शक्करकंदातील चिकापासून साबुदाणा तयार केला जातो. केरळात हे गोड कंद मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ते साधारणत ६ किलो ग्रॅम वजनाचे असतात. बटाटा, रताळे यांच्यासारखे दिसणारे हे कंद जमिनीच्या खाली मुळ्यांमध्ये असतात. साबुदाण्याला इंग्लिशमध्ये tapioca म्हणतात.
आणखी वाचा : Salt आहारवेद: मीठ अगदी चवीपुरतंच
साबुदाणा तयार करण्याची प्रक्रिया
तमिळनाडूमध्ये सालेम परिसरात साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत. शक्करकंद हे प्रथमत: धुऊन त्यांची साल काढली जाते त्यानंतर त्यातील चोथा बाजूला काढून चिकट अशी पेस्ट बनवली जाते. ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात घेऊन ८ ते १२ दिवस आंबवण्यासाठी ठेवली जाते यामुळे या पेस्टचा चिकटपणा आणखीनच वाढतो. ही पेस्ट पांढरी स्वच्छ दिसण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे ही पेस्ट नि:सत्त्व बनते. यानंतर मशिनमधील गोल चाळण्यांना वनस्पती तूप लावले जाते व त्यातून विविध मापांचा गोल आकाराचा साबुदाणा बनविला जातो. साबुदाण्याला कीड लागू नये म्हणून अनेक घातक परीरक्षकांचा वापर केला जातो.
आणखी वाचा : मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!
गुणधर्म
पेस्ट तयार करण्यासाठी शक्करकंदाची साल व चोथा काढल्याने त्यात असणारी प्रथिने, खनिजद्रव्ये, क्षार, जीवनसत्त्वे व कॅल्शियम नष्ट होतात, उरतात ती फक्त कर्बोदके (कार्बोहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त उष्मांक मिळतात. साधारणत: शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये ९४ ग्रॅम कर्बोदके असतात तर फक्त ०.२ ग्रॅम प्रथिने, ०.५ ग्रॅम फायबर, १० मिली ग्रॅम कॅल्शियम आणि १.२ ग्रॅम लोह असते. यामध्ये नैसर्गिक जीवनावश्यक मूलद्रव्ये नष्ट झाल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे आमाशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा खाल्लेल्या एखाद्या व्यक्तीची सोनोग्राफी केली तर त्यात अख्खा साबुदाणा आढळतो. साबुदाणा चिकट व मऊ असल्यामुळे बरेच जण न चावताच गिळून टाकतात यामुळे तो पचविण्यासाठी शरीरातील इन्सुलिन हार्मोनवर जास्त ताण पडतो. पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात. अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळेला मधुमेह या आजाराची लागण झालेली दिसते. भारतात साबुदाणा उपवासाचे अन्न म्हणून खाण्याची पद्धत आहे; परंतु पचनास अतिशय जड असल्यामुळे आल्मपित्त, वात, मलावष्ठंभ, लठ्ठपणा हे विकार होतात. म्हणून साबुदाणा हा उपवासाच्या पदार्थातूनच पूर्णपणे वर्ज्य करायला हवा.
आणखी वाचा : ‘या’ आहेत भारतातील पाच अतिश्रीमंत महिला; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती
पर्यायी पदार्थ
पाश्चात्त्य देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गामधील लोक साबुदाणा खातात; परंतु भारतात उपवासाचा पदार्थ म्हणून आवडीने साबुदाणा खिचडी, वडे खाल्ले जातात. मी तर अशी काही कुटुंबे पाहते की, घरातील एकाचा उपवास असला की, स्वयंपाक न करता सर्वच जण साबुदाणा खिचडी खातात. मोठ्या प्रमाणात साबुदाणा, शेंगदाणे आणि तेही वनस्पती तुपात तळलेले पदार्थ खाणे आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. म्हणूनच साबुदाण्याऐवजी राजगिरा थालीपीठ, राजगिरा लाडू, गूळ, शेंगदाणे लाडू, ताक, फळे, फळांचा रस नारळपाणी, दूध आणि अगदी थोड्या प्रमाणात रताळे, बटाटा यांचे घरी बनविलेले विविध पदार्थ खावेत.
dr.sharda.mahandule@gmail.com