डॉ. सारिका सातव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ली ‘पीसीओडी’ हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. स्त्रीरोगतज्ञांच्या क्लिनिकमध्ये, तसेच घराघरांमध्ये हा शब्द कानावर पडतोय. काय आहे हे? ‘पीसीओडी’ म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. स्त्रीच्या बीजांडामधून दर महिन्याला बीज बाहेर पडते व त्या बीजाशी निगडित असलेल्या सर्व हार्मोन्सची पातळी जर व्यवस्थित असेल तरच ही प्रक्रिया सुरळीत चालते. पुढे पाळी येणे, गर्भधारणा होणे या महत्त्वाच्या प्रक्रियासुद्धा या क्रियेशी निगडित असतात. बऱ्याचदा काही कारणांमुळे बीज उत्सर्जन प्रक्रियेत, हार्मोन्सच्या पातळीत जर गडबड झाली की पुढे अनेक लक्षणे उद्भवतात व त्यातूनच पीसीओडीची तक्रार जन्माला येते. पाळी अनियमित होणे, पाळीचा रक्तस्त्राव अत्यंत कमी वा अत्यंत जास्त असणे, अतिरिक्त वजन वाढणे, चेहऱ्यावर दाट लव येणे अशी एक ना अनेक लक्षणे दिसू लागतात. चुकीची जीवनशैली- मग तो आहार असो वा विहार, या सगळ्याचे महत्त्वाचे कारण मानले जाते. म्हणूनच औषधयोजनेच्या आधी आहार आणि विहाराचे योग्य नियोजन केल्यास ही सर्व लक्षणे मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात यश मिळते.

पुढील उपाययोजना नक्की कराव्यात.

१) कर्बोदके

सिम्पल कार्बोहायड्रेट्स, जसे की मैदा, साबुदाणा, साखर इत्यादी शरीराला कमी प्रमाणातसुद्धा भरपूर ऊर्जा देतात. शारीरिक हालचाली कमी असल्यामुळे किंवा अजिबात नसल्यामुळे ही ऊर्जा वापरली जात नाही. हा ऊर्जेचा अतिरिक्त साठा शेवटी चरबीत रूपांतरित होतो. ही चरबी इन्सुलिन नावाच्या हार्मोनच्या कार्यात अडथळा आणते व तिथूनच पुढे सर्व हार्मोन्स- जी पाळीशी निगडित आहेत ती सर्व बिघडून जातात. म्हणून असे पदार्थ शक्यतो टाळावेत.

कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स निवडावेत- जसे की कोंड्यासह पिठाची चपाती, भाकरी, ओट्स इत्यादी. याचेही प्रमाण आटोक्यात ठेवावे. बरीच जीवनसत्वे- उदाहरणार्थ ‘बी व्हिटॅमिन’ यातून मिळत असल्यामुळे पूर्ण बंद करणे टाळावे.

२) प्रथिने

उत्तम प्रकारची प्रथिने स्नायूंना बल देतात. ज्यामुळे व्यायामाची शक्ती चांगली राहते. शिवाय पोट भरण्याची संवेदना चांगली राहते‌. ज्यायोगे खाण्याचे प्रमाण उगाच वाढत नाही. दूध, अंडी, डाळी, चिकन, मासे इत्यादी पदार्थ प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. कमी चरबीयुक्त प्रथिने निवडावीत.

३) चरबी

संपृक्त चरबीचे पदार्थ- उदाहरणार्थ वनस्पती तूप इत्यादी टाळावेत. आहारामध्ये तेलाचे प्रमाण कमी ठेवावे. जंक फूड, पॅकड् फूडमधून नकळत जाणारी चरबी खूप हानिकारक असते. बेकरीच्या पदार्थांमधून हानिकारक ट्रान्स फॅटी ऍसिड शरीरामध्ये जाणे अतिशय अपायकारक आहे.

स्वयंपाकातील तेलाचा कमी वापर व त्याबरोबर मासे, सुकामेवा इत्यादी पदार्थ, जे चांगल्या चरबीचे नैसर्गिक उत्तम स्रोत असतात, त्यांचा अंतर्भाव नियमित असावा.

४) तंतुमय पदार्थ

सॅलड्स, हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, इत्यादी पदार्थांमधून तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात. तंतुमय पदार्थांमुळे वजन, चरबी आटोक्यात राहण्यास मदत मिळते. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. रक्तातील साखर नियंत्रित राहते. पोट भरल्याची संवेदना उत्तम राहते. ज्यामुळे अनियंत्रित खाणे टाळले जाते. मलावरोध टाळला जाऊन पचन व आतड्यांच्या हालचाली सामान्य राहण्यास मदत होते. इन्सुलिन हार्मोनची अतिरिक्त वाढ टाळली जाते.

५) लो ग्लायसेमिक इंडेक्स फुड

जे पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर जास्त वाढत नाही त्यांना लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड (low glycemic index food) म्हणतात. तंतुमय पदार्थयुक्त, धान्य, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, डाळी, काही फळे, बदाम, अक्रोड आणि इतर काही प्रक्रिया न केलेले पदार्थ या प्रवर्गात येतात. पीसीओडीमध्ये होणारी इन्सुलिनची अतिरिक्त वाढ या पदार्थांमुळे टाळली जाते.

६) अँटी इन्फ्लमेटरी फुड्स

चयापचय क्रियेवरील अतिरिक्त ताणामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढून अनेक आजारांना निमंत्रण मिळते. हे inflammation कमी करण्यासाठी बेरीज, ऑलिव्ह ऑइल, जवस, उत्तम प्रकारचे चरबीयुक्त मासे इत्यादी anti inflammatory foodsचा अतिशय चांगला उपयोग होतो.

एकूण काय, तर चरबी न वाढवणारे पदार्थ भरपूर प्रमाणात खाऊन, योग्य प्रकारचा व्यायाम करून, जीवनशैलीत सुधारणा करून नक्कीच पीसीओडी नियंत्रणात ठेवता येईल.

dr.sarikasatav@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips diet for pcos patients dpj