Who Is Hamida Banu Google Doodle: पहिली भारतीय महिला कुस्तीपटू हमीदा बानू हिच्या स्मरणार्थ आज गूगलने सुद्धा खास डूडल साकारले आहे. १९४०- ५० च्या दशकात पुरुषप्रधान संस्कृतीला धोबीपछाड देणारी हमीदा तिच्या कुस्तीच्या आखाड्यातील एका खास आव्हानामुळे चर्चेत असायची. “मला, हरवून दाखव मी तुझ्याशी लग्न करेन”, असं म्हणत भल्याभल्या ‘पहेलवानांना’च नाही तर स्त्री स्वातंत्र्याला बेडीत अडकवू पाहणाऱ्यांना सुद्धा हमीदाने धूळ चारली होती. तिच्या पराक्रमाने, तिच्या व्यक्तिमत्वाने तिने प्रचंड नावलौकिक मिळवला खरं, पण जगात डंका वाजत असतानाच ती अचानक पडद्यामागे ढकलली गेली. बीबीसी उर्दूचे नियाज फारुकी यांनी या ‘रणरागिणी’च्या आयुष्याचे काही विशेष पैलू एका खास लेखात मांडले होते. या लेखातील संदर्भांवरून आपण आज या पहिल्या व्यावसायिक कुस्तीगीर महिलेच्या आखाड्यातील व आखाड्याच्या बाहेरील आयुष्याविषयी जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पान पहिलं – “हरवून दाखव, लग्न करेन!”

हमीदा बानूने ३० वर्षांची असताना १९५४ मध्ये पुरुष कुस्तीपटूंना दिलेलं आव्हान तिच्या संघर्षाच्या व यशाच्या कहाणीतील पहिलं वाक्य ठरलं. ‘मला जो हरवेल, त्याच्याशी मी लग्न करेन’ हे आव्हान दिल्यावर लगेचच हमीदाने उत्तर पंजाब राज्यातील पटियाला येथील व पूर्व पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) येथील दोन पुरुष कुस्तीपटूंना मात दिली होती. त्याच वर्षात तिसऱ्या लढतीसाठी पश्चिमेकडील गुजरात राज्यातील वडोदरा (तेव्हाचे बडोदा) येथे हमीदा पोहोचली तेव्हा तिच्या स्वागताचे बॅनर्स, पोस्टर्स या ठिकाणी झळकले होते.

बीबीसीने खो- खोचे खेळाडू सुधीर परब जे त्यावेळेस बडोद्यात स्थायिक होते त्यांच्या हवाल्याने सांगितले की, हातगाड्यांवर, वाहनांवर हमीदाच्या आगमनाच्या जाहिराती झळकल्या होत्या. त्यावेळेस हमीदाची लढत ही बडोद्याच्या महाराजांचे निकटवर्तीय छोटे गामा पेहलवान यांच्याशी होणार होती, पण मी एका बाईबरोबर लढणार नाही असं म्हणत त्यांनी आयत्या वेळी आखाड्यातून माघार घेतली. शेवटी हमीदाचे आव्हान बाबा पहेलवान यांनी स्वीकारायचे ठरवले.

अवघ्या १ मिनिट व ३४ सेकंदाचा हा सामना हमीदाच्या विजयासह पूर्ण झाला. ३ मे १९५४ ला असोसिएटेड प्रेसने याबाबत वृत्त दिले होते. दिवसागणिक हमीदाची प्रसिद्धी वाढत होती. १९४४ मध्ये बॉम्बे क्रोनिकल या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हमीदा व गुंगा पहेलवान यांच्यातील कुस्तीचा सामना पाहण्यासाठी तब्बल २० हजार प्रेक्षक उपस्थित होते. पण शेवटच्या क्षणी गुंगा पेहेलवान या सामन्यासाठी जास्त पैसे व सरावासाठी वेळ मागू लागल्याने हा सामना रद्द झाला होता. साहजिकच सामना रद्द झाल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती ज्यामुळे त्यांनी स्टेडियमची नासधूस सुद्धा केली. यानंतर जेव्हा हमीदा पुन्हा बडोद्यात आली तोपर्यंत तिने साधारण ३०० कुस्तीचे सामने जिंकल्याचा दावा केला होता.

पान दुसरं – अलिगढच्या अॅमेझॉनचा खुराक

हमीदा बानू ही उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील मूळ रहिवाशी होती. तिच्या यशस्वी कारकिर्दीत तिच्या शहरातील वर्तमानपत्रांनी तिला ‘अलिगढची अॅमेझॉन’ म्हणून गौरवलं होतं. हमीदा बानूचं कर्तृत्वच नव्हे तर व्यक्तिमत्व सुद्धा या पदवीला साजेसं होतं. एका लेखात असा उल्लेख आढळतो की, बानूकडे नजर टाकताच कुणालाही थरकाप भरायची. ५ फूट ३ इंच उंची, १०८ किलो वजन असलेल्या हमीदाचा खुराकही प्रचंड होता. रोजच्या आहारात, ५.६ लिटर दूध, २.८ लिटर सूप, १.८ लिटर फळांचा रस, जवळपास १ किलो मटण आणि बदाम, अर्धा किलो लोणी, ६ अंडी, दोन मोठे ब्रेड आणि दोन प्लेट बिर्याणी असं तिचं जेवण असायचं. रॉयटर्सने म्हटले आहे की, ती दिवसातून ९ तास झोपायची आणि सहा तास व्यायाम व सराव करायची.

पान तिसरं – आक्षेप, आरोप व बंदी

बानूच्या हयात असलेल्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीवरून असे समजते की, तिच्या कुस्तीच्या खेळापायीच तिला मिर्झापूर हे मूळ गाव सोडून अलीगढला जावे लागले होते. तिथे तिने सलाम पहेलवान नावाच्या स्थानिक कुस्तीपटूकडे प्रशिक्षण घेतले.१९८७ च्या एका पुस्तकात लेखक महेश्वर दयाल यांनी लिहिले आहे की “बानूच्या प्रसिद्धीमुळे तिने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये अनेक लढाया लढल्या होत्या. ती अगदी पुरुष कुस्तीपटूसारखी लढायची पण काहींनी असंही सांगितलं होतं की, हमीदा पहेलवान आणि पुरुष कुस्तीगीर एक गुप्त करार करून मुद्दाम हमीदाला जिंकू द्यायचे.”

हमीदाचं कुस्तीच्या आखाड्यातील आव्हान इतरांना झेपणारं नसलं तरी आखाड्याबाहेर तिला अनेकदा इतरांनीच मात दिल्याच्या घटना घडल्या होत्या. अगदी पुण्यातही पुरुष कुस्तीपटू रामचंद्र साळुंके यांच्यासह होऊ घातलेली लढत स्थानिक कुस्ती महासंघाने आक्षेप घेतल्याने रद्द करावी लागली. टाइम्सच्या वृत्तानुसार, एकदा तर बानूने पुरुष प्रतिस्पर्ध्याला पराभूत केल्यानंतर चाहत्यांनी तिला मारहाण केली आणि दगडफेक केली होती.

नेशन ॲट प्ले: अ हिस्ट्री ऑफ स्पोर्ट इन इंडिया या पुस्तकात, रनोजॉय सेन यांनी बानूच्या उपस्थितीमुळे होणाऱ्या गोंधळाविषयी अनेक प्रसंग नमूद केले होते व याच सेन यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे हमीदाच्या कुस्तीवरील अनधिकृत ‘बंदी’ बद्दल तक्रार केली. ज्यावर देसाई यांनी प्रत्युत्तरात बानूवरील बंदी ही लिंगभेदामुळे नव्हे तर गैरवर्तणुकीच्या तक्रारींमुळे घालण्यात आली होते असे सांगितले होते. अनेकदा बानूसमोर मुद्दाम हरणारे ‘डमी’ कुस्तीपटू आखाड्यात उतरवले जात असल्याच्या तक्रारींचा सुद्धा देसाई यांनी उल्लेख केला होता.

पान चौथं – मिशन युरोप

पुरुषांनी तिच्या कर्तृत्वाची खिल्ली उडवली आणि तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले तरीही उर्दू स्त्रीवादी लेखिका कुर्रतुलन हैदर यांनी बानूचे वेगळे चित्र रेखाटले होते. दालन वाला या लघुकथेत, हैदर यांनी घरगुती मदतनीस फकीरासह मुंबईत पाहिलेल्या कुस्तीच्या सामन्याचा उल्लेख केला होता. “त्या ‘सिंहिणीला’ कोणीही हरवू शकले नाही असे त्यांनी हमीदाविषयी या कथेत लिहिले आहे.

केवळ भारतीय पहेलवानच नव्हे तर बानूने १९५४ मध्ये मुंबईत झालेल्या एका कुस्तीच्या लढाईत रशियाच्या ‘मादी अस्वल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरा चिस्टिलिनचा एका मिनिटापेक्षा कमी वेळात पराभव केला होता. त्याच वर्षी, तिने घोषित केले होते की ती कुस्ती लढण्यासाठी युरोपला जाणार आहे. पण नेमक्या या बहुचर्चित लढाईनंतरच बानू कुस्तीच्या आखाड्यातून व हळूहळू चर्चेतून गायब झाली.

पान पाचवं- ती गेली, ती गेलीच!

हमीदा बानू आणि सलाम पहेलवान हे एकत्र राहू लागले. अचानक कुस्ती सोडून अलिगढ, मुंबई आणि कल्याण येथील त्यांचा दुग्ध व्यवसाय सांभाळू लागले. बानूने एका मुलाला (शरिख) दत्तक घेतले होते. शरिख यांचा मुलगा म्हणजेच बानूचा नातू फिरोज याने सांगितले “सलाम पहेलवान हे बानूचे प्रशिक्षक सुद्धा होते त्यांना तिची युरोपला जाण्याची कल्पना आवडली नव्हती. तिने जाऊ नये म्हणून त्यांनी तिला अनेकदा काठीने मारहाण केली होती.” याला जोडून बानूचे शेजारी राहिल खान यांनीही सांगितले की, “तिचे हात- पाय फ्रॅक्चर झाले होते. तिला सुरुवातीला उभंही राहता येत नव्हतं, नंतर ती बरी झाली पण आधाराशिवाय चालता यायचं नाही.”

शरिख सांगतात की, शेवटच्या दिवसांमध्ये दूध विकून आणि काही इमारती भाड्याने घेऊन बानू आपला उदरनिर्वाह करत होती. तिच्याकडचे पैसे संपले की, ती रस्त्याच्या कडेला घरी बनवलेला फराळ विकायची. एकीकडे, सलाम पहेलवानची मुलगी सहारा हिने बानूला आपली सावत्र आई म्हणत सलाम व हमीदाचे लग्न झाल्याचे सांगितले असले तरी, १९८६ मध्ये बानूच्या मृत्यूपर्यंत एकत्र राहिलेल्या शरिख यांनी लग्नाचा दावा फेटाळून लावला होता. “बानू खरंच सलामबरोबर राहिली, पण त्याच्याशी लग्न केलं नाही.” असंही शेख यांनी सांगितलं.

हे ही वाचा<< अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

बानूचं आव्हान कधीच कुणी पूर्ण करू शकलं नाही त्यामुळे ती शेवटच्या दिवसांमध्ये एकटी पडली पण एकटी असली तरी हमीदा बानू ही एक अपराजित सिंहीण ठरली हे निश्चित!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle hamida banu first women wrestler weighing 108 kgs diet will shock you her journey started with defeat me will marry you chdc ltdc svs
Show comments