डॉ. शारदा महांडुळे
द्राक्ष हे फळ म्हणजे निसर्गाचा अनमोल मेवा आहे. याच्या सेवनाने शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन स्फूर्ती मिळते. द्राक्षाचा लालसर रंगाचा वेल असतो. शेतामध्ये मांडव करून त्यावर वेल चढविला जातो. युरोप, अमेरिकेमध्ये द्राक्षाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. तर भारतात पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, जळगाव या भागांत द्राक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मराठीमध्ये द्राक्षे, हिंदीमध्ये अंगुर, संस्कृतमध्ये द्राक्षा तर, इंग्रजीमध्ये ग्रेप्स आणि शास्त्रीय भाषेत विटीस विनीफेरा या नावाने द्राक्षे ओळखतात.
आणखी वाचा : आहारवेद : आरोग्यवर्धक रक्तपित्तशामक कोकम
औषधी गुणधर्म :
काळी व हिरवी अशा दोन प्रकारची द्राक्षे असतात. यापकी काळ्या द्राक्षांमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा वापर औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. आयुर्वेदानुसार द्राक्षे ही मधुर रसात्मक, मधुर विपाकी आणि शीतवीर्याची असतात. तसेच द्राक्षे मृदू विरेचक, दाहनाशक, तृप्तीदायक, श्रमहारक व ज्वरघ्न असतात.
द्राक्षांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच ए व बी कमी प्रमाणात असतात. द्राक्षांमध्ये फलशर्करा व पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. ही फलशर्करा नैसर्गिक असल्यामुळे खाल्ल्याबरोबर लगेचच रक्तात शोषली जाते. त्यामुळे थकवा आलेला असल्यास द्राक्ष सेवन केल्यावर लगेचच ऊर्जा व उत्साह निर्माण होतो. नैसर्गिक फलशर्करेमुळे (ग्लुकोज) रुग्णांसाठी द्राक्ष हे आजारपणातील उत्तम टॉनिक आहे. शरीरामध्ये होणाऱ्या चयापचय प्रक्रियेसाठी ग्लुकोजची गरज असते. द्राक्ष सेवन केल्याने ही गरज भागविली जाते. त्यामुळे शरीर संवर्धन व निरोगी आयुष्य जगण्यासाठी द्राक्षे उपयोगी आहेत. ताप, क्षय, अशक्तपणा, पचनशक्ती मंदावणे या विकारांवर द्राक्षे हे एक उत्तम औषध आहे.
आणखी वाचा : आहारवेद : गरोदर महिला व गर्भस्थ बाळासाठी सर्वोत्तम कोहळा
उपयोग
० काळ्या मनुका रात्री पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात कुस्करून त्यामध्ये जिरेपूड टाकावी व हे मिश्रण मनुक्यासह हळूहळू प्यावे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते व यातील तंतूमय पदार्थ, सेंद्रिय आम्ल व नैसर्गिक शर्करा या गुणधर्मामुळे व दीपक-पाचक जिच्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार द्राक्षे मृदू-विरेचक असल्याने मलावरोध, बद्धकोष्ठता हे विकार दूर होतात.
० द्राक्ष आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने शरीरात होणारा दाह कमी होतो.
० शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यामुळे जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर द्राक्ष खाल्ल्याने हा त्रास लगेचच कमी होतो.
० स्त्रियांच्या आरोग्यासाठी व लहान मुलांच्या वाढीसाठी द्राक्ष हे फळ उत्तम आहे. कारण यामध्ये लोह, कॅल्शिअम व ग्लुकोज हे शरीर संवर्धन व रक्तवाढीसाठी उपयुक्त असणारे घटक भरपूर प्रमाणात आहेत.
० हिरड्यांमधून जर रक्त येत असेल व दात हिरड्यांपासून सैल होऊन हलत असतील तर अशा वेळी रोज द्राक्षरस व आवळा चूर्ण एकत्र करून हा रस तोंडात काही वेळ धरून ठेवला तर हिरडय़ांमधून रक्त येणे बंद होते व दात पक्के होतात.
आणखी वाचा : आहारवेद : सौंदर्यवर्धक काकडी
० किसमिस, सुंठ, मिरी, पिपळी, आवळा, ज्येष्ठमध हे सर्व चूर्ण एकत्र करून त्यात थोडा मध घालून दिवसातून तीन वेळा हे मिश्रण चाटण करावे यामुळे कोरडा खोकला बरा होतो.
० काळ्या मनुका व ज्येष्ठमध रात्री भिजत घालावे. सकाळी उकळून प्यायल्याने शरीराचा दाह कमी होतो व तृष्णारोग बरा होतो.
० द्राक्ष, खडीसाखर, मध व पिपळी एकत्र घेतल्याने धातूक्षय कमी होऊन अशक्तपणा दूर होतो.
० द्राक्ष, काळ्या मनुका व धणे रात्री थंड पाण्यात भिजत घालून सकाळी प्याल्याने अर्धशिशी कमी होते.
० आम्लपित्त, अपचन, ढेकर येणे या पित्तविकारांवर द्राक्ष खाल्ली असता पित्तप्रकोप कमी होऊन आराम मिळतो. द्राक्षामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आहे, तसेच पोटॅशिअम क्षारही आहेत. त्यामुळे मूतखडा, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना व जळजळ यावर द्राक्षे मूत्रल गुणाचे असल्यामुळे उपकारक ठरतात.
आणखी वाचा : आहारवेद: मधुमेही आणि हृदयरुग्णांसाठी वरदान – टोमॅटो
० दारूचे व्यसन सोडण्यासाठीही द्राक्षांचा उपयोग होतो. द्राक्ष हे अल्कोहोलचे शुद्ध रूप असल्या कारणाने दारूच्या आठवणींने व्याकूळ होणाऱ्या रुग्णाला द्राक्षरस द्यावा. काही दिवस सतत द्राक्षरस दिल्याने दारूचे व्यसन सोडता येऊ शकते.
० वर्षभर द्राक्षे उपयोगात यावीत म्हणून द्राक्षरस, द्राक्षावलेह, द्राक्षारिष्ठ, द्राक्षासव या स्वरूपात त्यांचा उपयोग करावा.
० द्राक्षवेलीची पाने मूळव्याध या आजारावर उपयोगी आहेत. याच्या पानांचा रस प्यायल्याने मूळव्याधीची सूज कमी होते व शौचाच्या जागी जखम झाली असेल तर वाळलेल्या पानांची राख तुपामध्ये मिसळून लावल्यास जखम बरी होते.
सावधानता :
अतिआंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नयेत. यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो, तसेच बाजारातून द्राक्ष आणल्यानंतर ती गरम पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवावीत. त्यावर असणारा पांढरट कीटकनाशकांचा थर धुऊन स्वच्छ झाल्यानंतरच द्राक्षे खावीत.
तसेच द्राक्ष मूत्रल, विरेचक असल्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्याने जुलाब व अतिप्रमाणात लघवी होते व त्यामुळे अशक्तपणा वाढतो. म्हणून द्राक्षे प्रमाणात खावीत. द्राक्ष अतिप्रमाणात सेवन केल्याने ग्लानी येऊन खूप झोप येते. म्हणून अतिरेक न करता थोड्या प्रमाणात द्राक्षे खावीत.
sharda.mahandule@gmail.com