डॉ. अभिजीत देशपांडे, निद्राविकारतज्ञ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन लेखांत आपण ‘हार्टमॅथ’ या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. या लेखमालेचा उद्देश मुळी नवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्यांनाच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनादेखील करून देणे हा आहे. दोन वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाणीवर मुलाखत देताना या तंत्रज्ञानाबद्दल मी सांगितले. तो भाग प्रसारित करण्याच्या अगोदर मुख्य संपादकांचा फोन आला की आम्ही याबद्दल अनेक डॉक्टरांशी बोललो; पण ते काही हे तंत्रज्ञान वापरत नाहीत! मग हे तंत्रज्ञान ‘ऑथेंटिक’ आहे ना?

मला त्यात डॉक्टरांचा काही दोष दिसत नाही. याचे कारण, जरी आपण एक तृतीयांश आयुष्य झोपेत घालवले तरी सबंध वैद्यकीय शिक्षणात एका टक्क्यापेक्षा कमी वेळ हा निद्राविकार आणि त्या संदर्भातील तंत्रज्ञानाबद्दल दिला जातो. शिवाय आपल्या देशात औषधे देण्याची आणि घेण्याचीच जबरदस्त प्रथा आहे! मग ती कुठल्याही पॅथीची असोत. अनेक वाचकांचे असेही प्रश्न आले की हे तंत्रज्ञान इतर मानसिक समस्यांकरिता (जसे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिऑर्डर, बायपोलार वगरे) वापरता येईल का? याचे उत्तर असे की उपयोग असला तरी याबाबतीत तुमच्या मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा आहे. निद्राविकारांमध्ये याचा निश्चित फायदा होतो.

‘हार्टमॅथ’ मधील तालबद्धता वाढवण्यासाठी अनेक गोष्टींपैकी विशिष्ट लयीने केलेला श्वासोच्छ्वास हा एक प्रकार आहे. अनेक योगोपचार पद्धतीत (सुदर्शन क्रिया, विपश्यना, क्रिया योग, सहजयोग) अशाच प्रकारचा वापर असतो. फरक फक्त इतकाच आहे की तंत्रज्ञानामुळे एकास एक असे प्रमाण असल्याने कदाचित शिकणे पटकन होते. पतंजली योगसूत्रातदेखील गुरुशिष्य संबंध आणि इतर ग्रंथातील वर्णनाप्रमाणे ‘एकास एक’ हेच अभिप्रेत असावे असे दिसते. याचा अर्थ वरील उल्लेख केलेल्या पद्धती गौण आहेत असे नाही. श्री श्री रवीशंकर, रामदेवबाबा आदींनी आपल्याला हे ज्ञान दिले आहे. पण हजारो लोक बरोबर शिकत आहेत की नाही हे पाहायला ते एकटे कसे पुरे पडणार? अशा वेळेला तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे.

या हार्टमॅथचा वापर आपले हृदय कुठल्या आठवणीत जास्त रमते याचा शोध घेण्यासाठीदेखील होतो. एक गमतीदार घटना सांगतो. आपण स्वत:ला कसे फसवत असतो. ज्या घटना अथवा आठवणी आपल्याला खूप आनंददायी वाटतात त्या सगळ्या हृदयाचा कोहोरन्स (ताल वा लयबद्धता) वाढवतीलच असे नाही. किंबहुना अनेक मोठ्या यशाबद्दलच्या घटना आपला अहंकार सुखावतात. पण त्या हृदयाच्या जवळ असतातच असे नाही. आमच्या संस्थेमध्ये एक प्रथितयश कलाकार जोडपे आले होते. सिनेमा, टीव्ही, सीरियल्समध्ये उत्तम नाव, मान-सन्मान, पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांना उत्सुकता म्हणून आम्ही प्रोब लावले आणि त्याला विचारले की, तुझ्या जीवनातील अत्युच्च आनंदाचे क्षण / आठवणी सांगा. पटकन उत्तर आले की अर्थात हिने मला जेव्हा लग्नाला होकार दिला तेव्हा, पण त्याची आठवण सांगत असताना हिरव्या रंगात कोहोरन्समध्ये फारसा फरक दिसला नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की ती घटना त्याच्याकरिता आनंददायी नव्हती (हे तिला समजावताना नाकीनऊ आले!) पण हृदयापेक्षा हा आनंद वैचारिक मेंदूचा (इगो) होता हे निश्चित! पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील मूलभूत फरक आम्हाला नेहमीच आढळला आहे. उदा. स्त्रियांमध्ये त्यांच्या मुलाचे अथवा मुलीचे नुसते नाव घेतले तरी त्यातील तालबद्धता वाढते. तसेच स्त्रियांमध्ये कृतज्ञतेची भावना जास्त असते याचाही प्रत्यय येतो. (ही बाब मी स्वत: पुरुष असलो तरी माझ्या बायकोसमोरही मान्य करतो!) याउलट पुरुषांमध्ये त्यांच्या मित्रांबद्दलच्या आठवणी, छंद, विशेषत क्रिकेट आणि टीव्हीवरील बातम्या बघणे इत्यादींमुळे कोहोरन्स वाढतो. लहानपणी मिळालेली शाबासकीची आठवण पुरुषांकरिता तर कठीण प्रसंगी कुणीतरी कृष्णासारखे मदतीला उभे राहिल्याची आठवण स्त्रियांचा कोहोरन्स वाढवते. याचा अनुभव असल्यानेच मी त्याला छंदाबद्दल विचारले. मग त्याने क्रिकेटच्या वेडाबद्दल सांगितले. त्याच्या मते ॲक्टिंगमुळे त्याला सर्व मानमरातब, पैसा वगैरे मिळाले आणि तो समाधानी आहे. पण क्रिकेटमध्येदेखील त्याला उत्तम गती होती आणि पुढेमागे कदाचित सचिनबरोबर खेळायची संधी मिळाली असती! याबद्दल बोलत असताना त्याचा कोहोरन्स झरझर वाढत होता. त्यामुळे मी त्याला क्रिकेट संदर्भातल्याच आठवणींचा विचार करण्यास सांगितले आणि थो़ड्याच वेळात पठ्ठ्याचा कोहोरन्स ऐंशी टक्क्यांच्या वर पोहोचला. मी त्याला कुठली आठवण आली हे विचारले असताना, ‘फार काही विशेष नाही अगदी किरकोळ आठवण आहे’ असे उत्तर आले. आग्रह केल्यानंतर तो म्हणाला की लहानपणी गल्लीत क्रिकेटची मॅच होती. हा बॅटिंग करत असताना एका कठीण चेंडूवर त्याने सिक्सर मारली. दूर झाडाखाली त्याचे वडील टाळ्या वाजवताना त्याला दिसले. ‘‘बस एवढी क्षुल्लक आठवण पण हृदयाच्या कप्प्यावर तिचा असा पगडा होता की सगळ्यात जास्त कोहोरन्स तिच्यामुळे होता!

‘साऊंड ऑफ म्युझिक’ या ऑस्करविजेत्या चित्रपटात एक सुंदर गाणे आहे. मारिया नावाची नॅनी लहान मुलांना जेव्हा भीती वाटते तेव्हा छोट्या छोट्या पण प्रिय गोष्टींची आठवण करा असा सल्ला देणारे गाणे गाते. गाण्याची सुरुवात आहे, ‘गर्लस् इन व्हाईट ड्रेसेस विथ ब्लु सॅटिन…’ हार्टमॅथमध्ये कोहरन्स वाढवण्याकरिता आपण अशाच छोट्या आठवणींचादेखील वापर करतो आणि अशा हृदयाच्या कप्प्यातील आठवणी शोधायलादेखील तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. अर्थात ‘हार्टमॅथ’ तंत्रज्ञान म्हणजे लाय डिटेक्टर टेस्ट नाही हे कृपया ध्यानात घ्या. नाही तर समस्त संशयी प्रेमीजनांची झुंबड उडायची!

उज्जायी प्राणायामानंतरदेखील कोहोरन्स वाढतो असा आमचा अनुभव आहे. एका स्वस्त, कोणीही, कुठेही करू शकेल अशा व्यायामाचा उल्लेख करावासा वाटतो. बसलेल्या स्थितीत असताना. गुडघ्यावर हाताने हलकासा दाब द्यायचा आणि पायाची बोटे जमिनीवर ठेवून फक्त टाचा उंचवायच्या. याने पोटऱ्यांच्या स्नायूला व्यायाम मिळतो. दिवसातून कितीही वेळा हे करावे. जितका जास्त आकडा तितके चांगले. कमीत कमी पाचशे वेळा तरी हे कराच. हा व्यायाम फुकट आणि सहज करता येण्यासारखा असल्याने दुर्दैवाने तो कोणीच गांभीर्याने घेत नाही. अर्थात हा अनुभव काही नवा नाही. विकत घेतलेल्या गाडीचा मेन्टेनन्स् करताना आपण अगदी वेळापत्रक पाळणे, पैसे मोजणे असा प्रकार करतो. पण शरीराकडे मात्र ‘नो मेन्टेनन्स’ अशीच बहुतेकांची वृत्ती असते. फक्त त्रास द्यायला लागली की लगेच धावपळ! काय बरे महत्त्व आहे या पोटऱ्यांचे? एक तर भारतीय लोकांची शरीरयष्टी बघितली तर खांदे, पोट यांच्या मानाने पोटऱ्या अगदीच बारीक दिसतात. याच स्नायूंना वैद्यकशास्त्रात रक्ताभिसरणाचे ‘अतिरिक्त पंप’ मानले जातात. हृदयाला मदत करणे हे यांचे काम आहे. किंबहुना ज्यांना अंजायना पेकटोरीस म्हणजे हृदयरोगाचा त्रास आहे. त्यांच्या वेदनशमनाकरिता / आणि खुद्द हृदयाला चांगला रक्तपुरवठा व्हावा म्हणून हल्ली पोटऱ्यांना बाहेरून दाबणारे पंपाची थेरपी वापरतात. जसे हे स्नायू बळकट होत जातात तसा ‘हार्टमॅथ’मधला कोहोरन्स वाढतो आणि आपोआपच ‘ऑल इज वेल’ ही भावना वाढते.

या लेखामध्ये आपण हृदयाला जवळ असलेल्या गोड आठवणींबद्दल बोललो. एकदा तुम्हाला इच्छेनुसार कोहोरन्स म्हणजे तालबद्धता आणता येऊ लागली की एखाद्या शस्त्रासारखा त्याचा उपयोग रोजच्या जीवनात आपण करू शकता.

तुम्ही चहा पिताना चुकून शर्टवर सांडला तर आपण लगेच थोडेसे पाणी घेऊन लावतो आणि तो डाग निघून जातो. याउलट समजा तुम्ही अर्धा तास थांबलात तर आता केवळ थोड्याशा पाण्याने तो डाग जात नाही, साबणाने खरखसून घासावे लागते. आयुष्यात होणाऱ्या (इतर व्यक्तींबरोबरच्या) घडामोडी आणि त्यांचे परिणाम चहाच्या डागासारखे असतात. तुम्ही ती घडल्यानंतर लगेच ‘हार्टमॅथ’चा तीन मिनिटेच वापर केलात तरी हे डाग निघून जातात. पण आपल्याकडे हे शस्त्र नसल्याने आपण घटनेकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे डाग पक्का होत जातो. आता हे डाग धुण्याकरिता असलेला साबण म्हणजे रेम झोपेची अवस्था! एखाद्या लाँड्री मशीनसारखी आपली झोप दिवसभर घडलेल्या घटनांची पडताळणी घेत असते.

जर या लाँड्री मशीनला प्रमाणाबाहेर जास्त कपडे दिले तर कपडे तर धुतले जाणार नाहीतच पण मशीनदेखील खराब होईल. अशा रीतीने दिवसभरातील घटना साचून झोपेचे खोबरे होऊ शकते अथवा गाढ झोप लागत नाही. इथेच हार्टमॅथचा खरा उपयोग होतो.

पुढच्या लेखात कडू आणि काट्यासारख्या रुतलेल्या आठवणी आणि बिघडलेली झोप यावर…

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heartmath technology and its implementation in medical field by doctors asj
Show comments