कांदा हा त्याच्या तिखटसर चवीमुळे अनेक भाज्यांमध्ये व स्वादिष्ट नाश्त्यामध्ये आवश्यक घटक म्हणून वापरला जातो. कांदा वापरल्यामुळे खाद्यपदार्थ चविष्ट तर होतोच पण त्याचबरोबर त्या पदार्थाचे पोषणमूल्यही वाढते. कांद्याला हिंदीत प्याज, इंग्रजीमध्ये अनियन संस्कृतमध्ये कंदर्प किंवा पलांडू, लॅटिनमध्ये एलिअम सेपा असे म्हणतात व तो लिलीएसी या कुळातील आहे. आहारशास्त्राबरोबरच आयुर्वेदशास्त्रात कांद्याचे औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत. सपाट, गोलाकार, लंबगोलाकार असे कांद्याचे आकारानुसार अनेक प्रकार आहेत. तर जंगली कांदा आणि रानकांदा असे त्याचे स्थानानुसार प्रकार आहेत. तर त्याच्या रंगानुसार लाल कांदा व पांढरा कांदा हेही प्रकार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : व्यथा काश्मीरच्या: तब्बल ७५ वर्षे वीज नाही, डॉक्टर नाही, बाळंतपण केवळ सुईणीवरच अवलंबून!

औषधी गुणधर्म : कांदा हा तिखट अग्निदीपक, रुचकर कफोत्सारक, उत्तेजक, मूत्रल, कामोद्दीपक असा बहुगुणी आहे. कांद्यात कॅल्शिअम, ॲल्युमिन, लिग्नीन आणि अ, ब, क जीवनसत्त्व, गंधक, फॉस्फोरिक आम्ल, तंतुमय पदार्थ, स्निग्धता असे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

उपयोग :
० वंध्यत्व असणाऱ्या पुरुषाने नियमितपणे कांदा सेवन करावा.
० लघवी थेंब थेंब होत असेल तसेच लघवी होताना जळजळ होत असेल तर एक कांदा अर्धा लिटर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्यावे. यामुळे लघवीची जळजळ थांबून लघवी साफ होते.

आणखी वाचा : झोपू आनंदे- स्वप्नांचा मागोवा

० ग्रीष्म (उन्हाळा) ऋतूचा त्रास होऊ नये म्हणून या ऋतूत कांद्याचा वापर आहारामध्ये जास्त प्रमाणात करावा. या ऋतूमध्ये कांदा भाजून खाणे किंवा इतर पदार्थाबरोबर खाणे हे सर्वच चांगले परंतु कच्चा कांदा खाणे हे अधिक लाभदायक असते.
० कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे.
० कांद्याचे ताजे लोणचे बनवून खाल्याने तोंडास रुची उत्पन्न होते, अग्नी प्रदीप्त होऊन अन्नपचन होते.
० हृदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.
० मधमाशीच्या दंशाने आग होत असेल तर दंशाच्या ठिकाणी कांद्याचा रस चोळल्यास तेथील दाह कमी होतो.
० जुलाब, उलटी, मळमळ, अपचन अशा विकारांमध्ये कांदा व पुदिना समप्रमाणात घेऊन त्याचा रस तयार करून त्यात थोडे सैंधव मीठ घालावे व ते मिश्रण प्यावे.

आणखी वाचा : विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या

० दमा, सर्दी, खोकला हे आजार वाढल्यास तसेच छातीमध्ये कफ वाढल्यास कांद्याचा रस, मध व आले यांचे चाटण दिवसातून २-३ वेळा घ्यावे.
० चेहरा कांतीयुक्त, सतेज दिसण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी दोन चमचे कांद्याचा रस, दोन चमचे काकडीचा रस व एक चमचा मध यांचे मिश्रण करून ते चेहऱ्यास लावावे. नियमित हे मिश्रण चेहऱ्यास लावल्यास सुरकुत्या नाहीशा होतात.
० कांदा ठेचून त्याचा रस व पाकळी जखमेवर लावल्यास जखम त्वरित भरून निघते. कांद्याबरोबर गूळ मिसळून मुलांना खायला दिल्यास त्यांची वाढ लवकर होऊन उंची वाढते.
० त्वचा सुंदर होण्यासाठी तिळाच्या तेलात कांद्याचा रस घालून उकळून ते तेल नियमितपणे अंघोळीपूर्वी १० मिनिटे त्वचेवर लावावे.
० कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडातील चिकटपणा नाहीसा होतो. तोंड व दात स्वच्छ करण्याचे काम कांदा करतो. कांदा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
० जिरे आणि सैंधव घालून कांद्याची कोशिंबीर करून खाल्ली असता घशामध्ये साचलेला कफ दूर होऊन घसा स्वच्छ होतो.
० उन्हाळ्यात उन्हापासून त्रास कमी व्हावा म्हणून बाहेर पडताना डोक्यावर कांद्याच्या ताज्या पाकळ्या ठेवून त्यावर किंचित ओलसर स्कार्फ बांधून बाहेर पडावे. यामुळे डोक्याला शीतलता प्राप्त होऊन उन्हाचा त्रास कमी होतो.
० कांद्याचा औषधी म्हणून उपयोग करताना त्याचा रस काढून तो हवाबंद बाटलीत ठेवावा व उन्हातून आल्यानंतर किंवा मधुमेहामुळे तळहात व पायांची आग होत असेल तर तो रस लावावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन आग कमी होते.
० कांदा ठेचून तो पाण्यात उकळवून काढा करावा व हा काढा दोन चमचे घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मध घालावा व हे मिश्रण रात्री झोपताना प्यायल्यास चांगली झोप लागते.
सावधानता : कांदा कापल्यानंतर त्याचा लगेचच वापर करावा. जास्त वेळ कापून ठेवलेला कांदा खाऊ नये. तसेच कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून आल्याचा तुकडा, लवंग किंवा गुळाचा खडा चघळावा किंवा थोडा ओवा व बडीशोप खावी.
sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy habits tips to beat the heat must use onion vp
Show comments