थंडी असली तरी स्त्रियांची कामं काही कमी होत नाहीत. उलट आपल्या घरातल्यांना, मुलांना थंडी बाधू नये म्हणून जास्तच लगबग असते. विविध प्रकारचे लाडू, ताज्या भाज्यांची लोणची, आवळ्याचे पदार्थ अशा अनेक गोष्टी करण्यात त्या बिझी असतात आणि स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यातच नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तर बाहेर जावंच लागतं. पण स्वयंपाकघरातले काही पदार्थ असे आहेत जे तुम्हाला या थंडीतही अगदी मस्त ऊब देतात. थंडीमध्ये अंगात उष्णता, उर्जा निर्माण करणारे पदार्थ खाल्ले जातात. तीळ हे त्यापैकीच एक. हिवाळ्यात तिळाचे विविध पदार्थ करुन खाल्ले जातात किंवा तिळाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. आयुर्वेददृष्ट्या तीळ शक्तीवर्धक मानले गेले आहेत. तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने रोग प्रतिकारकशक्तीही वाढते. तिळामध्ये चांगली पोषणमूल्ये असतात. त्यात व्हिटॅमिन बी सुध्दा भरपूर प्रमाणात असतं. संक्रात हा सणही हिवाळ्यातच येतो आणि तो तिळगूळ तसंच गुळाच्या पोळीशिवाय काही पूर्ण होत नाही. तिळगुळाचे लाडू, वड्या या दिवसांत खाणं अतिशय चांगलं असतं. तसंच महाराष्ट्रात भोगीच्या म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी करण्याची पध्दत आहे. भोगीच्या भाजीलाही तिळाचं कूट लावलं जातं.
आणखी वाचा : …तर काळजी नसावी!
तीळ दोन प्रकाराचे असतात- काळे आणि पांढरे. पांढऱ्या तिळाचा वापर जास्त केला जातो. दोन्ही प्रकारचे तीळ आरोग्यासाठी चांगले असतात. तिळामध्ये प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन्स, ओमेगा 6, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी पोषणमूल्य असतात. या सगळ्या पोषणमूल्यांमुळे शरीराला फायदाच होतो. त्यामुळे थंडीत शक्य तितके तीळ आवर्जून खावेत. पण ज्यांना उष्णतेचा खूप जास्त त्रास होतो. त्यांनी मात्र वैद्यकीय सल्ल्याने तिळाचा आपल्या आहारात समावेश करावा.
आणखी वाचा : आरोग्य : प्रदूषणावर अत्यंत गुणकारी- तुळस
थंडीत तीळ खाण्याचे फायदे
त्वचा चांगली राहते
थंडीत सुरुवातीपासूनच त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. ज्यांची त्वचा जास्त कोरडी पडते त्यांनी अगदी थंडी सुरु झाली की लगेचच आपल्या आहारात तिळाचा समावेश करावा. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तिळाच्या तेलाने मसाज केल्यास त्वचा मऊ मुलायम होते. तसंच दुधामध्ये तीळ भिजवून त्याची पेस्ट करून ते चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. शरीराचा एखादा भाग भाजला गेल्यास त्यावर तीळ वाटून तूप घालून ती पेस्ट भाजलेल्या ठिकाणी लावल्यास बराच फायदा होतो.
हाडांच्या मजबुतीसाठी
थंडीमध्ये हाडांची दुखणी वाढतात. विशेषत: ज्यांना संधिवात, सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास तर आणखीनच वाढतो. बहुतेक स्त्रियांचा पाय दुखण्याचा किंवा गुडघेदुखीचा त्रास थंडीमध्ये वाढतो. अशावेळेस तिळाचा आहारात समावेश केला तर त्रास खूप कमी होतो. रोजच्या जेवणात तिळाची चटणी, तिळकूटाचा वापर केल्यानं सांधेदुखी, स्नायूंची दुखणी कमी होतात. तिळात असलेली कॅल्शियम आणि फॉस्फरससारखी पोषणमूल्ये हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. थंडीत तीळ नियमित खाल्ल्यास स्नायू दुखणं आणि सूज येण्याचा त्रास कमी होतो.
मेंदूसाठी अत्यंत उपयुक्त
तीळ आपल्या मेंदूसाठीही चांगले असतात. तिळामध्ये प्रथिने, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरसारखी अनेक पोषणमूल्ये आहेत. यामुळे मेंदूची क्षमता वाढते. थंडीत आपल्या जेवणात रोज तीळ खाल्ल्यास स्मरणशक्तीही चांगली राहते असं तज्ञ सांगतात.
आणखी वाचा : आहारवेद : पिष्टमय पदार्थांचे चरबीतील रूपांतर थांबविणारा कोबी
रक्तदाब नियंत्रणात
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्या महिलांनी आहारात तिळाचा समावेश केलाच पाहिजे. तिळामध्ये मॅग्नेशियम भरपूर असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्थात डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तीळ योग्य प्रमाणात खाल्ले जावेत.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
तीळ आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहेत. त्यामुळे थंडीत तर तिळाचा वापर आपल्या रोजच्या जेवणात केलाच पाहिजे. यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, सेलनियम आणि झिंकसारखी पोषणमूल्य असतात. ज्या स्त्रियांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. त्यांच्यासाठी तीळ खाणं फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तीळ खाल्ल्याने ह्रदयाचे स्नायूही मजबूत होतात आणि ह्रदविकारांचा धोका कमी होतो.
चांगल्या झोपेसाठी
अनेक स्त्रियांना थंडीमध्ये झोप न लागण्याचा त्रास होतो. तिळाचा आहारात समावेश केला तर झोप न येण्याची समस्या दूर होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिळामधील काही घटकांमुळे चांगली झोप येण्यास मदत होते. त्याचबरोबर तिळाच्या सेवनाने तणाव आणि डिप्रेशन कमी होण्यासही मदत होते.
दातांसाठी उपयुक्त
दातांसाठीही तीळ खाणं चांगलं आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्यानं दात मजबूत होतात. हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्त्रावावरही तीळ गुणकारी आहेत. सतत तोंड येण्याचा त्रास होत असेल तर तिळाच्या तेलात सैंधव मीठ मिसळून ते लावल्यानं आराम पडू शकतो.
लघवी स्वच्छ होत नसेल तर तीळ, दूध आणि खडीसाखर एकत्र करून घेतल्यास त्यानं मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
(शब्दांकन : केतकी जोशी)