प्रशांत ननावरे

सुखी संसाराचा मूलमंत्र सांगताना चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळीचा दाखला दिला जातो; ‘घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं… एकाने पसरवलं, तर दुसर्‍याने आवरायचं’. किती छान वाटतं ना वाचायला आणि ऐकायला. संसाराची स्वप्ने रंगवतानाही मुलं-मुली एकमेकांना आपण दोघे मिळून सर्वकाही करू, असंच सांगत असतात. चारोळीतील ‘एकाने’ हे विशेषण देखील दोघांनाही लागू आहे. पण खऱ्या आयुष्यात ही समानता क्वचितच उतरताना दिसते. इथे पसरवणारी आणि आवरणारी व्यक्ती ठरलेली आहे. पुरुषांच्या वाट्याला कायम पसरवणं येत आणि आवरायचं काम स्त्रीच्या वाट्याला येतं. एखाद्या घरात पुरूष आवरायचं काम करत असेल तरीही स्त्रीलाच दोष दिला जातो की नवऱ्याला घरातली कामं करायला लावते. हा दृष्टीकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ‘घर दोघांचं’ कसं होईल?

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
After the woman fell from the roof, her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love
VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत

लग्न नावाचा विधि पार पडतानाच मुलीच्या गळ्यात ‘मंगळसूत्र’ नावाची वेसण घातली जाते. (हिंदू धर्माशिवाय इतर धर्मांमध्ये ही प्रथा नसली तरी लग्नानंतर मुलींवर आपोआपच अलिखित बंधनं येतात.) मुलींवर संस्कृतीच्या नावाखाली दोघांमधील पहिली समानता इथेच नष्ट होऊन जाते. घरात नव्याने आलेल्या मुलीकडून अचानक सर्व गोष्टी करण्याची किंवा शिकून घेण्याची अपेक्षा आजही ठेवली जाते. विशेष म्हणजे अनेक मुलींनाही त्यात काहीच वावगं वाटत नाही. आपली संस्कृती, संस्काराचा तो भाग आहे, म्हणून त्यासुद्धा त्याचा प्रतिकार न करता ‘लग्नानंतर हे असंच असतं’ म्हणून निमूटपणे त्याचा स्वीकारतात. लग्नाच्या बोलणीतच मी बोहल्यावर चढताना मंगळसूत्र घालणार नाही किंवा माझ्या आवडीनुसार एक दागिना म्हणून मी तो घालेन, असा युक्तिवाद किती मुली करतात? एवढंच कशाला मुलेही ‘माझी बायको मंगळसूत्र घालणार नाही’, अशी ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. हल्ली शहरांमध्ये लग्नानंतर वेगळ्या राहणाऱ्या जोडप्यांमध्ये मुलींना कायम मंगळसूत्र घालण्याची सक्ती नसते. पण लग्न झालेल्या स्त्रीची ओळख म्हणजे ‘मंगळसूत्र, कुंकू, हिरवा चुडा’ ही प्रतीकं, विचार आणि आचार जोपर्यंत समूळ नष्ट होत नाहीत, तोपर्यंत संसाराची सुरुवात समानतेच्या तत्त्वाने होणार नाही.

आणखी वाचा : असमानता दूर करणारी महिलांसाठीची कायदेसाक्षरता

भारतीय समाजात आई- वडील मुलीला कितीही लाडाने वागवत असले, स्वातंत्र्य देत असले (?) तरीही लग्नानंतर मुलीला सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणारच आहेत, म्हणून हे सर्व करत असतात का, अशी शंका येते. मुळात आई-वडिलांच्याही बोलण्या- वागण्यातून कळत-नकळतपणे हेच मुलींपर्यंत पोहचवले जात असल्यामुळे मुली आपोआपच आपल्या मनाची तयारी करत असतात. ‘पण हे असं का?’ हा प्रश्न कुणी विचारताना दिसत नाही. ज्या विचारतात त्यांना ‘मुलगी’ असल्याची जाणीव करुन दिली जाते.

मुलं मात्र लग्नाआधी आणि नंतरही निश्चिंत असतात कारण आईनंतर त्यांच्या कौटुंबिक- सांसारिक गरजा भागवण्यासाठी दुसरी स्त्री त्यांना मिळणार असते. खरंतर लग्नानंतर आपल्याला भागीदार मिळणार म्हणून मुलींनी निर्धास्त व्हायच्या ऐवजी त्यांच्यावर एकप्रकारचं दडपण येतं. कारण नवऱ्यासोबतच्या भागीदारीत त्याच्या कुटुंबातील व्यक्तीही अप्रत्यक्षपणे सहभागी असतात.

जगायला लागणाऱ्या मूलभूत घटकापैकी अन्न शिजवण्याची जबाबदारी ही लग्नानंतर मुलींवर येऊन पडते. मुलगी कितीही उच्चशिक्षित असली तरी मुलीला स्वयंपाक येत नाही, ही आजही शरमेची बाब मानली जाते. मुळात तिच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणांकन तिच्या पाककौशल्यावरुनच केले जाते. म्हणूनच की काय ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ हे भोग तिच्या आयुष्यातून संपताना दिसत नाहीत. अलिकडे ‘ओटीटी’ व्यासपीठावर आलेल्या ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळी चित्रपटातून भारतीय समाजव्यवस्थेतील बहुतांश स्त्रियांची होणारी घुसमट आणि कुटुंबातील स्थान याचे उत्कृष्ट चित्रण केले आहे. पण वारंवार सत्यकथन करुनही आपल्या पुरुषप्रधान समाजाला पाझर फुटत नाही आणि स्त्रियांकडूनही कोणतेही बंड होताना दिसत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.

आणखी वाचा : डिजीटल लिंगभेद आणि निरक्षरता

घर आवरणं, स्वयंपाक करणं, मुला-मुलींची देखभाल करणं या गोष्टी पुरुष मंडळी करत असली तरी ती आपलीही समान जबाबदारी आहे, हा विचार अद्याप पूर्णत: रुजलेला दिसत नाही. कुटुंबातील महिलासुद्धा ते करण्यासाठी पुरुषांना प्रोत्साहन देत नाहीत, त्यामुळे लहानपणापासून नकळतच तेच संस्कार होत जातात. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस हा प्रगल्भ प्राणी आहे. स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय हे तो चांगल्या प्रकारे जाणतो, मात्र आचरणात आणणे त्याला आजवर का जमले नाही, हे न उलगडणारे कोडे आहे!

लग्नानंतर बायको म्हणजे जणू आपली गुलामच आहे, अशी वागणूक तिला दिली जाते. तर दुसरीकडे सोफ्यावर निवांत बसलेल्या बायकोला नवऱ्याने ग्लासभर पाणी आणून दिल्यास नवऱ्याला ‘बायकोचा गुलाम’, ‘बायल्या’ ही विशेषणं सर्रास जोडली जातात. काही वेळेस हे गमतीने म्हटलं जात असलं तरी त्या मानसिकतेतून आपण कधी बाहेर पडणार हा खरा प्रश्न आहे.

आणखी वाचा : ‘ती’, ‘तो’ आणि समानता!

लग्नानंतर घरातील समानतेचा विचार करताना स्त्रीच्या बाबतीतही त्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार करायला हवा, जी चैन करण्याचे स्वातंत्र्य पुरुषाला असते. सर्वप्रथम नवरा-बायकोने एकमेकांकडे सर्व बाबतीत समान वाटेकरी म्हणून पाहणे गरजेचे आहे. संसारातील कोणतीही गोष्ट करताना कुणीही एकमेकांवर उपकार करत असल्याची भावना असता कामा नये. मनाला वाटेल तसे वागण्याचे, बोलण्याचे, न पटणाऱ्या गोष्टींना विरोध दर्शवण्याचे स्वातंत्र्य दोघांनाही सारखेच असायला हवे आणि समोरच्या व्यक्तीच्या मतांचा तितक्याच खिलाडू वृत्तीने स्वीकार करायला हवा.

लग्नानंतरही जवळचे मित्र-मैत्रिणी असण्याचे, बिनधास्तपणे घराची जबाबदारी नवऱ्याच्या खांद्यावर टाकून जाण्याचे, सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देण्याचे, सासू- सासऱ्यांसोबत राहायचं की वेगळं, कधी-कुठे-काय बोलायंचं, हवी ती नोकरी करण्याचे, मूल हवं की नको हे ठरवण्याचे, मुलांचे संगोपन करताना शाळा निवडण्याचे, मुलांना काय करु द्यायचे आणि काय नाही याबाबत निर्णय घेण्याचे, नवीन गोष्टी शिकण्याचे, घटस्फोट घेण्याचे, अन्यायाविरुद्ध पाहिजे तिथे दाद मागण्याचे, स्वत:च्या शरीराबाबत निर्णय घेण्याचे, नवऱ्यासमोर मनातली प्रत्येक गोष्ट मांडता येण्याचे स्वातंत्र्य तिचे असेल तरंच त्या नात्यात समानता आहे, असं म्हणता येईल. माणूस म्हणून स्त्रीच्या हक्काच्या गोष्टी तिला स्वत:ला करता यायल्या हव्यात. कुणा पुरुषाने तिला तो हक्क, मुभा, मोकळीक देण्याची गरज नाही. नवरा आणि बायको हे नात्याने एकाच बंधनात बांधले गेले असले तरी व्यक्ती म्हणून त्यांचे स्वतंत्र अस्तित्त्व लग्नानंतरही शेवटपर्यंत जपले गेले तर आणि तरंच त्या संसाराची उभारणी समानतेच्या पायावर झाली आहे, असं म्हणता येईल.