हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, बॉक्सिंग अशा विविध खेळांमध्ये आणि क्रीडाविश्वात भारतीय महिलांनी आपले पाऊल रोवत इतिहास घडवला आहे. अनेक प्रसिद्ध खेळांमधील महिलांची कामगिरी अनेकांना माहीतदेखील असेल. मात्र ‘सुमो’ या विशिष्ट कुस्ती प्रकाराबद्दल फारच कमी बोलले जाते. आपल्या देशातील हेतल दवे ही सुमो कुस्तीमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. इतकेच नाही, तर हेतलची पहिली भारतीय महिला सुमोपटू म्हणून २००८ साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद झाली होती. हेतलने सुमो कुस्तीमध्ये अनेकदा भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले आहे. तिने सुप्रसिद्ध अशा वर्ल्ड गेम्समध्येदेखील एकमेव भारतीय महिला सुमो स्पर्धक म्हणून कामगिरी बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेतल दवेचा प्रवास

“मी केवळ पाच वर्षांची असल्यापासून खेळ हा माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग बनला होता. माझ्या आई-वडिलांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे खेडेगावात काढले होते. खरे तर कोणत्या न कोणत्या प्रकारे खेळ हा त्यांच्यादेखील आयुष्याचा भाग होता. लहानपणी माझे वजन अधिक होते अन् मी शरीराने जाड होते. त्यामुळे मला त्यावरून प्रचंड टोमणे मारले जायचे. अर्थात, त्या सगळ्यामुळे मला खूप वाईट वाटत असे. कधी कधी मला योग्य आकाराचे कपडेदेखील मिळत नसत. माझ्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती बारीक दिसत असल्याने घराबाहेर जाणेसुद्धा माझ्यासाठी खूप अवघड होते. माझे वजन माझ्यासाठी त्रासदायक बनत होते. मला खूप एकटे असल्यासारखे वाटू लागले होते. पण, असे असताना भविष्यात माझ्यासाठी काय लिहून ठेवले होते याची मला जराशीही कल्पना नव्हती आणि अचानक माझ्या स्पोर्ट्स क्लबने एके दिवशी सुमो चॅम्पियनशिप आयोजित केली”, असे हेतलने म्हटले असल्याचे ‘शी द पीपल’च्या [shethepeople] एका लेखावरून समजते.

हेही वाचा : पाककलेतील शिक्षण ते आहारतज्ज्ञ, कसा होता मानवी लोहियाचा ‘वेलनेस गुरु’ बनण्याचा प्रवास, पाहा

हेतलने याआधी अशा प्रकारची स्पर्धा कधीही पहिली पहिली नव्हती. त्यामुळे हेतलने काही दिवस कुस्तीच्या या प्रकाराचा अभ्यास करण्यात घालवले. मात्र त्या वेळेस सुमो क्षेत्रात कोणीही भारतीय महिला नसल्याचे तिच्या लक्षात आले. म्हणून हेतलने सुमोबद्दल माहिती मिळविण्यासाठी थेट जपानी संघटनेला एक पत्र लिहिले. त्यामध्ये तिने “महिलादेखील सुमो होऊ शकतात का”, असा प्रश्न विचारला होता. “मला आजपर्यंत माझ्या वजनामुळे खूप ऐकावे लागले होते. पण मग त्या गोष्टीचा वापर मी माझ्या फायद्यासाठी का करू नये? असा विचार केला”, असे हेतलने पुढे सांगितले.

सुरुवातीला हेतलला सुमो कुस्तीबद्दल खूप काही माहीत नसले तरीही तिने घेतलेले ज्युदोचे प्रशिक्षण तिथे कामी आले. मात्र, केवळ एवढे प्रशिक्षण उपयोगी नव्हते. सुमोचे प्रशिक्षण घेण्यापासून ते स्पॉन्सर्स शोधण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही हेतलसाठी एक परीक्षा होती.

स्पॉन्सर्स आणि सुमो क्षेत्रातील प्रवास

क्रीडाविश्वात महिला खेळाडूला स्पॉन्सर्स मिळणे खूप अवघड असते. अनेकदा समाजाचा दृष्टिकोन हा “लडकी है क्या कर पायेगी, इनसे कुछ नहीं होने वाला” महिला वा मुलींची अशा प्रकारची हेटाळणी केली जात असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. अनेकांना हेतल पैसे मिळविण्यासाठी सुमो कुस्तीबद्दल खोटे सांगत आहे, असे वाटत असे. “मात्र अनेक कुटुंबांनी मला मदत केली. माझे वडील आणि भाऊ हे माझे आधारस्तंभ होते. सर्वांच्या मदतीने मी वर्ल्ड गेम्समध्ये पोहोचलेल्या आठ आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंपैकी एक होते. त्यानंतर लवकरच एका गुजराती वृत्तपत्रांमुळे मला स्पॉन्सर्स मिळाले आणि दुसऱ्या क्षणी वर्ल्ड गेम्ससाठी मला व्हिसाही मिळाला.”

हेही वाचा : जगातील पहिल्या मिस AI ब्युटी स्पर्धेत भारतीय मॉडेल अंतिम स्पर्धेत! पाहा कोण आहे ‘झारा शतावरी’?

अशा प्रकारे हेतल सुमोच्या जागतिक मंचावर एक स्पर्धक, प्रशिक्षक व मॅनेजर म्हणून उभी राहिली होती. तो क्षण हेतलसाठी अविस्मरणीय असल्याचे तिने म्हटले आहे. “मी माझे व माझ्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले होते. पुढे २०१२ साली मी सुमो कुस्तीतून निवृत्ती घेतली आणि लग्न केले. अर्थातच, मी इतक्यात थांबणार नव्हते. त्यामुळे मी लहान मुलींना सुमो कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आता त्या मुलींपैकी अनेक जणी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून कामगिरी बजावत आहेत”, अशी प्रतिक्रिया हेतलने व्यक्त केली.

समाजाची भीती, लोक काय म्हणतील किंवा स्वतःचे शरीर यांमुळे अनेक मुलींना त्यांना जे हवे आहे ते मिळवता येत नाही. मात्र, इतरांना प्रशिक्षण देताना, मला अजून मोठे उद्दिष्ट सापडले आहे आणि त्याचा मला अधिक अभिमान वाटतो आहे, अशी माहिती हेतल दवेने दिली असलयाचे ‘शी द पीपल’च्या लेखावरून मिळते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hetal dave first indian female sumo wrestler who represented india in world games what was her journey check out chdc dha