाही.”
“सुवर्णा, अगं एवढं काय झालंय?”
“अगं, मागच्या आठवड्यात गोलू दोनदा उपाशी राहिला. गेले चार दिवस त्यानं दुपारी रडून रडून कहर केला. शेजारच्या काकूंनी मला सांगितलं, की सध्या तो रोज रडतो. एवढ्याशा मुलाशी सासूबाईंनी अबोला धरला आहे, आताशी चार पूर्ण होऊन पाचवं वर्ष त्याला लागलंय. त्याला काय समजतंय, यांनी त्याच्याशी असं वागावं का?”
“पण, त्या अशा का वागतात आणि गोलू का उपाशी राहिला हे तू त्यांना विचारलंस का?”
“हो, विचारलं ना. त्याला शिस्त लावण्यासाठी मी हे करतेय असं म्हणाल्या. मुलं सगळे पदार्थ खात नाहीतच, हे आपल्याला माहिती आहे, पण मी त्याला कार्टून लावून दिलं की तो कोणताही पदार्थ खातो. मग कटकट करत नाही. त्यांनी त्याला जेवताना मोबाइल, टीव्ही लावायचा नाही, असं सांगितलं आहे, त्यामुळे तो ताटात वाढलेलं खात नाही, मग त्या रागावतात. त्यांना किती वेळा सांगितलं, कुठून तरी त्याच्या पोटात जाणं महत्त्वाचं आहे. मागच्या महिन्यातील आजारपणामुळे आधीच त्याचं वजन कमी झालं आहे. त्याला ‘कार्टून’ लावून दिलं तर तो व्यवस्थित जेवतो, पण त्या ऐकत नाही. त्याची ही सवय मला मोडायची आहे म्हणतात. तो मोबाइलसाठी हट्ट करतो, या त्याला अजिबात देत नाहीत. मग त्याची रडरड सुरू राहते. दोन दिवस तो रडून झोपला, पण यांना मायेचा पाझर फुटला नाही. त्याला भूक लागली की आपोआप जेवेल म्हणाल्या, पण तोही किरकिरा आणि हट्टी झालाय, नाहीच जेवला. मी घरी गेल्यावर माझा मोबाइल त्याला दिला तेव्हा तो जेवला. त्यानं आजीशी कट्टी केली. म्हणून आता त्याही त्याच्याशी बोलत नाहीत. मागच्या आठवडाभर घरात हेच चालू आहे, त्याला झोपतानाही मोबाइलवर गाणं लावून दिलं की तो लगेच झोपतो. नाही तर झोपायलाही त्रास देतो. त्याची भूक भागली नाही आणि झोप झाली नाही की तो जास्त चिडचिड करतो, हे त्यांना कळत नाहीये का? त्या अशा वागल्या की मला आवडत नाही, मग आमच्या दोघींमध्ये कुरबुरी चालू होतात. त्यापेक्षा मी गोलूला पाळणाघरात ठेवीन. आमच्या घराच्या पुढच्या चौकात एक नवीन आधुनिक पाळणाघर सुरू झालं आहे. तिथं मुलांवर लक्ष देण्यासाठी तरुण मुली आहेत. मुलांसाठी आधुनिक खेळणी तर आहेतच, पण मुलांवर संस्कार करणारी ‘कार्टून्स’ मोठ्या स्क्रीनवर सतत चालू असतात. यातून मुलं लवकर शिकतात. आज मी ते बघायला गेले होते.
मुलांना खेळण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये काही गेमसुद्धा तिथं त्यांनी डाऊनलोड करून ठेवले आहेत. त्यातून मुलांची एकाग्रता वाढते. मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते, असं मला समजलं. मुलांना विकसित करणारी कार्टून्स किंवा गेममध्ये मुलांना बिझी ठेवलं जातं, त्यातून त्यांच्यावर संस्कार केले जातात म्हणे. मुलांची भांडणं, मारामाऱ्या, रडारड मला तिथं अजिबात दिसली नाही. शिवाय संध्याकाळी मुलांना वेफर्स, बर्गर, मॅगी यांसारखे त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थही दिले जातात. त्यामुळे मुलं खूश असतात. मला तर तेथील वातावरण खूपच आवडलं. गोलू तिथं बिझी राहील आणि नवीन काही तरी शिकेल. मी आता १ तारखेपासून गोलूला तिथंच ठेवणार आहे, नवीन पिढी घडवण्यासाठी, आधुनिक सुविधांसह अगदी योग्य पाळणाघर आहे ते.”
सुवर्णा आधुनिक पाळणाघर आणि तिथल्या सुविधांबाबत भरभरून बोलत होती. गोलूच्या बाबतीतील आपली काळजीच मिटली असं तिला वाटतं होतं. सुषमाला मात्र तिचं बोलणं तितकंसं पटलं नाही. ती तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली
“सुवर्णा, या आधुनिक पाळणाघरात गोलू काय शिकणार आहे, तर म्हणे, कार्टूनमधून जीवनसंस्कार. कॉम्प्युटर गेम खेळून त्याची एकाग्रता वाढणार आहे. त्याला एका जागी बसायची सवय लागणार आहे. स्क्रीनसमोर असल्यानंतर तो डब्यातील आपण दिलेले सर्व पदार्थ संपवणार आहे. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मॅगी, बर्गर, पिझ्झा, वेफर्स असे मुलांच्या आवडीचे पदार्थ खाऊन त्याला फास्ट फूड खाण्याची सवय लागणार आहे. सुवर्णा, तूच विचार कर, त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास खरंच त्या पाळणाघरात होणार आहे का? अगं आजीचा प्रेमळ स्पर्श, तिनं सांगितलेल्या गोष्टी, तिनं स्वतःहून त्याला स्वयंपाकघरात मदतीला घेऊन दिलेलं सामान्यज्ञान, जेवताना, त्याच्याशी खेळताना त्याला दिलेले संस्कार सर्व गोष्टींना तो मुकेल असं तुला वाटत नाही? आभासी संस्कारापेक्षा चालतं-बोलतं संस्काराचं ज्ञानपीठ तुझ्या घरात आहे आणि त्याचा लाभ घेण्याचं सोडून तू त्याला अशा पाळणाघरात टाकणार? गोलूची आजी त्याच्यावर मनापासून प्रेम करते, म्हणूनच त्याच्या वाईट सवयी निघून जाव्यात यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत, त्यात त्यांचं चुकलं कुठं? सतत स्क्रीन डोळ्यासमोर ठेवला, की मुलांच्या नैसर्गिक बुद्धीचा विकास होत नाही, आभासी दुनियेत ते रमतात. अगदी लहान मुलंही मोबाइलच्या व्यसनात अडकतात आणि त्यांच्या मनासारखं झालं नाही तर स्वतःला इजा करून घेणं, स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणं असे प्रकारही घडतात, हे आपण ऐकलं आहे. तुझ्या सासूबाईंना नातवावर प्रेम करण्याचा आणि त्याचं चुकलं तर त्याला रागावण्याचाही अधिकार आहे. त्या अनुभवी आहेत. गोलूला आजीपासून दूर करू नकोस, उलट त्या ज्याप्रमाणे त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याला तू सहकार्य कर म्हणजे गोलूमध्ये लवकर बदल होतील.
तू ऑफिसमधून गेल्यावर त्याला लगेच तुझा मोबाइल देऊ नकोस. आताच्या इंटरनेटच्या जमान्यात मुलांना स्क्रीनपासून अगदी लांब ठेवणं अशक्य आहे, त्याला त्या गोष्टी हाताळता यायला हव्यात, आपलं मूल मागे पडायला नको याची काळजीही घ्यायला हवी, पण काही ठरावीक वेळ ठरवून तेवढ्यापुरताच मोबाइल त्याच्या हातात दे. त्यानं सगळं खावं म्हणून मोबाइल दाखवत त्याला जेवण देणं त्याच्या तब्येतीसाठीही चांगलं नाही. कित्येक मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळतं नाही, पण तुझ्या घरात ते आहे तर त्याचा आनंद त्याला घेऊ देत. घरातील आजीसारखं प्रेम तुला कुठंच मिळणार नाही.” सुषमाचं ऐकल्यावर सुवर्णाला आपलं चुकतंय, हे लक्षात आलं. ती म्हणाली, “सुषमा, तू म्हणते आहेस ते बरोबर आहे, ऑफिसमध्ये कधी उशीर झाला. सुट्टीच्या दिवशीही काही कामासाठी ऑफिसमध्ये यावं लागलं तरीही सासूबाई घरात असल्यामुळे मी निर्धास्त असते. तू सांगितलेल्या या सर्व गोष्टींचा मी विचारच केला नव्हता. विनाकारण मी सासूबाईंबद्दल मनात राग धरला आणि पाळणाघर पाहायला गेले, पण वेळीच तुझ्याशी बोलणं झालं. आता मी निश्चिंत झाले.” म्हणत दोघींनी आपला चहा संपवला आणि आपल्या जागी जाऊन कामास सुरुवात केली. सुवर्णाच्या डोक्यातलं भूत आणि डोक्यावरचं ओझं दोन्ही उतरलं होतं.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)
smitajoshi606@gmail.com