महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सिरोंचा नावाचा तालुका आहे. खरंतर अनेकांनी या तालुक्याचे नाव कधी ऐकलेदेखील नसेल, इतका तो प्रदेश दुर्लक्षित आहे. मात्र, याच लहानशा सिरोंचा भागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे; आणि याचे कारण म्हणजे, सिरोंचामध्ये राहणारी भार्गवी रमेश बोलमपल्ली. भार्गवीने प्रचंड मेहनत करून, अथक परिश्रम करून आज एअर इंडियासारख्या प्रतिष्ठित एअरलाईन्समध्ये ‘हवाई सुंदरी’ [एअर होस्टेस] म्हणून आपले नाव कोरले आहे. आता कोणत्याही क्षणी भार्गवी आकाशात झेप घेण्यास तयार आहे. अर्थातच हे यश भार्गवीसह तिच्या कुटुंबीयांसाठी प्रचंड कौतुकास्पद असले, तरीही आज तिच्या यशामुळे सिरोंचासारख्या दुर्लक्षित भागासाठीदेखील ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. कसा होता भार्गवीचा हवाई सुंदरी बनण्याचा प्रवास पाहूया.

भार्गवीचा शैक्षणिक आणि हवाई सुंदरी बनण्याचा प्रवास

शेतकरी कुटुंबात वाढलेल्या भार्गवी बोलमपल्लीला लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला होता. वडील शेतकरी असले तरीही त्यांनी भार्गवीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी तिला शहरातील डिज्नीलँड शाळेमध्ये घातले. तिथे भार्गवीने पहिली ते सातवीचे शिक्षण घेतले. त्यानंतरचे शिक्षण म्हणजेच, सातवी ते दहावीचे शिक्षण तिने माॅडेल शाळेमधून पूर्ण केले. शालेय शिक्षण संपल्यानंतर कॉलेजची पहिली दोन वर्षे, अकरावी आणि बारावी ही अहेरी येथील संत मानवदयाल या माध्यमिक शाळेत काढली आणि अखेरीस भगवंतराव महाविद्यालयातून भार्गवीने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा : लोकांनी वजनावरून चिडवले; मात्र महिला ‘सुमो’ कुस्तीपटू बनून हेतलने कसा रचला क्रीडाविश्वात इतिहास? पाहा….

आपले शालेय आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून भार्गवीने तिला कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे ते पक्के केले आणि त्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला. भार्गवीने तिच्या हवाई सुंदरी बनण्याच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी थेट नागपूर गाठले. नागपूरमध्ये राहून भार्गवीने प्रचंड मेहनत घेऊन हवाई सुंदरी बनण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण घेतले. २०२३ मध्ये भार्गवीने आपले प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, केवळ प्रशिक्षण घेणे पुरेसे नसते. हवाई सुंदरी होण्यासाठी किंवा कोणतीही उत्तम नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाला विविध मुलाखती द्याव्या लागतात आणि त्यामध्ये निवड झाल्यानंतरच व्यक्तीला नोकरीची संधी मिळू शकते. अर्थात, भार्गवीनेदेखील अनेक मुलाखती दिलेल्या आहे.

नागपूर, बंगळुरूमध्ये तिने तब्ब्ल सात वेळा हवाई सुंदरीच्या पदासाठी मुलाखती दिल्या. अखेरीस २०२४ मध्ये तिच्या मेहनतीचे चीज झाले. तब्बल अकराशे प्रशिक्षणार्थींमधून भार्गवीची हवाई सुंदरी म्हणून निवड झाली आहे. एक हजार १०० प्रशिक्षणार्थींमधून भार्गवीसह अजून नऊ जणींची या पदासाठी निवड झाली. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील अत्यंत लहानशा आणि दुर्लक्षित भागातील भार्गवी बाेलमपल्लीचे हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता भार्गवी ‘एअर इंडिया’मध्ये हवाई सुंदरी म्हणून रुजू होणार आहे. यासाठी तिला अजून काही काळासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

भार्गवी बाेलमपल्ली एक आदर्श

भार्गवीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले. विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन अनेक मुलाखती दिल्या आणि शेवटी तिच्या प्रयत्नांना यश मिळाले. तिने स्वतःचे स्वप्न स्वतःच्या मेहनतीने पूर्ण करून दाखवले. एखाद्या लहानशा भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीमधून वर आलेल्या व्यक्तीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.

भार्गवीच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे खेड्यापाड्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील अनेकांसाठी ती आज एक आदर्श ठरली आहे. भार्गवी ही अनेक विद्यार्थिनींसाठी, तरुणींसाठी त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, प्रेरणा देणारी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे.