घोसाळे ही भाजी फार प्राचीन असून मूळची भारतातीलच आहे. गर्द हिरव्या रंगाची त्वचेवर काळसर ठिपके असलेली आकाराने लांबट गोल असलेली घोसाळे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. संपूर्ण जगभरात हिचे उत्पन्न घेतले जाते. भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स व कॅरिबियन बेटे, अमेरिका या सर्व देशांमध्ये घोसाळ्याची लागवड पुष्कळ प्रमाणात केली जाते. घोसाळे हे पीक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते, घोसाळे वेलीवर येतात. हा वेल खूप पसरतो म्हणून तो मांडवावर चढवतात. मांडवावर चढवल्यामुळे घोसाळी चांगली येतात. मराठीत घोसाळे, इंग्रजीत श्रीपर (लुफा), संस्कृतमध्ये स्वादुकोष्टकी तर शास्त्रीय भाषेत झरेर किंवा कुकुमिस ॲक्युफलसलिन या नावाने ओळखले जाते.
आणखी वाचा : गच्चीवरची बाग फुलवणारा पालापाचोळा
औषधी गुणधर्म
घोसाळ्यामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्द्रता व क-जीवनसत्त्व, पिष्टमय व तंतूमय पदार्थ, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नायसिन, प्रथिने, खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
- आयुर्वेदानुसार घोसाळे ही अग्निदीपक, शीतल, मधुर गुणात्मक व कफकारक असतात.
उपयोग
घोसाळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याने लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींनी आहारामध्ये घोसाळ्याची भाजी भरपूर वापरावी यामुळे पोट भरल्याची भावनाही होते व वजन आटोक्यात राहते.
रक्तदाब, हायकोलेस्टेरॉल, हृदयरोग, मधुमेह हे विकार असणाऱ्या रुग्णांनी आहारामध्ये घोसाळे आवर्जून वापरावे. कारण उष्मांक कमी व तंतूयुक्त पदार्थ जास्त असल्यामुळे वरील सर्व आजार आटोक्यात राहतात. म्हणून घोसाळ्याचा आयुर्वेदामध्ये पथ्यकर भाजी म्हणून उल्लेख केला जातो.
अंगाचा दाह होत असेल तर घोसाळ्याचा रस त्वचेला लावावा. थंडावा निर्माण होऊन दाह कमी होतो. अपचन, आम्लपित्त या विकारांमध्ये घोसाळ्याची भाजी खावी, घोसाळे अग्निदीपक असल्यामुळे हे विकार दूर होतात.
सांध्याच्या ठिकाणी सूज आली असेल किंवा पाय हात मुरगळला असेल तर घोसाळ्याच्या पानांचा कल्क करून त्यात थोडे गोमूत्र घालून पुरचुंडी करावी व ही पुरचुंडी गरम करून दुखावलेल्या भागावर बांधावी, असे केल्याने या ठिकाणाची सूज ओसरते.
घोसाळ्याच्या पानाचा कल्क करून त्यात पाणी टाकून त्याचा रस काढावा व हा रस साजूक तुपात घालून ते तूप रस आटेपर्यंत शिजवावे व त्यानंतर गाळून भरून ठेवावे व हे तूप अंगावरील जुन्या जखमा, फुटलेले बेंड उष्णता वाढून झालेल्या जखमा, तोंड येणे या सर्व विकारांवर लावावे. यामुळे जखमा लवकर भरून येतात.
आणखी वाचा : आहारवेद: उन्हाळ्यात शीतलता देणारे कलिंगड
जुलाब होत असतील तर घोसाळ्याच्या ५-१० बिया घेऊन ताकामध्ये बारीक करून ते ताक प्यावे. घोसाळ्याच्या ताज्या पानांचा २ थेंब रस डोळे आले असल्यास डोळ्यात घालावा यामुळे डोळ्यांची आग थांबते.
घोसाळी, जास्वंद, ब्राह्मी, माका, वडाच्या पारख्या घालून खोबरेल व तीळ तेल उकळावे. यामधून तयार झालेले खोबरेल तेल केसांच्या मुळाशी लावल्यास केस पिकणे, गळणे थांबते.
परिपक्व झालेल्या घोसाळ्याचा आतील रेषायुक्त भाग हा अंघोळीसाठी तसेच भांडी घासण्यासाठी वापरता येतो.
सावधानता
घोसाळी ही अग्निदीपक पाचक असल्याने सहसा शरद ऋतूत जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण त्याच्या सेवनाने अधिकच पित्त प्रकोप होऊ शकतो.
sharda.mahandule@gmail.com