गेल्या बऱ्याच दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने काल अचानक मुसळधार पावसाला सुरुवात केली. ऑफिसच्या काचेच्या खिडकीतून हा पाऊस पाहताना छान वाटत होतं. त्यामुळे कधी नव्हे ते हातात चहाचा मग घेऊन खिडकीबाहेर बराचवेळ कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत थांबले. हातातलं काम टाकून बाहेर पाहत मन शांत करावं अशी परिस्थिती फार कमी वेळा येते. त्यामुळे कालच्या या पावसामुळे खऱ्या अर्थाने रिलॅक्सिंग वाटलं. परंतु, या रिलॅक्सिंगचं क्षणार्धात ताणात रुपांतर झालं आणि मी भानावर आले की आपण बदलापूरला राहतो अन् मुंबईत नोकरीला येतो. पावसामुळे कितीही छान वाटत असलं तरीही लोकल ट्रेन्समुळे पावसाळा सुसह्य बनत नाही. त्यामुळे मी तत्काळ मोबाईल हाती काढला अन् लोकल ट्रेन्सचे अपडेट चेक केले. तेव्हा मला कळलं की २० ते ३० मिनिटे लोकल उशिराने आहेत.

सुरुवातीला वाटलं की पाऊस ओसरला की ट्रेन होतील सुरळीत. त्यामुळे मीही काही निघायची घाई केली नाही. तासाभराने वाट पाहू आणि मग ठरवू असं ठरवून मी पुन्हा माझ्या कामाला लागले. पण एकामोगाएक धाडकन नोटिफिकेशन्स येऊ लागले. ऑफिसमध्येही इतर सहकाऱ्यांची पळापळी झाली. लोकल अडकून पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढतोय, मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत रेड अलर्ट दिलाय, अशा बातम्या झळकू लागल्या. त्यामुळे बॉसला विचारून आम्ही सर्वांनीच ऑफिसमधून लवकर कल्टी मारली.

ऑफिसमधून रेल्वे स्थानकापर्यंत जायला बसने जावं लागतं. आजूबाजूच्या कार्यालयातील कर्मचारीही लवकर निघाल्याने बस स्टॉपवरही तुफान गर्दी होती. त्यात पावसामुळे रस्ते जाम झाले होते. परिणामी बसही कमी प्रमाणात धावत होत्या. त्यामुळे बसमध्ये उभं राहायलाही जागा नव्हती. कसेबसे आम्ही उभे राहून स्टेशनपर्यंत पोहोचलो. स्टेशनवर पोहोचल्यानंतर पाहतो तर काय तिथे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा >> सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?

कोणत्या फलाटावरून कोणती गाडी सुटणार आहे याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. एक दोन गाड्या फलाटावर उभ्या होत्या. पण त्याला इंडिकेटर लावलं नव्हतं. त्यामुळे ही ट्रेन जाणार कुठे? याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. १५-२०मिनिटे वाट पाहिल्यानंतर नेमकी ती ट्रेन बदलापूरलाच जाणार असल्याचं कळलं. त्यामुळे इंडिकेटर लागताच सर्वच प्रवाशांनी टुमकन आतमध्ये उड्या मारल्या आणि मिळेल तिथे बसू लागले. पण इंडिकेटर लागल्यानंतरही ट्रेन जागेवरून हलेल तर शपथ. ट्रेन हलायलाच तयार नव्हती. त्यामुळे पुन्हा ट्रेनमधून उतरावं असं वाटू लागलं. मला पहिल्यांदा आपण एवढ्या लांब राहत असल्याचा गिल्ट येऊ लागला. जवळपास कुठे असतो तर चालत तरी गेलो असतो. पण आता बदलापूरपर्यंत पोहोचणार कसं? मनात अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. घरातून सातत्याने फोन सुरू होते. ट्रेन मिळाली असून बसायलाही मिळालं आहे, असं सांगून त्यांना धीर दिला. पण आता माझाच धीर सुटत चालला होता.

अखेर अर्ध्या तासाने ट्रेन जागची हलली. चार – पाच स्थानकांपर्यंत व्यवस्थित गेली. पण पुन्हा एका जागी लोकल थांबली. दोन स्थानकांच्या मधेच ट्रेन थांबल्याने नेमकं काय झालंय हे पाहण्याकरताही उतरता येत नव्हतं. अशातच माझ्या पोटात दुखू लागलं. बराच वेळ लघवीला न गेल्याने असह्य वाटू लागलं. ऑफिसमधून निघतानाही फ्रेश होऊन निघाले नव्हते. त्यात स्टेशनवरही बराच वेळ गेला अन् आता बदलापूरला उतरल्याशिवाय माझी काही खैर नव्हती. त्यातच ही गाडी दोन स्थानकांच्या मधे जवळपास दोन तास अडकून पडली. आता गाडी सुटेल, नंतर गाडी सुटेल असं म्हणत दोन तास गेले. या वेळेत मी घरी पोहोचले असते. त्यामुळे घरातल्यांचेही सातत्याने फोन यायला लागले. एकीकडे नैसर्गिक विधी उरकण्यासाठी पोट जाम झालं होतं, तर दुसरीकडे घरी न पोहोचल्याने घरातल्यांचे सतत फोन येत होते. दोन्हींकडून प्रेशन वाढत होतं.

हेही वाचा >> “मुलीचा रंग जरा काळाच आहे ना…”; नवजात बाळाच्या रुपाचीही समाजाला चिंता!

लांब पल्ल्यांच्या गाड्यांना शौचालये असतात. मुंबई लोकलचं जाळंही आता विस्तारलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, कसारा, पनवेल आणि चर्चगेटपासून ते विरारपर्यंत अशा दीड ते दोन तासांचा थेट प्रवास असल्याने लोकलमध्येही शौचालयांची व्यवस्था असायला हवी असं वाटायला लागलं. अनेक बायका यामध्ये खोळंबून राहिल्या होत्या. पावसाळ्यात सतत लघवीला होत असते, त्यात प्रवासात असला की याचा अधिक त्रास जाणवतो. पण ट्रेन मधेच थांबली असल्याने जाणार कुठे? असा प्रश्न बायकांना पडला. अखेर दोन तासांनी ट्रेन सुरू झाली. त्यानंतर पुढे दीड तासांनी मी घरी पोहोचले. आणि मग मी नैसर्गिक विधी आटोपून मोकळी झाले. म्हणजेच जवळपास चार ते पाच तास मी अशा अडनिड्या अवस्थेत लांब पल्ल्याचा प्रवास केला. त्यामुळे मुंबई लोकलमध्येही शौचलयांची व्यवस्था करायला हवी असं वाटायला लागलं. अजून तासभर ट्रेन जागची हलली नसती, किंवा इतर कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे रात्रभर तिथेच थांबून राहावं लागलं असतं तर काय झालं असतं? या प्रश्नांमुळे मला दुसऱ्या ऑफिसला जायचीच भीती वाटू लागली.

-अनामिका