संपदा सोवनी

केसांना टेम्पररी रंग देणारे ‘हेअर चॉक’ ‘ट्रेंडिंग’मध्ये दिसत असले, तरी ते भारतीय केसांवर प्रभावी ठरतात का?…

मेकअप उत्पादनांमध्ये रोज काय नवीन बाजारात आलेलं दिसेल याचा काही नेम नाही. यातली काही मेकअप उत्पादनं आणिॲक्सेसरीज चांगल्या व आपली सोय करणाऱ्या असतात, पण काही अगदी विचित्र असतात! या उत्पादनांचा खरोखरच काही उपयोग होईल का? असा प्रश्न पडतो. असंच एक नव्यानं ‘ट्रेंडिंग’मध्ये दिसणारं विचित्र उत्पादन म्हणजे ‘रेनबो हेअर कलरिंग चॉक’. हो! तुम्ही बरोबर वाचलंत. इंद्रधनुष्यासारखे विविध रंगांत ‘टेम्पररी’ स्वरूपात केस रंगवण्यासाठीचा खडू किंवा क्रेयॉन. ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळांवर सर्वसाधारणपणे गुलाबी, जांभळा, निळा, हिरवा, केशरी आणि लाल अशा रंगांत आणि मोठ्या पॅकमध्ये घेतल्यास आणखीही काही शेड्समध्ये ते विक्रीस ठेवलेले दिसताहेत. अंदाजे ५०० रुपयांपासून पुढे ते मिळताहेत.

हेही वाचा >>> ही कसली आई? प्राईम टाईमच्या मालिकांमध्ये ‘हे’ गंडलेलं आईपण दाखवण्यापेक्षा…

हे खडू कंगव्यासारख्या आकारात असतात. म्हणजे हातात धरायला बारीकसं हँडल आणि पुढच्या बाजूला प्लॅस्टिकच्या मोठ्या दात्यांमध्ये ‘वॅक्स क्रेयॉन’सारखा हेअर चॉक भरलेला असतो. हा लहानसा कंगवा आधी विंचरलेल्या केसांमधून पुन्हा पुन्हा (रंग उठून दिसेपर्यंत) फिरवतात.
आपण विशेष समारंभांना ज्या रंगाचा पोषाख परिधान करतो, तो रंग केसांमध्येही आकर्षक पद्धतीनं दाखवता आला तर किती चांगलं, असं वाटणं साहजिक आहे. कितीतरी मंडळी केसांच्या काहीच बटा आपला नेहमीचा हेअरकलर वापरून रंगीत करून घेतात. पण ते खूप खर्चिक पडतं, शिवाय तो हेअरकलर अनेक दिवस केसांवर राहतो. तेव्हा ‘टेम्पररी’ खडूंच्या माध्यमातून केसांवर इंद्रधनुष्यी रंग लावणं किशोरींना आणि तरूणींना आकर्षक वाटलं नाही, तरच नवल. मात्र हे रेनबो चॉक वापरणाऱ्या तरूणींचे अनुभव मात्र फारसे उत्साहवर्धक नाहीत.

हेही वाचा >>> गच्चीवरची बाग: बागेला पाणी देण्याच्या पद्धती…

रेनबो चॉकमधले रंग केसांतून वारंवार फिरवल्यावर केसांवर त्या रंगाचा थर बसतो हे जरी खरं असलं, तरी त्यासाठी केस मुळातच हलक्या रंगाचे असावे लागतात. म्हणजेच परदेशी गोऱ्या लोकांच्या ‘ब्लाँड’ केसांवर हा रंग तुलनेनं लवकर बसतो. भारतीयांचे केस मात्र काळे असल्यानं रंग फारसा उठून दिसत नाही. हे ‘ट्रेंडिंग’ चॉक वापरणाऱ्या अनेक जणींच्या मते ते कागदावर चित्र रंगवायला वापरतात तशा तेली खडूंसारखेच तेलकट आणि मेणचट (वॅक्सी) आहेत. परिणामी खडू केसांतून वारंवार फिरवल्यावर केस अतिशय चिपचिपीत होत असल्याची तक्रार तरूणी आपल्या रीव्ह्युज् मध्ये करताहेत. केसांतून खडूचा कंगवा फिरवल्यावर केस तुटत असल्याचं काहींंचं म्हणणं आहे, तर खडू केसांवर खूपदा फिरवल्याशिवाय रंग दिसतच नसल्यामुळे एकाच वापरात जवळपास संपूर्ण खडू संपला, असंही काही जणी म्हणताहेत. काहींच्या मते मात्र तुम्हाला सलूनमध्ये जाऊन दीर्घकालीन आणि खर्चिक हेअरकलर करून घ्यायचा नसेल, तर हा तात्पुरता उपाय क्वचित वापरायला तितकासा वाईट नाही!

वेगवेगळ्या शॉपिंग साईटस् वरून फेरफटका मारलात, तर अशी अनेक विचित्र मेकअप उत्पादनं तुम्हाला सापडतील. यातलं काय वापरून बघायचं आणि काय वापरल्यावर पैसे वाया गेल्याचीच भावना प्राप्त होईल, हे मात्र ज्यानं त्यानं ठरवायचं!