थंडीमध्ये आपल्या त्वचेबरोबरच केसांचीही काळजी घेणं आवश्यक असतं. थंडीत केस रुक्ष, कोरडे आणि निस्तेज होतात. डोक्याची त्वचा कोरडी होणे, कोंडा, केस गळणे अशा समस्याही उद्भवतात. ज्यांचे केस लांब आहेत अशा महिलांना तर केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. बाहेर जाताना कोरड्या हवेचा परिणाम केसांवर होतो. सणवार, लग्नसमारंभामध्ये केस जर असे निस्तेज दिसले तर मूडच खराब होतो. थंडीमध्ये महिला केसांच्या त्रासामुळे अगदी हैराण होतात. अनेकदा त्यासाठी महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट्सही घेतल्या जातात. पण थंडीत केसांसाठी अगदी घरच्याघरी करण्यासारखे काही उपाय आहेत. केसांची योग्य ती काळजी घेतली तर अगदी कडाक्याच्या थंडीतही तुमचे केस तुम्हाला हवे तसे दिसतील. तेलानं नियमितपणे केसांची मालीश करणं, कोमट पाण्यानं केस व्यवस्थित धुणं, केसांसाठी रसायनविरहीत शाम्पू वापरणं याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) तेलानं मालीश करा

आपली आई, आजी केसांना चंपी करत असे तेव्हा आपले केस कसे होते ते आठवा. आता थंडीतही तुम्हाला तेच करायचं आहे. थंडीमुळे केस कोरडे होतातच. त्यातच डोक्याची त्वचा कोरडी होऊ न देणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान तीनदा तरी तेलानं डोक्याची मस्त चंपी करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढायला मदत होते, स्कॅल्पही हायड्रेट राहतो. थंडीत तेलानं मालिश केल्यामुळे केस तुटणे, गळणे किंवा कोरडे होण्याचा त्रास कमी होतो. मात्र चंपी करताना तेल थोडसं कोमट करायला विसरु नका. बदाम तेल, खोबऱ्याचं तेल किंवा तुम्हाला सूट होणारं तेल यासाठी वापरा.

२) केसांसाठी जास्त गरम पाणी टाळा

थंडीमध्ये खरंतर गरमागरम पाण्यानं अंघोळ करायला छान वाटतं. पण केसांसाठी मात्र खूप जास्त गरम पाणी धोकादायक आहे. केस अगदी गरम पाण्यानं धुतले तर स्कॅल्पचा ओलसरपणा कमी होतो आणि त्यामुळे केस कोरडे होतात. गरम पाण्याचं तापमान आपल्या नेहमीच्या पाण्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला खाज सुटणे, इन्फ्लेमेशन असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरा.

३) शाम्पू

थंडीमध्ये केस धुण्यासाठी योग्य शाम्पू वापरा. म्हणजेच खूप जास्त केमिकल्स असलेला शाम्पू वापरु नका. हार्ड शाम्पू वापरल्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं.

४) कडिशनिंग

थंडीमध्ये शाम्पू लावून केस धुतल्यानंतर केसांचं कडिंशनिंग करायला विसरू नका. केसांना कंडिशनर लावणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे केस कोरडे आणि रुक्ष होणार नाहीत. त्यातला ओलसरपणा टिकून राहील. थंडीत केस लवकर कोरडे होतात. त्यामुळे केसांना कंडिशनर लावल्यानंतर एरवीपेक्षा ते जास्त वेळ ठेवा आणि नंतर धुऊऩ टाका. चांगल्या प्रतीच्याच कंडिशनर वापरा.

५) हेअर मास्क

स्कॅल्प आणि केस कोरडे होऊ नयेत म्हणून थंडीत हेअर मास्क अवश्य लावा. अन्य ऋतुंपेक्षा थंडीत हेअर मास्कची जास्त गरज असते. हेअर मास्कमुळे केसांना पोषण मिळतं.

६) सीरमचा वापर करा

कंडिशनिंग केल्यानंतर चांगल्या प्रतिचं सीरम केसांना लावलं तर थंडीमध्ये फायदा होतो. स्कॅल्पसाठीचं खास सीरमही हल्ली मार्केटमध्ये मिळतं. डोक्याची त्वचा चांगली राहिली, कोरडी- शुष्क नाही झाली तर संपूर्ण केसच निरोगी राहतात.

७) भरपूर पाणी प्या

आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. केसांच्या पोषणासाठीही पाणी पिणं गरजेचं आहे. व्यवस्थित पाणी प्यायल्यानं केसांना योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळतं.

८) कोरफड 

थंडीमध्ये हवेतच एक प्रकारचा कोरडेपणा असतो. साहजिकच त्याचा परिणाम केसांवरही होतो. हा कोरडेपणा कमी करण्यासाठी एलोव्हेरा म्हणजे कोरफडीचा उपयोग होतो. कोरफडीमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असतं. त्यामध्ये जंतूनाशक आणि संसर्ग रोखण्यासाठी कारणीभूत गुण असतात. त्यामुळे केस गळणे किंवा कोंड्याची समस्या दूर होते. आणि केस सुंदर आणि दाट होण्यास मदत होते.

९) केस ओले ठेवू नका

केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित पुसून कोरडे करा. त्यासाठी अगदी हेअर ड्रायरच वापरायला हवा असं नाही. पण केस अजिबात ओले राहू देऊ नका. केस ओले राहिले तर ते लवकर तुटतात. पण अगदी खसाखसा चोळूनही ते पुसू नका. नाहीतर खूप रुक्ष होऊ शकतात.. त्यातही केसांना कलर केला असेल आणि ते ओलसर राहिले तर त्यांचा रंग लवकर जाण्याची शक्यता असते. ओले असताना केस विंचरू नका किंवा त्यातला गुंता काढण्याचा प्रयत्न करु नका.

१० ) डाएट

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये योग्य आहार घ्या. थंडीमध्ये भूक जास्त लागते. चमचमीत, तिखट खावंसं वाटतं. पण अतितेलकट खाल्ल्यानं केसांवर परिणाम होतो. थंडीत भरपूर भाज्या, फळे सहज उपलब्ध असतात. त्याचा फायदा घ्या. ताज्या भाज्या, फळांचा आपल्या रोजच्या आहारात न चुकता समावेश करा. ड्रायफ्रूट्स खा. योग्य आणि समतोल आहार घ्या. म्हणजे तुमचे केसही तुमच्या त्वचेसारखेच निरोगी आणि चमकदार होतील.

(शब्दांकन : केतकी जोशी)