आयुर्वेदानुसार बालपण हे कफाचं असतं, तरुणपण हे पित्ताचं तर म्हातारपण हे वाताचं असतं. त्यामुळे आजकाल सगळीकडे लहान मुले पाहिली की सर्दी, खोकला, दमा अशा कफज आजारांनी त्रस्त दिसतात. त्यात आताचा काळ म्हणजे तर ऋतुसंक्रमण काळ. त्यामुळे संक्रांत झाली की लहान मुलांच्या या तक्रारी आणखीनच वाढलेल्या दिसतात. निसर्गनियमामुळे हिवाळ्यात शीत काळाने शरीरात कफाचा संचय होतो. मग उन्हाळ्यातील थोड्याशा उष्णतेनेदेखील हा कफ पातळ होऊन नाकावाटे वाहू लागतो. त्यामुळे ‘सिझनल’ फ्लूपासून काही मुलांची सुटका होत नाही. मग जी मुलं आधीच ‘कफ’ वाढवणारा आहार जास्त घेत असतात ती पटकन आजारी पडतात. यामध्ये सकाळी सूर्योदयानंतरही झोपून राहणं, सकाळी दूध, बिस्किटं, केळी, चिकू, पेरू अशा कफवर्धक पदार्थाचे सेवन करणं. रोज आइस्क्रीम, चॉकलेट अथवा अन्य दुग्धजन्य गोड पदार्थ खाणं किंवा सध्याचा ‘पिझ्झा’सुद्धा लहान मुलांचा कफ फार वाढवतो.
दूरचित्रवाहिनीवरील जाहिरातीत मुलांनी चांगल्या ‘टूथपेस्ट’ने दात स्वच्छ केले की आइस्क्रीम, चॉकलेट खायला जणू काही मोकळीच झाली असं दाखवतात! खरं तर ‘समानाने समानाची वृद्धी’ होते हा आयुर्वेदाचा सिद्धांत! मग तुम्ही तो कितीही नाकारला तरी बालपण हे वय कफाचं, मग त्यात ‘शीत’ ऋतूत आणखीनच ‘शीत’ पदार्थाचं सेवन करत राहिलात तर या सिद्धांतानुसार कफाचे आजार होणारच. म्हणून तर हे टाळण्यासाठी प्रथम यांच्या उत्पत्तीचे कारण समजून घेतले पाहिजे. दर वेळी वेगवेगळ्या ‘लसी’ टोचून रोगप्रतिकारक शक्ती येत नाही. कारण रोगाचे जंतू हे आपल्यापेक्षा हुशार होतात व ते दर वर्षी त्यांचे स्वरूप थोडे थोडे बदलत असतात. आता गरज आहे ती आपण ‘हुशारी’ दाखविण्याची. आपणच कफ वाढू नाही दिला तर या ‘कफात’ वाढणारे जंतू वाढणारच नाहीत. ज्याप्रमाणे जिथे कचरा, अस्वच्छता असतात तिथेच जीव जंतूंची वाढ होऊन रोगराई पटकन पसरते अगदी तसेच.
हेही वाचा… विवाहपूर्व समुपदेशन: ‘प्लेटॉनिक लव्ह’ जोडीदार समजून घेईल का?
त्यामुळे अशा प्रकारच्या व्याधी टाळायच्या असतील तर लहान मुलांना रोज सकाळी दुधाची ‘शक्ती’ वाढविणारे पदार्थ दुधात टाकून पिण्याची सवय लावण्याऐवजी दूध न टाकलेला गवती चहा, तुळस व आलं (हवं असल्यास गूळ) टाकून घेण्यास प्रवृत्त केल्यास कफाचे आजारच होत नाहीत. पूर्वीच्या काळी आमची आजी आम्हा सर्वाना सकाळी लवकर उठवून चुलीसमोर बसवायची किंवा रात्री झोपताना छाती, पोट, पाठ शेकायला लावायची. एवढा गरमपणा जाणवायचा की बहुतेक सगळाच कफ एकाचवेळी वितळून निघून जायचा. कधी कधी सर्दी जास्त झाली तर ओव्याची धुरी, अथवा ओव्याच्या पुरचुंडीचा शेक मिळायचा. लक्षात ठेवा, शीत आजार असला की चिकित्सा ही उष्ण पाहिजे… आजकाल मुलांना नेमके हेच मिळत नाहीये. कारण बऱ्याच पालकांकडे मुळात या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ नाही किंवा माहिती नाही. आयुर्वेदात ‘चय एवम जयेत दोषम…’ असे चिकित्सा सूत्र आले आहे. म्हणजे आजार वाढण्यापूर्वीच ‘चय’ काळातच दोषांना जिंकले तर त्याचे रूपांतर व्याधीत होतच नाही.
harishpatankar@yahoo.co.in