डॉ. शारदा महांडुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावटा ही वनस्पती शेंगवेल या प्रकारात मोडते. पावट्याच्या हिरव्यागार शेंगा भाजीसाठी उपयोगात आणल्या जातात. मराठीत पावटा, संस्कृतमध्ये निष्षाव, इंग्रजीमध्ये हायशिन्थबेन, तर शास्त्रीय भाषेत लाबलाब परपुरिअस या नावाने ओळखली जात असून तो पॅपिलिओनसी या कुळातील आहे. पावटा या वनस्पतीच्या वेलीची फुले जांभळी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. त्याची पाने ही लांब दांड्यांची असतात. पावट्याचा देठ हा लांब मऊ असतो. पावट्याच्या वेलाची लागवड भाजी उत्पादनासाठी संपूर्ण भारतात केली जाते. शेतामध्ये, घराजवळ तसेच घराजवळील परसबागेमध्ये याचे उत्पादन घेतले जाते. खाण्यासाठी भाजी म्हणून पावट्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

आणखी वाचा : गोडच बोलायचं, ठरलं तर!

औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार पावटा हा दीपक, पाचक, बलकर, वेदनाशामक, स्तंभक व ज्वरघ्न आहे. आधुनिक शास्त्रानुसार पावट्यामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ ब व क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामध्ये असणाऱ्या या औषधी गुणधर्मामुळेच त्याचा वापर विविध आजारांवर केला जातो.

आणखी वाचा : भोगीची आमटी : एक चवदार आठवण

उपयोग
० आम्लपित्ताचा त्रास होऊन पोटामध्ये जळजळ व वेदना जाणवत असतील तर त्या थांबविण्यासाठी पावट्याच्या शेंगाचा काढा करून पिण्यास द्यावा.
० काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अति प्रमाणात रक्तस्राव होतो व त्या रक्तस्रावामुळे पोटात वेदनाही होतात. अशा वेळी पावटा गुणकारी ठरतो. पावट्याचा रस अर्धा कप सकाळी व संध्याकाळी प्यायला दिल्याने त्याच्या स्तंभक व वेदनाशामक गुणांमुळे मासिक रक्तस्राव कमी होऊन पोटातील वेदना थांबतात.
०तापाचा वेग जास्त प्रमाणात वाढत असेल तर शरीराचा ताप कमी करण्यासाठी पावट्याचा रस प्यायला द्यावा.
० भूक कमी लागणे, अपचन, आम्लपित्त या विकारांवर पावटा गुणकारी ठरतो. पावटा खाल्ल्याने शरीरातील आमाशयाला (जठराला) बल मिळते व त्यातून वरील आजार कमी होतात.

आणखी वाचा : मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

० शरीरावर बऱ्याच दिवसांची जुनी जखम झालेली असेल तर ती जखम भरून येण्यासाठी व तेथील वेदना कमी करण्यासाठी पावट्याच्या शेंगाची भाजी करून नियमित खावी व पावट्याचा कल्क जखमेवर लावावा.
० कान ठणकत असेल तर अशा वेळी पावट्याचा गाळलेला रस कानात २ थेंब टाकावा. यामुळे ठणका लगेचच कमी होतो.
० अंगावरून पांढरे पाणी जात असेल (श्वेतस्राव) तर पावट्याचा काढा करून अर्धा कप दोन वेळा घ्यावा.
० ओटीपोट व कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी पावट्याची भाजी नियमितपणे आहारात खावी.
० आयुर्वेदामध्ये पावटे व वाल या दोन्ही भाजीच्या शेंगांना निष्पाव हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. या वनस्पतींचे बरेचसे गुणधर्म सारखे आहेत.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : मुलं होणं – स्टॉप नव्हे पॉज!

सावधानता
पावटा या वनस्पतीचा औषधी म्हणून सर्व अंगाचा उपयोग केला जातो. फक्त मुळाचा उपयोग केला जात नाही. कारण मूळ हे काही प्रमाणात विषारी असते. त्याचा वापर केल्यास शरीराला ते बाधू शकते.

sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips healthy hyacinth bean benefits disease related to menstrual cycle in women vp
Show comments