डॉ. सुरेखा मधुकर मुळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती’ ही केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना असून २००७-०८ पासून सुरू आहे. राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळेतील इयत्ता ८ वीमध्ये नियमित शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असतात. यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये.

यासाठीच्या परीक्षेचे आयोजन ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद’ पुणे यांच्यामार्फत केले जाते. इयत्ता ८ वीमध्ये शिकत असलेल्या पात्र विद्यार्थी-विद्यार्थिंनींची स्पर्धा परीक्षा घेऊन शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एस.सी/एस.टीच्या विद्यार्थ्यांना गुणांत पाच टक्क्यांची सवलत आहे.

हेही वाचा… जी-२० परिषद: परदेशी पाहुण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी महिला कमांडोंकडेही!

ही परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलगू, सिंधी, कन्नड माध्यमांतून घेतली जाते. परीक्षा शुल्क १०० रुपये असून शाळा संलग्नता शुल्क २०० रुपये आकारले जाते. परीक्षेचा अभ्यासक्रम आठवीपर्यंतचा आहे. यासाठीचा अभ्यासक्रम राज्य शासनाचा असतो. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेयविषयक क्षमता चाचणी अशा दोन प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवाव्या लागतात. यासाठी प्रत्येकी ९० गुणांची परीक्षा असते आणि त्यासाठी ९० मिनिटांचा वेळ असतो.

केंद्र शासन दरवर्षी राज्यांना शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या (कोटा) निश्चित करून देते. शिष्यवृत्ती स्पर्धेत पात्र विद्यार्थ्यांची या कोट्यानुसार गुणवत्तेप्रमाणे निवड केली जाते. पात्र विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्याकडून केली जाते.

ऑगस्ट २०१८ पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी अखेर अशी ४ वर्षे दरमहा १००० रुपये अशी (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती मिळते.

योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या http://www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून केली जाते. विद्यार्थ्यांनी नवीन व नूतनीकरणाचे अर्ज दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने याच पोर्टलवरून भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांची शिष्यवृत्तीसाठीच्या निकषांवर शाळा व जिल्हास्तरावर पडताळणी केली जाते.

पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम (पीएफएमएस) मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम भरून दिला जातो.

हेही वाचा… स्वयंपाकघरातले जिन्नस टिकवायचेत? मग वाचा या ५ टिप्स!

योजनेचे उद्दिष्ट –

इयत्ता आठवीनंतर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी/विद्यार्थिंनींचा शोध घेऊन त्यांचा चांगले शिक्षण मिळण्याचा मार्ग सोपा करणे, त्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे, आर्थिक अडचणींमुळे होणारी शैक्षणिक गळती रोखणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष –

पालकांचे (आई/वडील) वार्षिक उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे, सक्षम अधिकाऱ्याच्या (नियुक्त्या करण्यासाठी सक्षम) सहीचा उत्पन्नाचा दाखला सोबत आवश्यक. ही योजना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना योजना लागू.

इयत्ता १० वीनंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असेल तर तो पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरतो.

इयत्ता १० वीमध्ये सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यास ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणे आवश्यक. (अनुसूचित जाती/ जमातीच्या) विद्यार्थ्यांना ५ टक्के सूट).

इयत्ता ९ वीमधून १० वीत गेलेल्या आणि ११ वीमधून १२ वीत गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक असते.

शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयीकृत बँकेत वैयक्तिक खाते असणे, आधारकार्ड असणे व ते बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक.

विद्यार्थ्याची ज्या प्रवर्गातून निवड झाली त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे आवश्यक. जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येते किंवा संपुष्टात येते.

चुकीच्या माहितीमुळे शिष्यवृत्ती दिली गेल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करून प्रदान झालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसुली केली जाईल अशीही या योजनेत तरतूद आहे.

कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण अर्ज भरता येत नाही. बंद केलेली शिष्यवृत्ती पुनरुज्जीवित करता येत नाही.

हेही वाचा… Success Story : पत्रकार ते आयपीएस अधिकारी; जाणून घ्या ‘सिंघम लेडी’चा प्रवास…

आवश्यक कागदपत्रे –

  • सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीय आर्थिक घटकासाठी असलेल्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे गुणपत्रक
  • एन.एम.एम.एस परीक्षेचे गुणपत्रक
  • शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे गतवर्षाचे इयत्ता ९ वी, १० वी व ११ वीचे गुणपत्रक.
  • ज्या प्रवर्गातून विद्यार्थी/ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचा दाखला
  • आधारकार्ड/ बँक पासबुक प्रत

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क –

  • शिक्षणाधिकारी (माध्यमिक/ योजना), जिल्हा परिषद
  • संबंधित शाळेचे मुख्याध्यापक
  • विद्यार्थ्यांनी http://www.scholarship.gov.in या पोर्टलवर जाऊन नावनोंदणी, नवीन आणि नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत नावावर लॉगीन करून माहिती भरणे व सबमिट करणे आवश्यक असते. यासाठी शाळा मुख्याध्यापक किंवा शिक्षणाधिकारी यांची मदत घेता येईल.

(लेखिका लातूर येथे विभागीय माहिती उपसंचालक आहेत.)

drsurekha.mulay@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government scheme scholarship for economically weaker sections asj