काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने ‘बस बाई बस’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने पुन्हा एकदा वेब सीरिजमधील बोल्ड सीनवर भाष्य केलं. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमध्ये प्रियाने बोल्ड सीन दिले होते. या वेब सीरिजमधील तिच्या व्हिडीओ क्लिप्सही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिया बापटला तेव्हा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रियाप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील इतरही अभिनेत्रींनी वेब सीरिज किंवा चित्रपटातही बोल्ड सीन दिले आहेत. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, अनुजा साठे यांसारख्या अनेक अभिनेत्रींना बोल्ड सीन दिल्यानंतर ट्रोलिंगचाच सामना करावा लागला आहे. ‘ही आपली संस्कृती आहे का?’ इथपासून ते ‘आई-वडिलांना माहीत आहे का?’ इथपर्यंत… सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समधून लोक थेट अभिनेत्रींच्या घरात जाऊन पोहोचतात. प्रिया बापटला तर एकाने “नवरा सुख देत नाही का?”, असा प्रश्न विचारला होता, आता बोला!

हेही वाचा >> प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

एखाद्या अभिनेत्रीने बोल्ड सीन दिला, म्हणून कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार काढण्याइतपत आपली मानसिकता खालावत चालली आहे का? बोल्ड सीन दिला म्हणून ती अभिनेत्री व्यभिचारी आहे, तिच्यावर संस्कार झालेले नाहीत, हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण आहोत? अभिनेत्रींनी चित्रपटात बोल्ड सीन देणं हा त्यांच्या व्यावसायिकतेचा किंवा कामाचा भाग म्हणून पाहिलं पाहिजे.

हेही वाचा >> किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?

कलाकारांची भूमिका आवडल्यास प्रेक्षक त्यांचं आपसुकच कौतुक करताना दिसतात. तसेच एखाद्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्याचादेखील प्रेक्षकांना पूर्ण अधिकार आहे. फक्त आपलं मत मांडत असताना प्रत्येकानेच भाषेचं तारतम्य आणि सीमारेषा ओळखली पाहिजे. कलाकार आपल्याला कितीही जवळचे वाटत असले, तरी त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा, त्यांनी साकारलेल्या भूमिकेबद्दल कुटुंबियांना दोष देण्याचा कोणताही अधिकार कोणत्याच प्रेक्षकाला नाही.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How can be family guilty for marathi actress bold scene in movie web series kak