आपल्या देशात तुळशीला (Tulsi) अत्यंत पवित्र मानलं जातं. दररोज तुळशीची पूजा केली जाते. धार्मिकदृष्ट्या तर तुळशीचं महत्त्व आहेच पण तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहे. आयुर्वेदातही तुळस अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक आजारांवर तुळस रामबाण उपाय समजली जाते. कफ, खोकला, सर्दी यामध्ये तुळशीचा काढा करुन प्यायल्याने लगेचच आराम मिळतो. पोटदुखीवरही तुळशीचा चांगला उपयोग होतो. अगदी दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठीही तुळशीचा चांगला उपयोग होतो. पण त्वचेसाठीही तुळस अत्यंत गुणकारी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्वचेच्या अनेक समस्या तुळशीमुळे दूर होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : आहारवेद : पिष्टमय पदार्थांचे चरबीतील रूपांतर थांबविणारा कोबी

सध्या सगळीकडेच प्रचंड प्रदूषण आहे. या प्रदुषणामुळे त्वचेवर परिणाम होतोच; त्वचेचा पोत बिघडतो, टॅनिंग होतं.त्यामुळे मुरुमं पुटकुळ्या होतात. तुळशीमध्ये मुळातच जंतूनाशक गुणधर्म असल्याने सध्या बहुतेकांना भेडसावणारी चेहऱ्यावरील मुरुमं, पुटकुळ्या, पुरळ (Acne) यांची समस्या, काळी वर्तुळे (Dark Spots), पिग्मेंटेशन हेही कमी होतं. त्यामुळे त्वचा आतूनही स्वच्छ होते, रक्तप्रवाह वाढतो. तुळशीची पाने किंवा तुळशीची पावडर अगदी सहज उपलब्ध असल्याने तुळशीचा फेस पॅक करणं अगदी सोपं आहे. अगदी ऑईली स्कीनसाठीही तुळशीचा फेसपॅक फायदेशीर आहे. यामुळे डेड स्कीन निघून जाते, चेहऱ्याचा रंग उजळतो, चेहऱ्याची त्वचाही स्वच्छ होते. मुरुमांमुळे चेहऱ्यावर पडलेले डाग तुळशीच्या पॅकमुळे स्वच्छ होतात. स्कीन टोनर म्हणूनही तुळशीचा उपयोग होतो. तुळस ही नैसर्गिकरित्या व्हाईटनिंगचं काम करते. तुळशीपासून कोणकोणते पॅक बनवता येतात आणि त्याचे काय फायदे आहेत ते पाहूया-

आणखी वाचा : आहारवेद : गर्भवतींसाठी उत्तम- दुधी भोपळा

कोरफड आणि तुळस फेसपॅक
यासाठी तुळशीची ताजी पाने वापरा. तुळशीची पाने स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट करा. या पेस्टमध्ये १ ते २ चमचे कोरफड जेल घालून ते चांगलं एकत्र करा. हा पॅक १५ ते २० मिनिटे चेहऱ्याला लावा. नंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहऱ्यावरील मुरुमं जाण्यासाठी हा पॅक फायदेशीर आहे. तसंच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठीही याचा उपयोग होतो.

तुळस आणि गुलाबपाणी

तुळशीची पाने धुऊन त्याची पेस्ट करा. या पेस्टमध्ये गुलाबपाणी मिसळा आणि हा पॅक चेहऱ्याला लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. या पॅकमुळे त्वचा स्वच्छ होते.

आणखी वाचा : आहारवेद : गर्भवतींसाठी उत्तम- दुधी भोपळा

तुळस आणि हळदीचा पॅक

एक चमचा तुळशीची पावडर घ्या. त्यात चिमूटभर हळद घाला. गुलाबपाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. तुम्हाला मुरुमं असतील त्या भागात हा पॅक लावा. १५-२० मिनिटांनंतर पाण्याने धुऊन टाका. हा पॅक आठवड्यात जोन- तीन वेळा लावल्यास मुरुमांची समस्या कमी होते.

तुळस आणि दूध पॅक

तुळशीची ताजी पाने वाटून घ्या किंवा तुळस पावडर घेतली तरी चालेल. त्यामध्ये दोन चमचे दूध मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा गार पाण्याने धुऊन घ्या.यामुळे त्वचेचा रंग उजळतो.

तुळस आणि दही

तुळशीच्या पावडरमध्ये दही मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका. यामुळे टॅनिंग कमी होतं. उन्हाळ्यात तर हा फेसपॅक अवश्य लावावा.

आणखी वाचा : आहारवेद : आरोग्यवर्धक रक्तपित्तशामक कोकम

तुळस आणि लिंबू

चेहऱ्यावर खूप जास्त पुरळ किंवा डाग असतील तर तुळशीच्या पानाच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिसळा. यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वचेचा रंगही उजळतो. पुरळ कमी होण्यासही मदत होते. आठवड्यातून दोन वेळा हा पॅक लावल्यास त्याचा चांगला परिणाम होतो.

तुळस, चंदन पावडर पॅक

तुळशीच्या पानांची गुलाबपाणी घेलून पेस्ट करा. त्यामध्ये एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर, चंदन पावडर एक चमचा मिसळा. हा पॅक चेहऱ्याला लावा आणि १५-२० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. त्वचा कोरडी असेल तर या पॅकमध्ये थोडासा मधही घाला. यामुळे चेहऱ्यावरचे डाग , मुरुमं कमी होण्यास मदत होते.

तुळस आणि तांदळाचं पीठ पॅक

उन्हामुळे तुमची त्वचा खूपच काळवंडली असेल तर तुळस उत्तम उपाय आहे. तुळशीच्या पानाची पेस्ट करा. त्यात एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा दही आणि लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर हा पॅक लावा . १५-२० मिनिटांनी गार पाण्यानं धुऊन टाका. यामुळे टॅनिंग कमी व्हायला मदत होईल.

तुळशीचा स्कीन टोनर
तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्या. पाण्याचा रंग हिरवा झाला की गॅस बंद करा. हे पाणी थंड झालं की एका स्प्रेच्या बाटलीत भरुन ठेवा. हे पाणी स्कीन टोनर म्हणून वापरता येईल. हवं असल्यास या पाण्यात तुम्ही मधही घालू शकता.

त्याशिवाय तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासही तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून त्याने चूळ भरा. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. दररोज सकाळी तुळशीची पाने खाणे हे आरोग्यासाठीच चांगले असते.

(शब्दांकन : केतकी जोशी)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy tips multipurpose benefits of tulsi anti bacterial to good for facial vp