संपदा सोवनी
हल्ली सलूनमध्ये जाऊन किंवा घरीच केसांवर वेगवेगळ्या स्टायलिंग प्रोसिजर्स करण्याचा ट्रेंड जोरात आहे. यात केस ‘ब्लो-ड्राय’ करणं- अर्थात गरम हवेचा झोत ड्रायरनं केसांवर मारून केस वाळवणं, ‘स्ट्रेटनर’नं केस सरळ करणं किंवा केस कुरळे करण्यासाठी ‘कर्लर’चा वापर करणं, अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. या सर्व ट्रीटमेंटस् मध्ये केसांना उष्णता लागते. यावर उतारा म्हणून सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारात एक उत्पादन मोठ्या प्रमाणावर दिसू लागलं आहे, ते म्हणजे ‘हीट प्रोटक्टंट क्रीम वा स्प्रे’. (उदा. ‘ब्लो-ड्राय क्रीम्स’ किंवा ‘ब्लोआऊट बाम’ आणि इतर.)
वेगवेगळ्या ब्रँडची हीट प्रोटेक्टंटस् ऑनलाईन बाजारात दिसू लागली आहेत. यात प्रथम आपण ब्लो-ड्रायरचा विचार करू या- केस धुतल्यानंतर टॉवेलनं पुसून घेतात आणि अशा अर्धवट ओल्या केसांवर ब्लोआऊट बाम लावतात. हा बाम तळहातावर घेऊन स्काल्पला न लावता केसांना ज्या प्रकारे कंडिशनर चोळून लावतात तसा लावला जातो. नंतर एक ब्रश वापरून हा बाम केसांवर परसवला जातो. त्यानंतर केस ड्रायरनं ब्लो-ड्राय केले जातात. असा बाम वा क्रीम वापरल्यामुळे केसांवर उष्णता देणाऱ्या ट्रीटमेंटस् केल्या जातात, तेव्हा केस एकमेकांत गुंतत नाहीत, ‘फ्रिझी’ होत नाहीत, असं म्हणतात. केस निर्जीव दिसू नयेत आणि त्यांवर चमक यावी यासाठी बाजारात काही ‘शाईन मिस्ट स्प्रे’सुद्धा आले आहेत. ब्लो-ड्राय केलेल्या केसांवर हा स्प्रे फवारल्यावर केसांवर आरशासारखी चमक येते, असा दावा उत्पादक कंपन्या करतात.
परंतु हीट प्रोटेक्टंटस् चा खरा उपयोग आहे, जे लोक वारंवार ‘हीट स्टायलिंग’ करतात. हेअर स्टायलिस्ट मंडळींच्या मते केसांवर ‘हीट स्टायलिंग’ प्रोसिजर्स करायच्या असतील तर तुमचं ‘हेअर रूटीन’ हे आरोग्यदायीच हवं. म्हणजे केस जर ‘हेल्थी’ आणि चांगले नसतील, तर हीट स्टायलिंगमुळे केस खराब होण्याची शक्यताच मोठी आहे. याचाच अर्थ तुम्हाला वारंवार हीट स्टायलिंग करायचं असेल तर केवळ शॅम्पू आणि कंडिशनर वापरून पुरणार नाही. स्टायलिंग उत्पादनांच्या तापमानाचाही विचार करू या. ब्लो-ड्रायरचं तापमान साधारणपणे २७ ते ६० अंश सेल्सियस एवढं असतं. अर्थातच ही उष्णता काही फार जास्त नाहीये. केस सरळ करणारा ‘फ्लॅट आयर्न’, केस कुरळे करणारा ‘कर्लिंग आयर्न’ किंवा ‘कर्लिंग वांड’ ही इतर उपकरणं मात्र यापेक्षा कितीतरी जास्त- म्हणजे जवळपास २३२ अंश सेल्सिअसपर्यंत गरम होत असतात. या स्टायलिंग उपकरणांना गरम असताना थेट स्पर्श झाल्यास गंभीररीत्या भाजण्याचा धोका असतो तो यामुळेच. कित्येकदा चुकीच्या प्रकारे केस आयर्न करण्याच्या प्रयत्नात केस जळाल्याचा अनुभव आजवर अनेकांनी घेतला आहे! या सर्व कारणांमुळे केसांवर ‘हीट प्रोटेक्टंट’ उत्पादनं लावणं उपयुक्त ठरू शकतं. हीट प्रोटेक्टंट खरेदी करताना ‘फ्लॅट आयर्न’ किंवा ‘कर्लिंग आयर्न’च्या जादा उष्णतेपासून ती संरक्षण देऊ शकतील का, ते तपासणं आवश्यक आहे, असंही स्टायलिस्ट्स सांगतात.
आणखी वाचा-ग्राहकराणी : तुमची ‘ओळख’ कुणी चोरत नाही ना?
आपल्या केसांना योग्य ठरेल असं आणि आपण जे स्टायलिंग उत्पादन वापरणार आहोत, त्याच्या उष्णतेला चालेल असं ‘हीट प्रोटेक्टंट’ वापरल्यास त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. मात्र त्याचा केसांवर नेमका कसा वापर करायचा आहे, हे जरूर जाणून आणि शिकून घ्यावं. हे सर्व असलं, तरी शक्यतो वारंवार हीट स्टायलिंग करणं टाळावं हेच खरं!
lokwomen.online@gmail.com