साधा ‘फ्युज तार’ लावायचा म्हटलं तरी अनेकांची हिंमत होत नाही. अगदीच वेळ आली तर थरथरत्या हातानं कसा तरी तो लावला जातो तो पुन्हा हात लावणार नाही, अशी प्रतिज्ञा घेऊनच. जिथे पुरुषांची ही अवस्था असते, तिथे महिला हे काम कसे करणार? हा प्रश्न स्वाभाविकच आहे. मात्र, नागपुरातील महावितरणच्या एक अधिकारी हंसा कुर्वे यांच्यासाठी ‘फ्युज तार’ लावणं ही अगदीच लहानशी गोष्ट आहे. त्या चक्क विजेच्या खांबावर चढून काम करतात. एवढंच नाही तर सुरुवातीला नम्रपणे आणि अगदीच कामास विरोध केला तर त्यांच्याकडून खमकेपणाने वीजबिलाची वसुलीदेखील करतात. आता तर विजेचा खांब हेच त्यांचे कर्मक्षेत्र झाले आहे.

महावितरणमध्ये कामाला लागल्यानंतर कधीतरी विजेच्या खांबाशी मैत्री करावी लागेल याची थोडी जाणीव त्यांना होती. हे काम सुरू केलं तेव्हा पहिल्यांदा विजेचा स्पार्क झाला. दुसऱ्यांदा त्याहीपेक्षा मोठा स्पार्क झाला आणि हंसा कुर्वे मागे फेकल्या गेल्या. एकदा, दोनदा असा प्रकार झाल्यानंतर एखाद्याच्या मनात भीती निर्माण झाली असती. एकतर नोकरी सोडली असती, नाही तर आणखी काही, पण विजेच्या खांबाशी मैत्री करणं शक्यच झालं नसतं. कारण ही मैत्री करणं म्हणजे कधीतरी मृत्यूला सामोरं जाण्याची भीती. मात्र, हंसा कुर्वे यांनी पाऊल मागे घेतलं नाही. एकदा, दोनदा अपयश आल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र खांबावर चढत त्यांनी मोहीम फत्ते केली. अगदी जग जिंकल्यागत त्यांची स्थिती होती.

हेही वाचा – Who is Han Kang : मानवी जीवनातील नाजूकपणा मांडणाऱ्या लेखिकेचा सर्वोच्च पुरस्कार, दक्षिण कोरियात साहित्यातील पहिला नोबेल मिळवणाऱ्या हान कांग कोण?

अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, अशी जिद्द हंसा यांच्या मनात होतीच. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला. आयटीआय पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी धडपड सुरू केली. महावितरणमध्येच नोकरी करायची हे त्यांचं ठरलेलं. त्यांच्या आईचा मात्र यास नकार होता. कारण कुठेतरी त्यांच्याही मनात मुलीच्या जीवाविषयी भीती होतीच. आईचा नकार तर वडिलांचा पाठिंबा अशा स्थितीत हंसा कुर्वे महावितरणमध्ये रुजू झाल्या. दशकभरापूर्वीपर्यंत म्हणजेच २०१३ पर्यंत महावितरणमध्ये महिलांचे स्थान केवळ कार्यालयीन कर्मचारी यांपुरते मर्यादित होते. महावितरणमध्ये कधी कार्यक्षेत्रावर महिला जात नव्हत्या. मात्र, त्यानंतर हळूहळू तांत्रिक पदावर महिला रुजू होऊ लागल्या. हंसा त्यातल्याच एक. त्यांना कार्यालयीन कामकाजापेक्षा कार्यक्षेत्रावर काम जास्त महत्त्वाचं होतं, त्यामुळे कार्यालय आणि कार्यक्षेत्र अशा दोन्ही आघाड्यांवर लढायचं त्यांनी ठरवलं. महावितरणमध्ये कार्यालयीन कामातदेखील अनेक आव्हानं असतात. ‘वीज थकबाकी’ची वसुली हे त्यातलेच एक काम. वसुलीचं मोठं आव्हान त्यांच्यासमोरही होतं. शहरातील अतिशय जोखमीच्या, किंबहुना बिकट,- जिथं कधी हल्ला देखील होऊ शकतो अशा क्षेत्रातील वसुलीचं काम त्यांनी हाती घेतलं.

पहिल्याच वसुलीदरम्यान त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. एका घरात त्या वीज थकबाकीची वसुली करण्यासाठी गेल्या. आधी विनंती केली, सौम्य शब्दांत त्यांना समजावलं, पण समोरची व्यक्ती ऐकायलाच तयार नव्हती. थोड्याच वेळात त्या व्यक्तीनं घरातून थेट तलवार काढत हंसा कुर्वे यांच्यावर उगारली. तेथेच त्यांनी तलवार उगारणाऱ्याच्या नांग्या ठेचल्या आणि वसुली करूनच त्या परत आल्या. आणखी एका प्रकरणात वीज थकबाकी वसुलीसाठी गेल्यानंतर चक्क एक महिला अंगावर धावून आली आणि तिनं अगदी खालच्या पातळीवर जात शिव्या द्यायला सुरुवात केली. मात्र, हेही प्रकरण शांतपणे हाताळत त्या महिलेच्या घरची वीज कापण्यात त्या यशस्वी ठरल्या. खांबावर चढणं असो वा वसुली, जोखीम दोन्हीही ठिकाणी आहेच. पण ते म्हणतात ना, ‘हिंमत और जजबा साथ हो तो…’ हंसा कुर्वे यांना हीच बाब लागू होते. त्या सांगतात, ‘‘मी इतरांना खांबावर चढून काम करताना बघायचे. ते म्हणजे जणू जिवंतपणीच मरणाच्या दारात जाणं होतं. मला असंच आव्हानात्मक काम करायचं होतं. पहिल्याच दिवशी खांद्यावर झुला आणि हातात शिडी घेऊन चढले. एक क्षण डोळ्यांत पाणी आलं, पण, न डगमगता मोहीम फत्ते केली.’’

हेही वाचा – महिला वनकर्मचाऱ्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या दीपाली देवकर

अलीकडेच त्यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आलं. महावितरणमध्ये त्या तंत्रज्ञ म्हणून काम करतात, पण कार्यालयीन आणि कार्यक्षेत्र अशा दोन्ही पातळीवर त्या तेवढ्याच ताकदीनं काम करतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांना दिल्ली येथे ‘लाईनमन’ दिनाच्या दिवशी सन्मानित करण्यात आलं.