ज्ञान, कौशल्य आणि मानवी मूल्यांचा विकास साधताना व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. हीच ती पहिली पायरी आहे जिथून प्रत्येकाची माहीतगार होण्याची, विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची सुरुवात होते. व्यक्ती विकास सामाजिक विकासालाही पूरक ठरतं, ही प्रक्रिया गतिमान करतं.
त्याच उद्देशाने मुला-मुलींसाठी (विद्यार्थिनी) आणि स्त्रियांसाठी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’कडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मुलींना उच्च शिक्षणासाठी जवळच्या महाविद्यालयात जाता यावं, मुलींची शैक्षणिक गळती थांबावी इथपासून ते स्त्रियांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्याचा परीघ एस. टी. महामंडळाने दिलेल्या विविध सवलतींमधून विस्तारलेला दिसतो.
१) ‘मानव विकास निर्देशांक’ कमी असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींना विनामूल्य प्रवास –
शिक्षण, आरोग्य, दरडोई उत्पन्न आणि रोजगार या चार निकषांवर ज्या जिल्ह्यांचा ‘मानव विकास निर्देशांक’ कमी आहे त्या जिल्ह्यांतील विद्यार्थिनींसाठी इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण सुलभ व्हावे, त्यांचे शिक्षण थांबू नये या दृष्टीने गाव ते शाळा यादरम्यान विनामूल्य वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साधारणत: राज्याच्या १२५ तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यात येते. यासाठी महामंडळाने अनेक बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या बस केवळ विद्यार्थिनींसाठीच असतात. या किंवा एस. टी. महामंडळाच्या इतर बसमधूनही मासिक पासाच्या आधारे त्या प्रवास करू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘शासन निर्णय’ माहितीवर क्लीक करायचं त्यातील ‘नियोजन विभाग’ उघडून १९ जुलै २०११ चा शासन निर्णय शोधल्यास या १२५ तालुक्यांची माहिती मिळू शकेल.
२) ‘अहिल्याबाई होळकर योजना’ –
राज्यात इयत्ता ५ ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत जाता यावं यासाठी एस. टी.मध्ये मोफत प्रवासाची सवलत लागू आहे. वरील योजनेअंतर्गत तिमाही पास काढता येतो. हे करण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी प्रमाणित केलेला सवलतधारकाचा फोटो असलेला अर्ज संबंधित स्थानकप्रमुख किंवा आगार व्यवस्थापकाकडे देणे आवश्यक असते. दर तीन महिन्यांनी हीच प्रक्रिया राबवून पासचे नूतनीकरण करावे लागते.
३) शहीद सन्मान योजना –
भारतीय सैन्यदलातील वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नीस ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने’अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी ‘जिल्हा सैनिक कल्याण बोर्डा’मार्फत तशी शिफारस महामंडळाकडे जाणे आवश्यक आहे.
४) महिला सन्मान योजना –
एस. टी. महामंडळाने अलीकडच्या काळात सुरू केलेली ही योजना स्त्रियांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून योजनेला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्त्रियांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे दालन यानिमित्ताने खुले झाले असून ज्या स्त्रिया उद्योग-व्यवसायात कार्यरत आहेत, नोकरीनिमित्ताने आसपासच्या शहरात जात आहेत, प्रवास करत आहेत, विद्यार्थिनी ज्या राहत्या गावापासून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या कॉलेजमध्ये वास्तव्यास आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत त्या सर्वांना या ‘महिला सन्मान योजने’चा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व स्त्रियांना, मुलींना तिकीट दरात अर्धी म्हणजे ५० टक्के सवलत आहे. ही सवलत वाहक स्वत:च देतो. त्याच्यासाठी वेगळी प्रकिया नाही.
इतर योजना –
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (स्त्री/पुरुष) विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. यामध्ये ही स्त्री प्रवासी मोफत प्रवासाचा लाभ घेऊ शकते. अशा स्त्रियांना १०० टक्के सवलत मिळण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर केवळ आधार कार्ड दाखवावे लागते.
अधिस्वीकृतीधारक स्त्री पत्रकार एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करू शकतात. अशा पत्रकाराचे नाव जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी यांच्या यादीत असते. त्यांना महामंडळाकडून साध्या, आराम व निमआराम बसमधील प्रवासासाठी स्मार्ट ओळखपत्र देण्यात येते.
राखीव आसने –
याशिवाय एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये स्त्रियांसाठी राखीव आसनांची सुविधाही आहे. सामाजिक बांधिलकीतून ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ विविध समाजघटकांना प्रवास दरात सवलत देत असते. वरील खास स्त्रियांसाठीच्या योजनांव्यतिरिक्त उर्वरित समाजघटकांना दिलेल्या सवलतींचाही मुली/ स्त्रिया लाभ घेऊ शकतात.
(लेखिका लातूर येथे विभागीय माहिती उपसंचालक आहेत.)
drsurekha.mulay@gmail.com