वनिता पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोज दारू पिऊन येऊन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला आशादेवी फार कंटाळली होती. तिला ‘ग्रीन गँग’ची माहिती मिळाली. तिने या गॅंगकडे जाऊन तशी तक्रार केली. दुसऱ्याच दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसलेल्या, हातात काठ्या घेतलेल्या २५-३० जणी तिच्या घरी गेल्या आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला ‘समजावून’ सांगितलं!

त्यांचा तो अविर्भाव बघून आशादेवीचा नवरा त्यांच्यासमोर गप्प बसला, पण नंतर त्याने अर्थातच आशादेवीला आणखी त्रास द्यायला सुरूवात केली. पुढच्या वेळी ग्रीन गँगमधल्या स्त्रिया पोलिसांना घेऊन आशादेवीच्या घरी गेल्या. आता आशादेवीला होणारी मारहाण तर बंद झाली आहेच, शिवाय तीदेखील या ग्रीन गँगमध्ये सामील होऊन इतरांची मारहाण रोखायला जाते आहे.

उत्तर प्रदेशमधलीच बांदा जिल्ह्यामधली गुलाबी गँग, बुंदेलखंडमधली बेलन गँग प्रसिद्ध आहेच, त्यात आता भर पडली आहे, या स्त्रियांच्या ग्रीन आर्मीची. ‘द प्रिंट’ या माध्यमाने या स्त्रियांची गोष्ट प्रकाशित केल्यानंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या आहेत.

नवऱ्याने मारलं आणि पावसाने झोडलं तर तक्रार कुणाकडे करायची, अशी तर म्हणच आहे! पण गुमान मारहाण सहन करणाऱ्या वाराणसीमधल्या ग्रामीण भागामधल्या स्त्रियांसाठी ही ग्रीन आर्मी आपल्या होप वेल्फेअर अंतर्गत स्थापन केली आहे, ती बनारस हिंदू विद्यापीठचे माजी विद्यार्थी रवी मिश्रा यांनी. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या ग्रीन आर्मीच्या सभासद स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुलाबी गँगच्या महिला घेतात, तेवढी पुरूषविरोधी आक्रमक भूमिका ग्रीन आर्मीच्या महिला घेत नाहीत आणि वेळ पडली तर त्या पोलिसांनाही आपल्या बरोबर घेऊन काम करतात. त्यांच्या या कामामुळे आता त्या परिसरातील गावांमध्ये दारू पिण्याचं आणि बायकोला मारहाण करण्याचं प्रमाण कमी झालं आहे.

रवी मिश्रा एका शाळेची पाहणी करायला गेले होते. त्या शाळेत आशादेवीची मुलं शिकत होती. मुलांचं अभ्यासामधलं रेकॉर्ड फारसं चांगलं नव्हतं. त्यांनी आशादेवींना विचारलं, तेव्हा, ”माझा नवरा मला रोज दारू पिऊन मारतो, ते बघणाऱ्या माझ्या मुलांनी चांगला अभ्यास करावा अशी अपेक्षा कशी करायची?” असं उत्तर मिळालं. इतर अनेकजणींचीही हीच समस्या असल्याचं समजल्यानंतर रवी मिश्रा यांनी आशादेवीला त्या बाकीच्या स्त्रियांनाही घेऊन यायला सांगितलं आणि ग्रीन आर्मीचं काम आशादेवीच्या गावात सुरू झालं.

मिर्झापूरमधल्या जंगलमहालमध्ये राहणाऱ्या गुड्डीची कहाणीही अशीच. हातात काठ्या घेतलेल्या ग्रीन आर्मीच्या बायकांनी तिच्या घरात शिरून तिच्या नवऱ्याला ‘समजावलं’. त्यानंतर गुड्डीचा संसार नीट मार्गी लागला.

कुशियारीजवळच्या देवरा गावामधल्या चंताराने नवरा मारत असल्याची तक्रार केल्यावर ग्रीन आर्मीच्या स्त्रिया तिच्या घरी गेल्या आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला सांगितलं की इथून पुढे तिच्या अंगाला हात लावला तर त्या येऊन त्याला बदडतील. त्याच्या दारुच्या बाटल्याही त्यांनी फोडून टाकल्या. तिथपासून चंताराचा त्रास थांबला.

ग्रीन आर्मीने २०० महिलांना “पोलीस मित्र ओळखपत्रे” दिली आहेत. त्यामुळे त्या सहजपणे पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेटू शकतात आणि त्यांची मदत घेऊ शकतात. ग्रीन आर्मीत सहभागी होणाऱ्या स्त्रियांना अडीच महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते.

जिच्यापासून प्रेरणा घेऊन ही ग्रीन आर्मी तयार झाली आहे, त्या गुलाबी गँगचे हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि झारखंड या राज्यांसह देशभरात ११ लाख सदस्य आहेत. ग्रीन आर्मी नुकतीच सुरू झालेली असल्यामुळे तिचा पसारा सध्या खूपच कमी आहे. पण तो वाढत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

स्त्रियांनी एकत्र येऊन त्रास देणाऱ्या नवऱ्यांना धडा शिकवणे, त्यांची मारहाण थांबवणे यासाठीचे असे प्रयोग- प्रयत्न याआधीही झाले आहेत. माझ्या बायकोचं घरात मी काय वाट्टेल ते करीन, मध्ये बोलणारे तुम्ही कोण, अशी भूमिका मारहाण करणारे पुरूष नेहमीच घेतात. पण तू बायकोला मारतोस, ते चुकीचं आहे, आम्ही तुला आडवे येणार, धडा शिकवणार अशी भूमिका घेऊन आसपासच्या स्त्रिया काठ्या-लाठ्या घेऊन घरात शिरल्या तर हेच पुरूष घाबरतात. सामाजिक दबावापुढे नमतात, असा ग्रीन आर्मीचा अनुभव आहे.

पण ग्रीन आर्मीला एवढ्यावरच थांबायचं नाही, तर या समस्येच्या मुळाशी जायचं आहे. ग्रीन आर्मीच्या सदस्यांचं म्हणणं आहे की आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही, म्हणून आमच्यावर ही वेळ आली आहे. त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकायचं, हे ग्रीन आर्मीचं उद्दिष्ट आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green army the group of women from varanasi district uttar pradesh who helps women against sexual and domestic violence asj