सुमाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या ठिकाणी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली, तो भिडे वाडा आज अखेर इतिहासजमा झाला. वाडासंस्कृतीची आठवण करून देणारा हा वाडा स्त्री सक्षमीकरणाच्या इतिहासात महत्त्वाची वास्तू ठरला आहे. भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाला सुरुवात होऊन आता १ जानेवारी २०२४ रोजी १७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने स्त्री सक्षमीकरणाकरता क्रांतीकारक ठरलेल्या या घटनेचा उजाळा घेऊया.
अवघ्या महिला वर्गासाठी क्रांतीकारक ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांचं वयाच्या नवव्या वर्षी जोतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. आपला जोडीदार योग्य असेल तर जीवनाला आकार मिळतो, हे या जोडप्याने सिद्ध करून दाखवलं. जोतिबा फुले हे आधुनिक काळातील स्त्रीवादी समाजसुधारक होत. महिलांना उंबरठ्याबाहेर पडण्याचीही परवानगी नसताना सावित्रीबाईंनी क्रांतीकारक निर्णय घेतला. महात्मा जोतिबा फुलेंना रुढीवादी- परंपरांना छेद द्यायचा होता. त्यांना महिलांना सक्षम करायचं होतं. याकरता त्यांनी आपल्या पत्नीची म्हणजेच सावित्रीबाईंची मदत घेतली.
१९ व्या शतकात महिलांना शिक्षण वर्ज्य होतं. त्यामुळे लग्नाआधी सावित्रीबाईंनीही शाळेची पायरी चढली नव्हती. परंतु, लग्न झाल्यानंतर जोतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिलं. १८४१ पासून सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. पुढे सावित्रीबाईंनी ‘नार्मल स्कूल’मधून शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु, मुलींसाठी शाळा सुरू करणे कठिण बनले होते. मुलींना शिकवण्यासाठी कोणीही जागा द्यायला तयार नव्हतं. परंतु, आपल्या मित्राची स्त्री शिक्षणामागची तगमग पाहून तात्यासाहेब भिडे यांनी त्यांचा पुण्यातील भिडेवाडा दिला. या भिडेवाड्यात १ जानेवारी १४४८ साली मुलींची पहिली शाळा भरली.
हेही वाचा >> विश्लेषण : वयाच्या ९ व्या वर्षी लग्न, १७ व्या वर्षी मुलींसाठी पहिली शाळा, वाचा सावित्रीबाईंचं संपूर्ण जीवनकार्य…
१८ व्या शतकात पुणे पेशव्यांची राजधानी होती. याच काळात येथे अनेक वास्तु बांधण्यात आल्या होत्या. दोन मजली आणि आयताकृती मांडणीच्या या वास्तू वाडा स्वरुपातील होत्या. पुण्यात पेठा आणि पेठांमध्ये असलेले वाडे आजही प्रसिद्ध आहेत. बुधवार पेठ ही व्यापारी पेठ होती. या पेठेत असंख्य वाडे होते. त्यापैकी एक वाडा म्हणजे भिडेवाडा. तात्यासाहेब भिडे यांचा हा वाडा. या भिडे वाड्यातून अनेक सामाजिक चळवळी सुरू झाल्याच्याही नोंदी आढळतात. याच भिडे वाड्यातून स्त्री शिक्षणालाही सुरुवात झाली.
“जोतिबा फुले अहमदनगर येथे गेले होते. तिथं त्यांनी कन्या शाळा पाहिली. अशीच कन्या शाळा महाराष्ट्रात सुरू करावी या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरू केले. परंतु, त्यांना जागेची अडचण आली. तात्याराव भिडे यांच्यासह बोलताना फुलेंनी ही अडचण सांगितली. त्यामुळे त्यांनी फुलेंच्या विचारांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने भिडे वाड्यातील दोन खोल्या फुलेंना शाळेसाठी उपलब्ध करून दिल्या. खरंतर संपूर्ण समाजातून स्त्री शिक्षणाला विरोध होत असताना स्त्रियांना पाठिंबा देण्याचं काम तात्याराव भिडेंनी त्यावेळी केलं होतं. तात्याराव भिडे हे फुलेंचे सहकारी होते. पण त्याही पेक्षा ते उदारमतवादी विचारांचे होते. मुलींच्या शाळेसाठी भिडे वाडा देणं ही केवळ मैत्रीनिमित्त केलेली मदत नव्हती तर, फुलेंच्या विचारांना पाठिंबा देण्याकरता केलेली कृती होती”, असं प्राध्यापिका प्रतिमा परदेशी म्हणाल्या.
ही शाळा पुढे दोन-एक वर्ष राहिली. त्यानंतर भिडेंनी हा वाडा विकला. विसाव्या शतकात हा वाडा विकासाच्या नावाखाली पाडला जाणार होता. परंतु, १९८८ साली भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा याकरता चळवळ सुरू झाली. डॉ.बाबा आढाव यांच्यासह शंभर जणांनी भिडे वाड्यावर मोर्चा नेऊन भिडे वाडा बचाव मोहीम सुरू केली. अखेर या मोहिमेला यश आलं आहे.
१९ व्या शतकातील ती घटना मन हेलवणारी
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर अनेक मुली शिकू लागल्या. परंतु, समाजाकडून हवा तसा पाठिंबा मिळत नव्हता. पुण्यातील प्रसिद्ध शल्यविशारद असलेले डॉ.विश्राम घोले यांची मुलगी शाळा शिकत होती. परंतु, मुलीच्या शिक्षणाला समाज आणि घरातील इतर मंडळींकडून विरोध झाला. घरच्यांनी समाजाच्या दडपणाखाली येऊन काशीबाईची बळी घेतला. भिडेवाडाच्या परिसरातच घोलेंचं घर होतं. या घटनेने डॉ. विश्राम घोले यांना अतिव दुःख झालं. यामुळे त्यांनी आपल्या लेकीच्या स्मरणार्थ भिडे वाडा परिसरातच पाण्याचा हौद बांधला. याच हौदेला बाहुलीचा हौद म्हणतात. या हौदेसमोरच भिडे वाडा आहे. विश्राम घोले यांनी समाजातील जुनाट चालीरितींमुळे आपल्या एका लेकीला गमावलं होतं. परंतु, तरीही त्यांनी आपली दुसरी लेक गंगुबाई हिला उच्च शिक्षण दिलं, अशी माहिती प्रतिमा परदेशी यांनी दिली.
सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाला चालना दिली. तात्याराव भिडेंसारख्या उदारमतवादी लोकांमुळे या प्रयत्नांना यश आलं. त्यामुळे ज्या ठिकाणाहून महिला शिक्षणाची बिजे रोवली गेली त्या ठिकाणी आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. ही तमाम भारतीय महिलांसाठी आनंदाची बाब असेल.