डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
निरामय कामजीवन मिळावं हे प्रत्येक जोडप्यासाठी महत्त्वाचे असते. मात्र आजकाल बदलत्या जीवनशैलीचा नकारात्मक परिणाम लोकांच्या आयुष्यावर पडत आहे. जोडप्यांमधील लैंगिक संबंधांची इच्छाच कमी होत चालली आहे, त्यामागची कारणे समजून घ्यायला हवीत.
“डॉक्टर सतत डोकं दुखतंय माझं, अशक्तपणा आहे. मासिक पाळी आलीच नाहीये दोन महिने झाले.”
“अगं, मग प्रेगनन्सी टेस्ट केलीस का घरी?”
“छे हो… तसं काही झालंच नाहीये आमच्यात गेले दोन तीन महिने. ” समोर बसलेल्या तरुण जोडप्याकडे निरखून बघितले असता साधारण वये तीस ते पस्तीसच्या मध्ये वाटत होती. नवऱ्याच्या चेहऱ्यावर थोडे ओशाळवाणे, थोडे चिडके भाव होते आणि बायको वैतागलेली. हे आजकालच्या लग्न होऊन काही वर्षं झालेल्या तरुण पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.
आपल्या देशाचा लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे ही चांगली बाब आहे, पण त्याच्या मागे कारणीभूत असलेल्या गोष्टींमध्ये हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. तरुण जोडप्यांमध्ये सेक्सची इच्छा का कमी होते आहे याची विविध कारणे आहेत.
हेही वाचा… कामजिज्ञासा: मला इच्छाच होत नाही सेक्सची काय करू?
१) सध्याच्या काळात तरुण पिढीवर मानसिक ताण खूप जास्त वाढत चालला आहे. कामाचे तास आणि कामासाठी प्रवास करायला लागणारा वेळ यामध्ये पती पत्नी पूर्णत: दमून जातात. आधीच्या पिढीच्या मानाने आर्थिक सुबत्ता आली तरीही अजून ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या या पिढीची दमछाक होते आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावर होतोय.
२) वेगवेगळी करमणुकीची साधने उपलब्ध झाल्यामुळे मनुष्यप्राणी त्यात गुंतून राहतो आणि त्याची सेक्सची इच्छा कमी होते असे सिद्ध झाले आहे. आजकाल मोबाइल फोन आणि त्यावर इंटरनेटची सहज उपलब्धता याने सर्व वर्गातल्या, सर्व वयातल्या लोकांना वेड लावले आहे. साहजिकच लैंगिक आरोग्य उतरणीला लागले आहे.
३) इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे वयात आल्यापासूनच मुलांना पोर्नोग्राफी बघणे सोपे झाले आहे. पोर्नोग्राफीमुळे सेक्सबद्दल चुकीच्या आणि अवाजवी, फसव्या कल्पनांना बळी पडून काही तरुण त्यांचे लैंगिक जीवन खराब करून घेताना दिसतात.
४) हस्तमैथुनाबद्दल आपल्या समाजात बरेच गैरसमज आहेत. हस्तमैथुन चुकीचे अजिबात नाही. त्यामुळे लैंगिक इच्छेचे दमन होत राहते, परंतु हस्तमैथुनाचा अतिरेक खूपच घातक ठरू शकतो. अशा अतिरेकामुळे पुरुषांना सेक्स करायच्या वेळी समस्या येऊ शकतात. कोणतीही गोष्ट नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहेच.
५) सध्याच्या तरुण पिढीमध्ये लहान वयातच लैंगिक संबंध सुरू होत आहेत. या वयात विचारांची कोणतीही परिपक्वता नसल्यामुळे फक्त सेक्स करता हे संबंध येतात. स्त्री-पुरुष यांच्यात भावनिक नाते नसताना झालेला सेक्स हा तरुण पिढीला over rated वाटू लागला तर काहीच नवल नाही. मग आणखी जास्त excitement शोधायच्या नादात या पिढीतले काही जण बहकतात आणि वेगळ्याच मार्गाला लागू शकतात.
६) खाण्याच्या पदार्थांची प्रचंड रेलचेल, खाद्य पदार्थांची स्वस्ताई आणि शारीरिक हालचाल, व्यायाम यांचा पूर्ण अभाव यामुळे लहान वयातच वाढलेले वजन हे भारतीय शहरी तरुण पिढीमध्ये सर्रास दिसून येते. त्यामुळे आलेली सुस्ती आणि आळस तसेच सेक्स करण्यासाठी लागणारा बेसिक फिटनेससुद्धा नसणे अशा गोष्टीही दुर्दैवाने वाढत आहेत.
७) पुरुषांच्या काही आजारांमुळे त्यांचे लैंगिक जीवन धोक्यात येऊ शकते. सध्या तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह असे आजार दिसून येत आहेत. करोनाच्या महासाथीनंतर हे प्रमाण बरेच वाढलेले दिसते. त्याप्रमाणेच विटामिन B 12 ची कमतरतासुद्धा बऱ्याच जणांमध्ये आढळते. आपल्या समाजात पुरुष आजाराचे निदान झाल्यावरही उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. लिंग ताठरता समस्या( Erectile dysfunction) असलेले पुरुष ही समस्या आहे हे सत्य स्वीकारायलाच नकार देतात. एरवी नॉर्मल असलेल्या पुरुषांनाही अतिरिक्त ताणामुळे ही समस्या कधीतरी येऊ शकते. यासाठी उत्तम उपाय उपलब्ध आहेत. फक्त योग्य डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. हे समजून घेऊन पुरुषांनी त्यांचे लैंगिक जीवन निरोगी ठेवणे सहज शक्य आहे.
८) स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या समस्या किंवा काही वेगळे जुनाट आजार पतीपत्नीच्या सेक्सलाइफचा बोजवारा उडवू शकतात. पाळीमध्ये अनियमितपणा, जास्त रक्तस्राव, दहा बारा दिवस पाळी चालू राहणे, ओटीपोटात वेदना होणे यामुळे त्रासून गेलेली स्त्री लैंगिक संबंधांना महिनोन्महिने तयार होत नाही, पण दुसरीकडे त्यासाठी परिणामकारक उपचार घ्यायला तयारही होत नाही. मग पतिपत्नीमध्ये धुसफूस सुरू होते आणि सगळेच वैवाहिक जीवन दुर्धर होण्याकडे प्रवास सुरू होतो. स्त्रियांनीसुद्धा त्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उत्तम प्रयत्न करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. कारण घरात पतिपत्नी विसंवाद असेल तर त्याचा मुलावर परिणाम होतोच आणि पूर्ण घर अशांत होऊ शकते. हे मुद्दे लक्षात घेऊन पुढच्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण करणे ही आजच्या काळाची निकडीची गरज आहे.
लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे</p>
shilpachitnisjoshi@gmail.com