International Women’s Day 2023: गुगलने जागतिक महिला दिनानिमित्त खास डूडल तयार केले आहे. दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी महिला दिनाचा मोटो हा ‘Women supporting women’ आहे. याच मोटोवर आधारित आजचे डूडल अ‍ॅलिसा विनान्स यांनी बनवले आहे. अ‍ॅलिसा यांनी या डूडलमध्ये एकविसाव्या शतकातील महिलांचे चित्रीकरण केले आहे. या खास डूडलमधून ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!’ हा विचार मांडण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गुगल डूडलमध्ये एक महिला तिच्यासमोर बसलेल्या लोकांना संबोधन करत आहे. विज्ञान व वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या महिलादेखील यामध्ये पाहायला मिळत आहे. स्वत:च्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या आणि मातृत्वामध्ये एकमेकांनी आधार देणाऱ्या महिलांचे चित्रणही यात केले गेले आहे. ही कलाकृती स्त्रीशक्तीचे प्रतिनिधित्व करत आहे. गुगलच्या या डूडलद्वारे महिलांना धर्म, जात, वंश यांच्या मर्यादा ओलांडून एकत्र येण्याचा संदेश देण्यात आला आहे.

महिला दिनाला मोठा इतिहास आहे. औद्योगिक क्रांती, पहिल्या महायुद्धानंतर महिलांना घराबाहेर पडून काम करायची संधी मिळायला लागली. पण त्यांना पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी वेतन दिले जात असे. त्याशिवाय त्यांनी अधिक तास काम करावे लागे. याविरोधात ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील महिला कामगारांनी मोर्चा काढला. तेव्हा १५ हजारांपेक्षा जास्त महिला मोर्च्यामध्ये सहभागी झाल्या. न्यूयॉर्क शहरामध्ये सुरु झालेली महिला चळवळ युरोपसह इतर देशांमध्ये पोहोचली. अमेरिकेमध्ये ८ मार्च रोजी महिलांच्या हक्कांसाठी काढलेल्या मोर्च्यामुळे त्या देशामध्ये हा दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा होऊ लागला.

आणखी वाचा- Women’s Day 2023: प्रत्येक भारतीय महिलेला माहीत असायला हवेत संविधानाने दिलेले ‘हे’ महत्त्वपूर्ण अधिकार

कालांतराने महिला चळवळ मोठी होत गेली. जगभरातल्या महिलांचा या चळवळीला पाठिंबा मिळाला. संयुक्त राष्ट्र संघाला देखील याची दखल घ्यावी लागली. पुढे राष्ट्र संघाद्वारे १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. त्याच वर्षी ८ मार्च रोजी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याबाबतचा ठराव संमत झाला.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle celebrates international womens day 2023 know more yps