Gujarat Assembly Election 2022 Voting गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज सोमवार, ५ डिसेंबर रोजी पार पडतो आहे. या निवडणुकीत १८३ जागांसाठीच्या एकूण १६२१ उमेदवार रिंगणात आहेत. त्या उमेदवारांमधे १३९ महिलांचा समावेश असून त्यातही ५६ महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. विशेष बाब म्हणजे एकूण महिला उमेदवारांपैकी केवळ ३८ महिला आप, भाजप आणि कॉंग्रेस या महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्यावतीने रिंगणात उतरल्या आहेत. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळच्या महिला उमेदवारांच्या संख्येत वाढ झालेली असली तरी राज्यातील एकूण मतदारांपैकी पन्नास टक्के महिला मतदारांच्यातुलनेत या महिला उमेदवारांची संख्या फारशी उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या महिला उमेदवार अधिक आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने २०१७ च्या तुलनेत यंदा १२ ऐवजी १७ महिलांना उमेदवारी दिली आहे तर कॉंग्रेसने दहाऐवजी १४ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. दोन्ही पक्षांनी ही उमेदवारी देताना दलित समाजातील महिलांना सामावून घेतल्याचे दिसते आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांचा टक्का वाढण्यामागचे कारण स्पष्ट करताना वडोदरा येथील सयाजीगंजमधून निवडणूक लढवणाऱ्या कॉंग्रेसच्या अमी रावत म्हणतात, की महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक संसदेत संमत झाल्यानंतर हा बदल दिसतो आहे. तर गुजरात राज्याच्या भाजप महिला प्रमुख दिपीकाबेन सर्वदा म्हणाल्या, पक्षाने नेहमीच महिलांना मोक्याच्या जागांवर नेमले आहे. अगदी राष्ट्रपतीपदीदेखील महिलेला प्राधान्य दिले गेले आहे.
आणखी वाचा : उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!
२०१७ सालच्या निवडणुकीमधे १८२८ एकूण उमेदवारांपैकी महिला उमेदवार १२६ होत्या. त्यातील १३ महिला विधानसभेवर निवडून गेल्या. त्यामधे भाजपच्या नऊ आणि काँग्रेसच्या चार महिला उमेदवारांचा समावेश होता. या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार तब्बल १०४ महिला उमेदवारांचे डिपॉझिट रद्द झाले होते. गुजरातमधे दोन टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये ४.९ कोटी मतदार, उमेदवारांचे भविष्य निश्चित करणार आहेत. या एकूण मतदारांमधे २ कोटी ३७ लाखाहून अधिक महिला मतदार आहेत. तसंच राज्यातील एकूण मतदारांमधे ४.६ लाख युवा मतदार, तर ३.२४ लाख नवमतदार आहेत, हे विशेष. विधानसभेच्या निवडणुकीसाठी यावेळी निवडणूक आयोगाने महिला मतदारांसाठी १२७४ मतदान केंद्रे उभारलेली आहेत.
आणखी वाचा : प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…
आम आदमी पक्षाने या निवडणुकीत सहा महिलांना पक्षाच्यावतीने संधी दिली असून त्यातील तिघीजणी अनूसूचित जमातीच्या राखीव मतदारसंघात लढत आहेत. ऑल इंडिया मजलिस मुस्लिम पक्ष १३ जागांवर लढत असून त्यांनी केवळ दोन महिलांना उमेदवार म्हणून पुढे केलं आहे. त्याहीपैकी एक मुस्लिम समाजातील असून दुसरी उमेदवार दलित समाजातील आहे. अहमदाबादेतील वैजलपूर येथून झैनाबबिबी शेख तर कौशिकीबेन परमार दानिल्मिदा भागातून निवडणूक लढवत आहेत. बहुजन समाज पार्टीने १३ महिलांना उमेदवारी दिली असून पक्ष १०१ जागांवर निवडणूक लढवत आहे. भाजपाने विद्यमान नऊपैकी पाच महिला आमदारांना वगळून उर्वरित चौघींना पुन्हा एकदा यावेळच्या निवडणुकीत संधी दिली आहे. त्यात गांधीधाम येथील अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून मालती महेश्वरी, गोंदल येथून गीता जडेजा, असर्वा येथून संगीता पाटील आणि वडोदरा येथील अनुसूचित जातींसाठी राखीव जागेवर मनिषा वकील यांचा समावेश आहे.
आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’ उगवत्या सूर्याच्या देशात! (पूर्वार्ध)
कॉंग्रेस पक्षाने चारपैकी दोन विद्यमान महिला आमदारांना संधी दिली आहे. त्यापैकी उंझा येथून कॉंग्रेस उमेदवार म्हणून विजयी झालेल्या आणि नंतर भाजपात प्रवेश केलेल्या आशा पटेल यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. यंदाच्या निवडणूकीत पुन्हा संधी मिळालेल्या दोघींमधे वाव मधून जेनीबेन ठाकोर तर गर्बादा येथील अनुसूचित जमातींसाठीच्या राखीव जागेवरून चंद्रिकाबेन बारिआ यांचा समावेश आहे. २०१७ सालच्या निवडणूकांच्या तुलनेत या दोन्ही पक्षांनी यंदाच्या निवडणुकीत राखीव जागांवर दलित तसंच आदिवासी महिला उमेदवारांना संधी दिली ही चांगली बाब दिसून येते. गेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर यावेळच्या लढतीत भाजपने अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर चार तर अनुसूचित जमातींसाठी राखीव जागेवर दोन महिला उमेदवारांना संधी दिलेली आहे. कम्युनिस्ट पक्षानेसुद्धा यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे.
विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे तशीच आणखी एक गोष्ट प्रकर्षाने नोंदवली गेली आहे. ती म्हणजे दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी केवळ ६१ टक्के उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत. पाच उमेदवार निरक्षर, ३२ टक्के पदवीधर तर ७० उमेदवार उच्चशिक्षित आणि १० उमेदवार पीएचडीधारक आहेत. या सर्व टक्केवारीमधे आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील महिला उमेदवारांच्या शिक्षणविषयक माहितीचे निश्चित प्रमाण कळू शकलेले नाही.
(शब्दांकन : साक्षी सावे)