“तुमचं स्वप्नं बेधडकपणे पूर्ण करा. आत्मविश्वासाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. तुमचं ध्येय काय आहे किंवा तुम्हाला काय मिळवायचं आहे हे जगाला ओरडून सांगायची काहीच गरज नसते. तुमची मेहनत, संघर्ष याबद्दल तुमचे यशच सांगेल,” असं गोपिकाचं सांगणं…
तुमची स्वप्नं पूर्ण करायची असतील तर त्यासाठी अथक मेहनतीला पर्याय नाही. अनेकदा अशक्य वाटणारी स्वप्नं फक्त जिद्द, मेहनतीच्या जोरावर पूर्ण होऊ शकतात. याचंच उत्तम उदाहरण आहे गोपिका गोविंद. गोपिकानं अथक संघर्षातून तिचं एअर होस्टेस होण्याचं स्वप्नं पूर्ण केलं आहे. पण तिचं यश इतकंच मर्यादित नाही. तर गोपिका ही केरळच्या आदिवासी समाजातील पहिली एअर होस्टेस तरुणी ठरली आहे. दृढनिश्चय आणि प्रचंड कष्टाच्या जोरावर तिनं ‘असाध्य ते साध्य’ केलं आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही तिनं आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. त्यामुळेच आज ती अवकाशात झेप घ्यायला सज्ज झाली आहे.
वाट कितीही खडतर असू दे, इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर तुमची स्वप्नं पूर्ण होतातच हेच २४ वर्षांच्या गोपिकाने दाखवून दिलं आहे. गोपिला गोविंद ही केरळच्या अलाक्कोडे जवळच्या कावुनकुडीमधल्या ST कॉलनीमधील रहिवासी आहे. ती करिंबला या आदिवासी समाजातील आहे. तिचे वडील पी. गोविंदन आणि आई व्ही. जी. बिजी हे रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. लहापणापासूनच प्रचंड हुशार असलेल्या गोपिकाचं लहानपणापासूनच फ्लाईट अटेंडंट / एअर होस्टेस होण्याचं स्वप्नं होतं. पण आर्थिक परिस्थितीमुळे तिला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. आपल्या बुध्दीमत्तेची चमक दाखवलेल्या गोपिकाला रसायनशास्त्रात बी.एस्सी करावं लागली. कारण तिच्यासाठी तोच सोपा आणि सर्वात स्वस्त पर्याय उपलब्ध होता. परिस्थितीमुळेच आकाशात उडण्याचं आपलं स्वप्नं विसरावं लागेल अशी तडजोडही तिनं केली होती. पण पदवी मिळाल्यानंतर जवळपास एक वर्षभराने तिने एकदा वृत्तपत्रात युनिफॉर्ममधील केबिन क्रू चा फोटो पाहिला आणि तिला तिच्या स्वप्नाची पुन्हा एकदा आठवण झाली. पण आता ते अर्धवट न सोडता साध्य कसं होईल यासाठी ती पर्याय शोधू लागली.
त्याचवेळेस तिला वंचित समुदायांसाठी असलेल्या काही सरकारी योजनांबद्दल माहिती समजली. आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी सरकारच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेबद्दल तिला माहिती समजली. त्याचा लाभ घेत तिनं एव्हिएशन संदर्भातील एक कोर्स केला. वायनाडमधील कालपेट्टा इथल्या ‘ड्रीम स्काय एव्हिएशन ट्रेनिंग अकादमी’ चा हा एक वर्षाचा कोर्स होता. या कोर्सअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंतच्या शुल्काची मदत दिली जाते. त्यामुळे आईवडिलांवर कोणताही आर्थिक बोजा न टाकता गोपिकाला हा कोर्स करता आला.
कोर्स संपण्याआधीच तिने केबिन क्रूच्या जागांसाठी मुलाखती द्यायला सुरूवात केली होती. तिला पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. पण तिने पुन्हा प्रयत्न केला आणि त्यात ती यशस्वी झाली. तीन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ मध्ये तिची केबिन क्रू म्हणून नियुक्ती झाली. कन्नूर ते गल्फ (आखाती देश) असा पहिला हवाई प्रवास तिने केला. खरंतर या प्रवासात भरपूर संघर्ष होता. आर्थिक अडचणी होत्या, तिला जे करायचे होते त्यात मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते, तरीही ती थांबली नाही. शिष्यवृत्ती, पार्ट टाईम जॉब करत तिने आपला प्रवास सुरूच ठेवला.
“तुमचं स्वप्नं बेधडकपणे पूर्ण करा. आत्मविश्वासाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. तुमचं ध्येय काय आहे किंवा तुम्हाला काय मिळवायचं आहे हे जगाला ओरडून सांगायची काहीच गरज नसते. तुमची मेहनत, संघर्ष याबद्दल तुमचे यशच सांगेल,” अशी प्रतिक्रिया गोपिकाने स्थानिक माध्यमांना दिली होती. ती बुध्दीमान तर आहेच. पण शिक्षण आणि कठोर मेहनतीमुळेच गरिबीचे दुष्टचक्र भेदले जाईल यावर तिचा ठाम विश्वास आहे. तिची स्वत:ची मेहनत तर आहेच. पण सरकारी योजनांची योग्य ती माहिती आणि लाभ घेतला तर अशी स्वप्नं पूर्ण होऊ शकतात याचंही हे उदाहरण आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त आपलं स्वप्नं पूर्ण करून गोपिका थांबलेली नाही. तिचं आपल्या जमिनीशी घट्टं नातं आहे. ती आपल्या गावाला नियमितपणे भेट देते. आपला प्रवास अनेक विद्यार्थी, तरुणांबरोबर शेअर करते. आपले अनुभव त्यांना सांगते. गोपिकाने अनेक आव्हाने पार करून आपला यशाचा राजमार्ग तयार केला आणि अनेकांना प्रकाशाची वाट दाखवली आहे. ‘Sky is the limit’ याचा खरा अर्थ गोपिका गोविंदकडे पाहून समजतो.