डॉ. शारदा महांडुळे
निसर्गाची डाळिंब निर्मितीमध्ये अद्भुत किमयागारी दिसून येते. अनेक बिजं धारण केलेले हे फळ दिसायला वेगळे आहे. डाळिंब हे मध्यम आकाराचे फळ असून सहा बाजू एकमेकांपासून पातळ पिवळ्या पापुद्रय़ाने विभागलेल्या असतात. या पापुद्रय़ांच्या आत गोड, पारदर्शक रसाळ गुलाबी किंवा लाल माणकांसाखरे दाणे असतात. सर्वात वरून सोलायला कठीण अशी जाड पिवळसर लाल रंगाची साल असते. या सालीच्या आत डाळिंबाचे दाणे असल्यामुळे डाळिंब अनेक दिवस खराब न होता टिकते. साल बरेच दिवस राहिल्यामुळे सुकून वाळून गेली तरी आतील दाणे हे रसरसीत असतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात.
आणखी वाचा : आपल्या ‘चक दे’ गर्ल्स! भारतीय महिला हॉकी संघाची जागतिक यशाला गवसणी
औषधी गुणधर्म
महत्त्वाच्या फळांमध्ये डाळिंबाचा समावेश होतोच परंतु त्या सोबतही औषधामध्येही त्याचा समावेश होतो. डाळिंब पित्तशामक स्तंभक व कृमीनाशक आहे. तसेच त्रिदोषहारक, दाहशामक, तृष्णाशामक, बुद्धिवर्धक असतात. डाळिंबे स्निग्ध, रुची उत्पन्न करणारे, जठराग्नी प्रदीप्त करणारे असते. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह हे क्षार असतात. तर प्रथिने, आद्र्रता, तंतूमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, क जीवनसत्त्व हेही घटक भरपूर प्रमाणात असतात. डाळिंबाचे फळ, साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करता येतो.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : समलिंगी संबंधांची किळस का वाटावी?
उपयोग
- डाळिंब हे पित्तशामक असल्याने गर्भवती स्त्रीस जर उलटी, मळमळीचा त्रास होत असेल तर डाळिंबाचा रस दर दोन दोन तासांनी ३-४ चमचे पिण्यास द्यावा. यामुळे तोंडाला रुची उत्पन्न होऊन पाचक अग्नी प्रदीप्त होतो व भुकेची जाणीव निर्माण होते.
- अति ताप आल्यावर पथ्यकर आहार म्हणून डाळिंब किंवा डाळिंबाचा रस द्यावा. तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता गोड डाळिंबाने कमी होते व ताप नाहीसा होतो.
- चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
- शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
- अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खावे. यामुळे तोंड स्वच्छ होते व दुर्गंधी नाहीशी होते व तोंडाला रुची प्राप्त होते.
- घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्या.
- लाल रंगाचे दाणे असलेले गोड डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक असल्याने ज्यांना रक्ताची कमतरता (अॅनिमिया) आहे. त्यांनी रोज एक डाळिंब सेवन करावे.
आणखी वाचा : आहारवेद : रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा पिस्ता
- अपचन, पोटात गॅस धरणे, शौचास साफ न होणे ही लक्षणे असतील तर रोज १ डाळिंब खावे. यामुळे जाठराग्नी, प्रदीप्त होऊन अन्न पचते व बियांमधील चोथ्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
- डाळिंबाची साल, फुले हे आतड्यांमधील कृमींवर प्रभावशाली आहेत. पोटात होणारे चपटे कृमी, लांब जंत हे डाळिंबांच्या सालीमध्ये असणाऱ्या अल्क गुणाने मरतात. याचा काढा सलग तीन दिवस १ ग्लासभर दिवसातून ३ वेळा द्यावा याने सर्व प्रकारचे जंतकृमी पडून जातात.
- स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी.
- डाळिंबाचा रस अतिसार, मुरडा, संग्रहणी, आम्लपित्त, पांडुरोग (अॅनिमिया) जुनाट ताप, खोकला इ. आजारांवर गुणकारी आहे.
- मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.
- बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
- हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
आणखी वाचा : आहारवेद : गर्भवती स्त्रियांसाठी उपयुक्त चिकू
- डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.
- डाळिंबाचे दाणे वाटून त्याचा रस काढून जायफळ, सुंठ, लवंग पूड घालून त्यात मध घालावा व तयार झालेला रस २-२ चमचे तीन वेळा प्याल्यास पोटदुखी, आम्लपित्त, गॅस हे आजार कमी होतात.
सावधानता
डाळिंबामध्ये औषधी गुणधर्म खूप आहेत त्यामुळे कच्चे पिकलेले सर्व प्रकारचे डाळिंब शरीराला उपयुक्त आहे. फक्त डाळिंब खाण्यापूर्वी त्याची साल स्वच्छ धुऊन घ्यावी कारण कीड लागू नये म्हणून त्यावर कीटकनाशकांचा वापर केलेला असतो.
डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खावेत. उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.
sharda.mahandule@gmail.com